Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

शुकशुकाट
अटकेच्या भीतीने अनेकांनी गाव सोडले

दत्ता सांगळे
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी

मुलीची दुसऱ्यांदा छेड काढणाऱ्या रोहिदास तुपे याला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी चौकातील खांबाला बांधून बेदम मारले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. गावच्या इज्जतीशी खेळतो म्हणून अनेकांनी त्याला मारहाण केली खरी; पण त्यानंतर या गावात आता भयाण शांतता आहे. पोलिसांनी ७३ जणांना अटक केली आणि त्याच्या तिप्पट लोक अटकेच्या भीतीने गाव सोडून पसार झाले. आपल्यावरही हल्ला होईल या भीतीने सासुरवाशिणी माहेरी गेल्या. त्यामुळे या गावात आता फक्त वृद्ध माणसेच राहिली आहेत.

रत्नापूरला कॉप्यांचा महापूर; २९ विद्यार्थी अपात्र
मानवत, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील रत्नापूरच्या परीक्षाकेंद्रावरून तहसीलदार नरसीकर यांनी आज दोन पोते कॉप्या जप्त केल्या. कॉप्या करताना रंगेहाथ पकडल्याने मंडळ सदस्य प्रा. सुनील चव्हाण (बीड) यांनी २९ विद्यार्थ्यांवर कारवाई करीत, त्यांना परीक्षा देण्यास अपात्र ठरविले.तालुक्यात रत्नापूर आणि मानवत ही दोन बारावीची परीक्षा केंद्रे असून आज इंग्रजीची परीक्षा होती. रत्नापूरच्या लोणार शिक्षण प्रसारक मंडळाच्या परीक्षा केंद्रावर पहिल्यापासूनच कॉप्यांचा सुळसुळाट होता. पहिल्या तासात श्री. नरसीकर यांनी या केंद्रावरील १७ खोल्यांमधील विद्यार्थ्यांची झडती घेऊन जवळपास दोन पोते कॉप्या काढल्या.

एक जीवन - दोन कथा
एकोणिसाव्या शतकात भारताच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गानी लढणारे एकापेक्षा एक लोकोत्तर पुरुष होऊन गेले. टिळक, गांधी, सावरकर, नेहरू, पटेल, भगतसिंग आणि सुभाषचंद्र.. या साऱ्यांचे अलौकिक जीवन लेखकांसाठी साक्षात सोन्याची खाण. त्यांच्यावर चारित्रिक लेखन खूप झाले. पण का कोण जाणे ललित माध्यमातून त्यांचं भावविश्व व अलौकिक कार्य रेखाटण्याचे काम फार तुरळकपणे भारतीय लेखकांनी केले आहे.

ऊसतोडणी कामगारांच्या कर्जप्रस्तावाची स्थगिती उठवा - मुंडे
बीड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

ऊसतोडणी कामगारांच्या कर्ज प्रस्तावाला सरकारने दिलेली स्थगिती उठवावी; अन्यथा पुढील वर्षी बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्यासह राज्यातील एकही कारखाना चालू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे यांनी आज दिला. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री बबनराव पाचपुते शेतकऱ्यांची व विकासकामांची अडवणूक करत आहेत. त्यांना बडगा दाखवावा लागेल, असेही ते म्हणाले.

‘छोकरा चहावाला’ तहसीलदार झाला!
हरिहर धुतमल
लोहा, २७ फेब्रुवारी

घरची अत्यंत गरिबी. पिढय़ान् पिढय़ा जेमतेम शिक्षण. कोणी मॅट्रिकसुद्धा नाही. पोटापाण्याचा प्रश्न. त्यातच शिक्षणाची जिद्द. वह्य़ा-पुस्तकांसाठी तो चहाच्या टपरीवर ‘चहावाला छोकरा’ झाला. त्यातून मिळालेल्या रोजंदारीवर शिक्षण अन् घरखर्चही. पुढे आठवीत मोटार गॅरेजवर काम. बारावीच्या वेळी तो बनला प्रवासी वाहतूक कंपनीत बुकिंगवाला. पडेल ते काम करून शिकण्याची जिद्द. जिद्द मोठे होण्याची.

