Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

लोकमानस

असे ‘वऱ्हाड’ होणे नाही

 

विश्वविक्रमी ‘वऱ्हाड.’कार, लक्ष्मण देशपांडे महान कलावंत होते. ते काळाच्या पडद्याआड गेल्याने एक विक्रमवीर आपल्यात केवळ स्मृतीरूपात उरला आहे. त्यांच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने नवनवीन विक्रम प्रस्थापित केले.
एकाच नाटकात ५२ आवाज, अनेक भूमिका आणि एकपात्री नाटकाचे सर्वाधिक प्रयोग अशा प्रकारांत दोनदा ‘गिनीज’ बुकात नोंद करणारे ते एकमेव कलाकार! अशा प्रकारचा मराठीतील प्रयोग पहिल्यांदाच जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा विश्वविक्रमही त्यांनी केला. एकपात्री नाटय़प्रयोगाला सर्वोच्च मान्यता मिळवून देणारे असे वऱ्हाड पुन्हा होणे नाही.
सुनील कुवरे, शिवडी, मुंबई

‘जीव्हीकें’ची मराठी
२० फेब्रुवारीच्या अनेक वृत्तपत्रांत ‘जीव्हीके’ कंपनीतर्फे प्रसारित करण्यात आलेली ‘भारताचे नवे प्रवेशद्वार’ ही जाहिरात वाचली. यात शुद्धलेखनाच्या तब्बल २२ चुका होत्या!
ज्ञानेश्वरांच्या या महाराष्ट्रात जाहिरातदार करोडपतीला असा एकही मराठी माणूस भेटला नाही का, की जो दहा ओळींचा मजकूर शुद्ध लिहून देऊ शकेल? या चुकांमध्ये ‘जीव्हीके’ कंपनीचे चेअरमन जी. व्ही. कृष्णा रेड्डी यांच्या नावाचाही समावेश आहे.
चंद्रशेखर ठाकूर, बोरिवली, मुंबई

हा कुठला वारकरी धर्म?
डॉ. आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी निर्माण केलेला वाद अनाकलनीय आहे. कादंबरीकाराने आपल्या कल्पनेने रंगविलेले बालपणीच्या तुकारामांचे वर्णन वारकऱ्यांना तुकाराम महाराजांवर अन्याय करणारे वाटत असेल तर त्यांनी बालपणी तुकाराम कसे होते याचे काही वस्तुनिष्ठ पुरावे व संदर्भ समाजापुढे ठेवूनच हा वाद निर्माण करावयास हवा होता. केवळ भावनात्मक वाद निर्माण करून लोकांना भ्रमात टाकावयास नको होते.
साहित्यिकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य हवे असे व्यासपीठांवरून उच्चरवाने सांगणाऱ्या एकाही साहित्यिकाने त्या दृष्टीने या कादंबरीविषयी प्रतिक्रिया देऊ नये, याचेही आश्चर्य वाटते. डॉ. यादवांना हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य होते की नाही?
परमेश्वराजवळ रोज ‘दया क्षमा शांती’ची मागणी करणारे वारकरी डॉ. यादव यांनी बिनशर्त क्षमा मागितल्यानंतरदेखील त्यांना उदार मनाने ‘माफ’ करणार नसतील तर त्यांच्या भक्तिभावाविषयी शंकाच वाटेल!
डॉ. रा. ज. गुजराथी, बोरिवली, मुंबई

मोबाइल वापरणाऱ्यांनी भान ठेवावे
नुकताच डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाटय़गृहात ‘कबड्डी कबड्डी’ या नाटकाचा प्रयोग पाहिला. पडदा दूर होण्यापूर्वीच ‘कृपया सर्वानी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवण्याची मेहरबानी करावी’ अशी विनम्र सूचना करण्यात आली. वास्तविक सुशिक्षित नाटय़प्रेमी रसिकांना अशा तऱ्हेची सूचना करावीच लागू नये. पण सूचना करूनही अनेकदा अनेकांचे भ्रमणध्वनी रंगलेल्या नाटय़प्रयोगात व्यत्यय आणित होते.
अखेर मध्यंतरानंतरच्या दुसऱ्या अंकात नाटकाच्या प्रमुख भूमिकेत असलेले ज्येष्ठ कलाकार विनय आपटे यांनी नाटक सुरू असतानाच पुनश्च विनंती करून भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचे आवाहन केले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतरही किमान चारपाच वेळा रिंगटोन वाजले आणि मला खरोखरच अशा बेफिकीर माणसांची कीव वाटली.
मोबाइल वाजणे, आपापसात बोलणे, मधूनच उठून जाणे, मुलांचा गडबड- गोंधळ या साऱ्या गोष्टींचा जीव ओतून आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना किती मनस्ताप होतो हे मी स्वत: अनेकदा अनुभवलंय. सभ्यता, शिष्टाचार सांगितल्यावरही कळत नसतील अशा अ-रसिकांनी रंगाचा बेरंग करण्यासाठी कार्यक्रमाला न येणे हे उत्तम. कलेची जाण नसेल तर येण्याची तसदी कशाला?
संजय बर्वे, कल्याण