Leading International Marathi News Daily                               शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

‘सेलिब्रिटींना तिकीट देणार नाही’
लोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय मनसे दोन दिवसांत घेणार - राज ठाकरे

मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सेलिब्रिटींना निवडणुकीत उमेदवारी देण्याची धडपड करीत असले तरी मनसे मात्र अशा भाडय़ाच्या उमेदवारांना तिकीट देणार नाही, तर पक्षकार्यकर्त्यांनाच देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी आज केली. तसेच लोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असेही राज यांनी स्पष्ट केले. पक्षातील सर्व संपर्कप्रमुखपदे रद्द करीत असल्याचा झटकाही राज यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला.

पवारांची भलामण करीत आदिकांची काँग्रेसवर टीका
मुंबई, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा व नंतर एकसंध झालेल्या काँग्रेस पक्षात पंतप्रधानपद पवारांकडे सोपवावे, अशी मागणी मंत्रीपद नाकारल्याने संतप्त झालेल्या गोविंदराव आदिक यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आज जाहीररीत्या केली. तसेच असा प्रयत्न न झाल्यास आपल्याला या दिशेने वाटचाल सुरू करावी लागेल, असे विधान करून काँग्रेस पक्षाला आपण रामराम करणार असल्याचेही जवळजवळ स्पष्ट केले.

फेब्रुवारीतच पारा ४० अंशांजवळ
या वेळचा उन्हाळा त्रासदायक ठरणार?
पुणे, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. परभणीत पारा ३९.८ अंशांवर गेला. त्यामुळे या उन्हाळय़ात उकाडा किती त्रासदायक ठरणार, याचीच उत्सुकता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहणार असल्याने असाच उकाडा सहन करावा लागणार आहे. राज्यातील सरासरी आकडे पाहिले तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ३४-३५ अंशांच्या आसपास असते. उन्हाळय़ात अतिशय उष्ण असणाऱ्या उत्तम महाराष्ट्रात किंवा विदर्भ-मराठवाडय़ातही फेब्रुवारी महिन्यात तापमान फारसे वाढत नाही.

अरुण गवळी यांची ‘हत्ती’वर बसून दिल्लीस्वारी
मुंबई, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

‘गली गली में एक ही शोर हाथी चला दिल्ली की ओर’ ही घोषणा बहुजन समाज पक्षात कांशीराम यांच्यापासूनच लोकप्रिय आहे. आता बहेन मायावती यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसविण्याच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी स्वत: अरुण गवळी उर्फ डॅडीच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. या पराकाष्ठेचे बक्षिस त्यांना आगाऊच देण्यात आले आहे. मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची बसपाची उमेदवारी बसपाने डॅडींना बहाल केली आहे. बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास गरुड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, अरुण गवळी यांचा अखिल भारतीय सेना हा पक्षच बहुजन समाज पक्षात विलीन करण्याचे गवळी यांनी मान्य केले आहे.

‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’चे संस्थापक टी. एन. शानभाग यांचे निधन
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सर्वसामान्य वाचक ते विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ पुस्तकप्रेमी आणि पुस्तके यांच्यातील लोकप्रिय दुवा असलेले स्ट्रॅण्ड बुक स्टॉलचे संस्थापक पद्मश्री टी. एन. शानभाग यांचे आज वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पुस्तकांच्या दुकानाकडे शानभाग यांनी कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. स्वत: शानभाग हे एक चांगले वाचक आणि साहित्यप्रेमी होते.

बीएमएमच्या मराठीकरणाला अखेर मान्यता
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या ‘बॅचलर ऑफ मास मिडीया’ (बीएमएम) या इंग्रजाळलेल्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र व मराठीशी संबंधित विषयांचा समावेश करण्याचा निर्णय आज विद्यापीठाच्या विद्वत परिषदेत घेण्यात आला. एवढेच नव्हे तर, मराठी भाषेतील स्वतंत्र आराखडय़ालाही विद्वत परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषेतील अभ्यासक्रम विविध महाविद्यालयांतून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज योगायोगाने मराठी भाषादिनाच्या पाश्र्वभूमीवरच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील पदव्युत्तर पत्रकारिता विभागाचे प्रमुख संजय रानडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने ‘बीएमएम’चा सुधारीत मसुदा तयार केला आहे.