शिष्यवृत्तीसाठी कागदी व्यापच जास्त
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज २७ हजारांवर; शिष्यवृत्ती फक्त १३६२ जणांना
उस्मानाबाद, २७ फेब्रुवारी/वार्ताहर
अल्पसंख्याक समाजातील मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेली अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेची अवस्था नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे. जिल्ह्य़ातून २७ हजार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतल्यानंतर फक्त एक हजार ३६२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून कॉपीसह संस्थाचालकांनाही ‘लगाम’!
अतिरिक्त जिल्हाधिकारी, डीवायएसपींसह तहसीलदार पूर्णवेळ परीक्षागृहात!
गंगाखेड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर
विद्यार्थ्यांना प्रवेशासोबतच गुणवत्तापूर्ण उत्तीर्ण करण्याची हमी घेत हजारो रुपये उकळणाऱ्या मुजोर संस्थाचालकांचा आज शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) ऐन इंग्रजी पेपरच्या दिवशी जिल्हा व तालुका प्रशासनाने पुरता हिशेब चुकता केला! वादग्रस्त परीक्षा केंद्रावर पेपरदरम्यान पूर्ण वेळ स्वत: परीक्षार्थीना तपासत परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. धनराज केंद्रे, गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत पाटील, तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, पोलीस निरीक्षक सतीश देशमुख यांनी आपल्या फौजफाटय़ासह एकही कॉपी चालू न देता कॉपी प्रकारास ‘लगाम’ देण्याची लिलया कामगिरी केली.

पीएच.डीच्या विषयांवरील चर्चेला विषयतज्ज्ञ अनुपस्थित
चर्चेविनाच मंजुरी देण्याची विद्यार्थ्यांची मागणी
नांदेड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागाच्या वतीने संशोधक विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शकांना त्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलाविले; परंतु चर्चेसाठी बोलाविण्यात आलेले विषयतज्ज्ञ अनुपस्थित राहिल्याने मुप्टा संघटनेने या विद्यार्थ्यांच्या विषयांना पुन्हा चर्चाऐवजी सरळ मान्यता देण्याची मागणी केली आहे.

‘रास्ता रोको’मुळे वाहतूक थंडावली
नांदेड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

किनवट तालुक्यातल्या इस्लापूर येथे एका आदिवासी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला आज तामसा, हिमायतनगर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. तामसा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन झाल्याने दोन तास वाहतूक थंडावली. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश सायन्ना जेलेवाड याला गोवा येथे अटक करण्यात आली.सर्व आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्या मुलीचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघ व बिरसा ब्रिगेड यांनी आज ‘तामसा बंद’चे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी सकाळी नांदेड-हदगाव रस्त्यावर ‘रास्ता रोको’ केले. ‘बंद’मुळे पिण्याचे पाणी नागरिकांना मिळाले नाही. किशोर सरवुंडे, रामजी वाकोडे, संतोष गायकवाड, ज्ञानेश्वर तायवाडे, हरिश्चंद्र गारोळे, विठ्ठल धुमाळे, निरंजन सरगुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दरम्यान हिमायतनगर येथेही ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या गुन्ह्य़ात मुख्य दोन आरोपींना काल स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

परभणी जिल्ह्य़ामध्ये ६२ विद्यार्थ्यांवर कारवाई
परभणी, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

