Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

जयंत पाटील यांची टीका असंस्कृतपणाची- प्रतीक पाटील
सांगली, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पेठ- इस्लामपूर रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून चार कोटी रुपये कोणी मंजूर करून आणले, याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांना असतानादेखील त्यांनी आमच्यावर निष्क्रियतेची टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना जयंत पाटील यांच्यासारख्या जबाबदार व सुसंस्कृत नेतृत्वाला काँग्रेसच्या खासदार व मंत्र्यावर टीका करणे शोभत नाही, असे प्रत्युत्तर खासदार प्रतीक पाटील यांनी दिले.

कोणत्या कामांसाठी केंद्र निधी पुरविते हे सांगलीच्या खासदारांना माहिती नसावे- जयंत पाटील
सांगली, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
काँग्रेसचे खासदार प्रतीक पाटील हे जरी आपले मित्र असले तरी त्यांना कोणकोणत्या कामासाठी केंद्र सरकार निधी पुरविते, याची माहिती नसावी, असा टोला लगावत आपणाला त्यांच्याशी वाद घालायचा नाही. पण त्यांचे कार्यालय कोठे आहे, याचा शोध घ्यावा लागेल, अशी उपरोधिक टीका गृहमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.

बहुतेक नगरसेवकांचा विरोध असूनही कोल्हापूर स्थायी समिती सभापतिपदी सलगर
कोल्हापूर, २७ फेब्रुवारी / विशेष प्रतिनिधी

आघाडीअंतर्गत राजकारण आणि नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे कोल्हापूर जिल्ह्य़ात गेले चार महिने गाजत असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाचे कवित्व एकदाचे संपले. आघाडीतील बहुतेक नगरसेवकांचा विरोध असूनही सभापतिपदावर इंद्रजित उर्फ जितू सलगर यांची वर्णी लावण्यात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील यशस्वी ठरले. यामुळे काँग्रेस पक्षाच्या राजकारणावरील आमदार पी.एन.पाटील यांची पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूरजवळ सोनिया गांधींच्या हस्ते आज वीजप्रकल्प पायाभरणी सोहळा
सोलापूर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा निर्मिती महामंडळातर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यात सुमारे ६५०० कोटी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या १३२० मेगावॉट औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ उद्या शनिवारी दुपारी तीन वाजता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी त्या उपस्थित एक लाखापेक्षा अधिक जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.

संभाजी भिडे मारहाण वर्षपूर्ती
सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद
सांगली, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना वर्षभरापूर्वी झालेल्या मारहाणप्रकरणी पुकारण्यात आलेल्या सांगली बंदला शुक्रवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदच्या पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे उद्यापासून असहकार आंदोलन
सोलापूर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

भारतीय पशुवैद्यक परिषद कायद्याच्या तरतुदीनुसार लघु पशुवैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने १ मार्चपासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी असहकार आंदोलनात सोलापूर जिल्हा शाखाही सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. एस.पी. माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लघु पशुवैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी लागणारा परवाना व पंजीकृत पशुचिकित्सा पर्यवेक्षण आणि सूचनांच्या कवचाअभावी काम करण्यास संघटनेने असमर्थता व्यक्त केली आहे.

सोलापूर पालिका आयुक्तांना बसपातर्फे कुत्र्याचे पिलू भेट
सोलापूर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठय़ा प्रमाणात होत असून विडी घरकुलनजीक एका भटक्या कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे १३ वर्षांच्या मुलाचा बळी गेला. या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाज पाटींच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत महापालिका आयुक्त रणजितसिंह देओल यांना चक्क एक कुत्र्याचे पिल्लूच भेट दिले. विडी घरकुलमध्ये भटक्या कुत्र्याने दंश केल्याने अमर भूपती येमूल हा गरीब कुटुंबातील मुलगा मरण पावला. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वरच्यावर वाढत असताना महापालिकेची यंत्रणा ढिम्मच आहे. कुत्र्यांचे निर्बिजीकरणाची मोहीम नावापुरतीच आहे. या घटनेच्या निषेधार्थ बसपाचे नगरसेवक बबलू गायकवाड व आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेत आयुक्त देओल यांची भेट घेऊन त्यांना कुत्र्याचे पिल्लू भेट देत आपला संताप प्रकट केला. मयत मुलाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची मागणीही करण्यात आली. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास पालिका प्रशासनाच्या अंगावर मोठय़ा प्रमाणात भटकी कुत्री सोडण्याचा इशाराही नगरसेवक गायकवाड व चंदनशिवे यांनी दिला. अखेर आयुक्तांनाही या आंदोलनाची दखल घेणे भाग पडले.