परीक्षा केंद्रांवर विजेची पर्यायी व्यवस्था करा
उच्च न्यायालयाचा आदेश
मुंबई, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या वेळी ज्या केंद्रांवर भारनियमनामुळे नियमित वीज पुरवठा उपलब्ध असणार नाही तेथे इन्व्हर्टर अथवा जनरेटर लावून विजेची पर्यायी व्यवस्था केली जावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. उच्च माध्यमिक परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे तर शालान्त परीक्षा त्यानंतर मार्चमध्ये होणार आहे.१५ पैकी सहा मतदारसंघांवर उभय बाजूने दावा
मुंबई, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

जागावाटपात काँग्रेस २७ व २१ तर राष्ट्रवादी निम्म्या जागांच्या मागणीवर ठाम असले तरी उभय बाजूने प्रत्यक्ष मतदारसंघनिहाय आजपासून चर्चा सुरू करण्यात आली. दुसऱ्या फेरीत १५ मतदारसंघांवर झालेल्या चर्चेत सहा मतदारसंघांवर उभय बाजूने दावा करण्यात आल्याने घोळ सुरूच राहिला. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी दोघेही एक पाऊल मागे घेतील अशीच एकूण चिन्हे आहेत.
जागावाटपाच्या संख्याबळावरून काँग्रेस व राष्ट्रवादी माघार घेण्यास तयार नसल्याने गेले महिनाभर चर्चा पुढे सरकत नव्हती. त्यातच राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण तयार झाले होते. शेवटी राष्ट्रवादीच्या वतीने शरद पवार व प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसच्या वतीने ए. के. अ‍ॅन्टोनी व अहमद पटेल यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर राज्य पातळीवर जागावाटपाची बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुसरी फेरी आज रात्री पार पडली. राष्ट्रवादी २४ - २४ जागांच्या सूत्रावर ठाम असल्याचे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने २७ व २१ जागांची मागणी कायम ठेवली. संख्याबळावर वाद न घालता प्रत्यक्ष मतदारसंघनिहाय चर्चा सुरू करण्यात आली. १ ते १५ मतदारसंघांवर आज चर्चा करण्यात आली.
नंदुरबारची जागा १९६७ पासून सातत्याने काँग्रेसकडे असली तरी बदलत्या परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात आली. काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला. बुलढाण्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघांनीही दावा केला. गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या तीन लोकसभा मतदारसंघांवर दोन्ही बाजूने दावा करण्यात आला. जळगावची जागा राष्ट्रवादीला तर रावेरची जागा काँग्रेसला सोडली जाईल. अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर या जागा काँग्रेसला तर भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादीकडे राहणार आहेत. केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील यांच्या हिंगोली मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला. जागावाटपाची तिसरी फेरी येत्या सोमवारी मुंबईत होणार आहे.

आता पाकिस्तान म्हणतो..
कसाबने सागरी मार्गाने भारतात प्रवेश केलाच नाही
कराची, २७ पेब्रुवारी/पीटीआय

मुंबई हल्ल्यांच्या वेळी अजमल कसाब हा सागरी मार्गाने मुंबईत आल्याचा कोणताही पुरवा उपलब्ध नसल्याचे पाकिस्तानचे नौदलप्रमुख अॅडमिरल नोमान बशीर यांनी म्हटले आहे. दरम्यान, असे विधान करून पाकिस्तानी नौदलप्रमुखांनी खोटारडेपणाचा कळस गाठला आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहारमंत्री रहमान मलीक यांनी दोन आठवडय़ांपूर्वी म्हटले होते की, मुंबईवरील हल्ल्यांची योजना काही प्रमाणात पाकिस्तानात आखली गेली होती. पण नौदलप्रमुखांच्या आजच्या वक्तव्याने पाकिस्तान पुन्हा एकदा मुंबई हल्ल्यातील आपला सहभाग नाकारण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. बशीर यांनी असाही दावा केला आहे की, आमच्या नौदलाची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून पाकिस्तानी सागरी हद्द ओलांडणे या दहशतवाद्यांना अशक्य होते. दरम्यान, कसाबबाबत वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुराणी यांची उचलबांगडी केल्यानंतर झरदारी प्रशासनाने आता पाकिस्तानात मुंबई हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यातील विशेष सरकारी वकील सरदार महंमद गाझी यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. कसाबला भारताने पाकिस्तानच्या ताब्यात द्यावे अशी विनंती पाकिस्तानने केली असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी गाझी यांनी केले होते. नंतर प्रशासनाला या विधानाचा इन्कार करावा लागला होता.

 


प्रत्येक शुक्रवारी