परीक्षा केंद्रावर कॉप्या पुरविणारांचा गराडा, खिडक्यांना लोंबकळणारे विद्यार्थ्यांचे ‘हितचिंतक’ आणि केंद्राभोवती पडणारा कॉप्यांचा खच दर वर्षी दिसणारे चित्र यंदा बारावीच्या परीक्षेत गायब झाले आहे. आज इंग्रजीची परीक्षा असूनही कोणत्याच परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला नाही. दरम्यान, आज एकूण ६२ विद्यार्थ्यांवर कारवाई करून त्यांना परीक्षा देण्यास अपात्र ठरविण्यात आले.
कोद्री, राणीसावरगाव येथील वादग्रस्त परीक्षा केंद्रांवर आज चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्ह्य़ातील अन्य परीक्षा केंद्रांवरही करण्यात आलेल्या कारवाईची व्याप्ती मोठी आहे. राणीसावरगाव येथे २, कोद्री येथे २३, इसाद येथे १, शांतिनिकेतन, ब्राह्मणगाव येथे २०, रत्नापूर येथे ३३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. आज जिल्ह्य़ात परीक्षेदरम्यान सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता.
जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी काही विशिष्ट परीक्षा केंद्रांवर वर्षांनुवर्षे चालणारी गुत्तेदारी मोडीत काढली असून बारावीप्रमाणेच दहावीच्याही परीक्षा अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्या जातील, असे नियोजन ते करीत आहेत. दहावी परीक्षेच्या नियोजनसंदर्भात सोमवारी (दि. २ मार्च)ा जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे.

महेबूबनगरमध्ये आज प्रमोद महाजन यांच्या पुतळ्याचे अनावरण
अंबाजोगाई, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा भारतातील पहिला पूर्णाकृती पुतळा आंध्र प्रदेशातील महेबूबनगर या शहरात उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता होणार आहे. भा. ज. प.चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री यदीयुरप्पा, भा. ज. प.चे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांची पत्नी रेखा महाजन, कन्या पूनम महाजन-राव, राहुल महाजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन कै. प्रमोद महाजन प्रबोधिनीचे सचिव अविनाश तळणीकर यांनी केले आहे.

चौदा विद्यार्थ्यांवर कारवाई
धारूर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेवेळी कॉपी करणाऱ्या १४ विद्यार्थ्यांना आज अंबाजोगाई येथील अध्यापक महाविद्यालयाच्या पथकाने ताब्यात घेतले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील केंद्रावर एकूण ४९३ विद्यार्थी व तेलगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात ९२९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. प्रा. सुहास कांबळे यांच्या पथकाने धारूर व तेलगाव येथील प्रत्येकी सात विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

‘शिवसेनेची नाराजी दूर करणार’
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

शिवसेनेबरोबरची युती अभेद्यच आहे असे सांगून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनेची नाराजी दूर केली जाईल, असे आज स्पष्ट केले. आतापर्यंत जागावाटपाच्या दोन बैठका झाल्या आहेत. आता लवकरच तिसरी बैठक होऊन जागा वाटपही निश्चित केले जाईल, असे त्यांनी सांगितले.भा. ज. प.चे महाराष्ट्राचे प्रभारी व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या गुरुवारी (दि. ५ मार्च) शहरात महिला परिषद आयोजित करण्यात आली आहे. या महिला परिषदेच्या संयोजनासाठी मराठवाडय़ातील आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर श्री. मुंडे पत्रकारांशी बोलत होते. ‘‘बीडमधून निवडणूक लढविण्याची मी संपूर्ण तयारी केली आहे. पक्षाचा आदेश आल्यानंतर मी निवडणूक लढवीन,’’ असेही श्री. मुंडे म्हणाले. महेबूबनगर येथे (कै.) प्रमोद महाजन यांच्या पुतळ्याचे उद्या (शनिवारी) अनावरण होणार आहे. त्यासाठी श्री. मुंडे महेबूबनगरला जाणार आहे.