माजी सैनिकाच्या पत्नीचे बेमुदत उपोषण मागे
सोलापूर, २७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

मार्डी येथील राजकीय, गावगुंड व सावकारांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पोलीस खात्यात देण्यात आल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या सहकार्याने दलित असलेल्या माजी सैनिक पत्नी मंदाकिनी मनोहर माशाळकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. मार्डी येथील माशाळकर यांच्या जमिनीवर सावकारांनी अनधिकृत कब्जा केला. बाणेगाव येथील शेकडो एकर जमिनीवर पीक घेऊन दलित आणि गरिबांना नाहक त्रास देत असल्याबद्दल गेल्या २३ फेब्रुवारीपासून माशाळकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने माशाळकर यांनी आज तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले.

कर्मचारी क्रीडा स्पर्धांना मंत्र्यांची सदिच्छा भेट
सांगली, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सांगली जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेस ग्रामीण विकासमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील व गृहमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी गोकुळ मवारे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात या क्रीडा स्पर्धाची माहिती दिली. यावेळी महापौर मैनुद्दीन बागवान, उपमहापौर शेखर इनामदार, स्थायी समितीचे सभापती हरिदास पाटील, महापालिका आयुक्त दत्तात्रय मेतके, अतिरिक्त आयुक्त यशंवत माळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील व शहर अभियंता डी. एस. जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

सहाशेच्यावर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण
माळशिरस, २७ फेब्रुवारी / वार्ताहर

ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यात ३ हजार २५७ कोटी रुपयांची ५ हजार ६६२ गावांना जोडणारी १४ हजार ४१९ कि. मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून सातव्या टप्यातील १७९१ कोटी मंजूर कामापैकी ११०० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा काढल्या असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली. अकलूज येथील शिवरत्न या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेंतर्गत पहिल्या चार टप्प्यात १२९९ गावांना जोडणारी ६७४ कोटी रुपयांची ३ हजार ७१२ कि. मी. लांबीच्या रस्त्यांची कामे झाली होती. ग्रामविकास खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर या कामांना प्रचंड गती आल्याचा दावा करीत मोहितेपाटील यांनी ५ व्या व ६ व्या टप्प्यात ४ हजार ३६३ गावांना जोडणारी १० हजार ७०७ कि. मी. लांबीची व २ हजार ५८३ कोटी रुपयांची कामे झाल्याचे सांगितले.

पंढरपूर पालिकेचा करवाढविरहित अर्थसंकल्प सादर
पंढरपूर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

पंढरपूर नगरपरिषदेने कोणतीही नवीन करआकारणी वा अन्य करात नवीन वाढ न करता सन २००९-१० या वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. बुधवारी पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दगडू धोत्रे हे होते.पालिकेने २९ कोटी नऊ लाख १२ हजार ५४० चे महसुली उत्पन्न तर २९ कोटी ३ लाख ३८ हजार ५३२ रुपयांचा खर्च सभागृहात नगराध्यक्ष यांनी सादर केला. या आगामी अर्थसंकल्पात शहरातील अंतर्गत गटारी, पाईपलाईन व दुरुस्ती देखभालीसाठी ४० लाख रुपये, नवीन इमारतीकरिता या करिता ४० लाख रु. तरतूद केली आहे.घनकचरा व्यवस्थापनासाठी ५० लाख बायोमिथेन युनिटकरिता ५ लाख तसेच शहर विकास निधी म्हणून १ कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. या अर्थसंकल्पात यमाई तलावाच्या सुशोभिकरणासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या तलावाचे रेंगाळलेले काम मार्गी लागणार आहे.

शिक्षिकेच्या आत्महत्याप्रकरणी सासर-माहेरच्या लोकांचा परस्परांवर हल्ला
वाई, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

अंगणवाडी शिक्षिकेने आत्महत्या केलेल्या ओझर्डे (ता.वाई) येथील महिलेच्या रक्षाविसर्जन विधीच्या वेळी माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर हल्ला केला. त्यात एकमेकांना बेदम मारहाण झाली. भुईंज पोलिसांत माहेरच्या लोकांनी शिक्षिकेच्या हत्येची तक्रार दिल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. ओझर्डे येथील शुभांगी कुंभार (वय २४) यांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली. आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. मात्र रक्षाविसर्जनाच्या वेळी माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांवर हल्ला केला.

महाराष्ट्र जनसेवा संघटनेची आज बैठक
माळशिरस, २७ फेब्रुवारी / वार्ताहर

लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या तातडीचे बैठकीचे उद्या २८ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. राज्यातील जनसेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष महादेव गायकवाड यांनी केले आहे. ही बैठक आ. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धवलनगर अकलूज येथील निवासस्थानी दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. होणार असल्याचे त्यांनी सांगितले.