न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा रग्णालयात मृत्यू
नांदेड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचा सरकारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने आज खळबळ उडाली. पोलिसांनी सांगितले की, नईआबादी परिसरात राहणाऱ्या सय्यद हमीद सय्यद साब (वय २४) याला १५ दिवसांपूर्वी एका जुन्या गुन्ह्य़ात अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. तीन दिवसांपूर्वी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने गुरुगोविंदसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना आज सायंकाळी ६ वाजता त्याचे निधन झाले. सय्यदच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी, सहायक अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी रुग्णालयात धाव घेतली. चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

‘राष्ट्रवादी’-शिवसेना युती अपवित्र ठरेल - शालिनीताई
लातूर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

कोणताही वैचारिक आधार नसलेली राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची संभाव्य युती अपवित्र ठरेल व जनता ती स्वीकारणार नाही, असा दावा क्रांती सेनेच्या अध्यक्ष आमदार शालिनीताई पाटील यांनी केला. त्या म्हणाल्या की, राज्यात क्रांती सेना ४७ जागा स्वबळावर लढविणार असून साताऱ्यात छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून उदयनराजे यांना पाठिंबा देणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागांत पक्ष अधिक लक्ष देईल.

राज्य राखीव दलाची व्हॅन उलटून सहा जखमी
व्हॅनचा टायर फुटल्याने अपघात
उस्मानाबाद, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

सोलापूर राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन उलटून आज सहा जवान जखमी झाले. औरंगाबाद-सोलापूर राज्य मार्गावरील धाराशिव सहकारी साखर कारखान्याजवळ सकाळी ९.३० वाजता हा अपघात झाला. व्हॅनचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या वाहनाला गेल्या दोन दिवसांत झालेला हा दुसरा अपघात आहे.बीड येथील बंदोबस्ताचे काम संपवून सोलापूर राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन (क्रमांक एमएच १३ पीओ १२८) सोलापूरकडे निघाली होती. चोराखळीनजीकच्या धाराशिव कारखान्याजवळ टायर फुटल्यामुळे व्हॅन उलटली. चालक महेश कानडे, सचिन सुभाष बंडगर, संदीप शहाजी ओहाळ, नागनाथ दशरथ डोके, गणेश गोरखनाथ जाधव, संतोष भिकाजी गुरव जखमी झाले. यातील तिघांना उस्मानाबादमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिसांच्या व्हॅनचे टायर खूपच गुळगुळीत झाल्याने ते फुटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेची येरमाळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

उर्दू विभागात बुधवारपासून राष्ट्रीय चर्चासत्र
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऊर्दू विभागाच्या वतीने ४ व ५ मार्चला ‘प्रेमचंद यांच्यानंतर ऊर्दू साहित्यातील प्रश्न व प्रवाह’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन बुधवारी (४ मार्च) सकाळी ११ वाजता कुलसचिव डॉ. दीपक मुळे यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
बीसीयूडीचे संचालक डॉ. ए. जी. खान व कलाविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. नंदकुमार लवांदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या वेळी गुलबर्गा विद्यापीठातील ऊर्दू विभागाचे माजी प्रमुख हमीद सोहदवर्दी यांचे बीजभाषण होणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. महम्मद गयासुद्दीन व निमंत्रक डॉ. सिद्दीक मोहियोद्दीन यांनी दिली.

शांतता फेरीला प्रतिसाद
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आर्ट ऑफ लिव्हिंग, व्यापारी महासंघ आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पर्सनल मॅनेजमेन्ट (एनआयपीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी शांतता फेरी काढण्यात आली. यात खासदार चंद्रकांत खैरेवोहरवासियांनी सहभाग नोंदविला.श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात २ मार्चपासून सत्संग, प्राणायाम, ध्यानसाधना शिबिर होणार आहे.शहरात ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या हजारो साधकांनी श्री श्रींच्या कार्यक्रमाची तयारी चालविली आहे. शुक्रवारी शांतता फेरी काढण्यात आली. श्री. खैरे यांच्या हस्ते फेरीला प्रारंभ झाला.

‘निरोगी डोळे’ कार्यपुस्तिकेचे लोकार्पण
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

नेत्र आरोग्य संवर्धनार्थ साईट अँड लाईफच्या वतीने प्रायोजित केलेल्या ‘निरोगी डोळे’ या मराठीतील कार्यपुस्तिकेचे लोकार्पण शुक्रवारी सकाळी येथील संत एकनाथ रंगमंदिरात झाले.
‘साईट अँड लाईफ’ या संस्थेचे महासचिव स्वित्झर्लंडचे डॉ. क्लाऊस क्रेमर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झाला. अध्यक्षस्थानी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण होते. माजी मंत्री बदामराव पंडित, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक प्राध्यापक आणि नेत्रशल्यचिकित्सक डॉ. विलास वांगीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एस. गवळी,मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण देवगावकर या वेळी उपस्थित होते. साईट अँड लाईफ या संस्थेच्या वतीने ही कार्यपुस्तिका काढण्यात आली आहे.

बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचे निदर्शने
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

औरंगाबाद बीएसएनएलमध्ये कंत्राटी कामगारांवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या विरोधात बीएसएनएल लेबर व कॉन्ट्रॅक्ट लेबर या संघटनेतर्फे शुक्रवारी दूरसंचार महाप्रबंधकाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्व बीएसएनएल कंत्राटी कामगारांना निर्धारित नियमानुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. विनाकारण आणि तक्रारीचा आधार न ठरविता कामगारांना कमी करण्यात येऊ नये, कंत्राटदार बदलला तरी कामगारांना काढण्यात येऊ नये, प्रतिवर्षी कंत्राटी कामगारांना बोनस मिळाला पाहिजे, अशा विविध मागण्यांसाठी ही निदर्शने जिल्हाध्यक्ष जितेंद्र घोरपडे, सचिव किशोर काळे आणि कोषाध्यक्ष गंगाधर काळे यांच्या नेतृत्वाखाली झाली.

माणिकराव शिंदे यांचे निधन
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

नांदेड येथील रहिवासी माणिकराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय स्टेट बँकेच्या समर्थनगर शाखेचे प्रमुख आणि भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल शिंदे ह त्यांचे चिरंजीव होत.

गंगापूर येथे बुधवारी शेतकरी मेळावा
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

गंगापूर तालुका काँग्रेस समितीच्या वतीने येत्या बुधवारी (दि.३ मार्च) गंगापूर येथे शेतकरी आणि महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

कौटुंबिक लोकन्यायालय आज
औरंगाबाद, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

जिल्हा विधी प्राधिकरण आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२८ फेब्रुवारी) कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता या न्यायालयाचे उद्घाटन होईल. प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. के. हनुवते यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेच सुनावणीस सुरुवात होणार आहे.

‘विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्राकडे लक्ष केंद्रित करावे’
बीड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

शिक्षणाबरोबरच साहित्य, कला, नाटय़, संगीत क्षेत्राची दालने खुली झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्राकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
आदर्श नवगण व विनायक युवक कल्याण शिक्षण संस्थांच्या वतीने कलाविष्कार स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. या वेळी शिक्षणाधिकारी डी. टी. सोनवणे, माजी आमदार जनार्दन तुपे, बदामराव पंडित आदी उपस्थित होते. श्री. क्षीरसागर म्हणाले, संगीताने अनादी काळापासून माणसाच्या मनाला भुरळ घातली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच साहित्य, कला, नाटय़, संगीत या बाबींवरही आपले लक्ष केंद्रित करावे. कॉपीचे समूळ उच्चाटन करून जिल्ह्य़ावरील ठपका दूर करावा, असे ही त्यांनी सांगितले.

पंखे , कूलर व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत
सोयगाव, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

उन्हाळ्याच्या प्रारंभी पंखे, कुलर उद्योगावर मंदीचे सावट पसरले असून विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात कुलरची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. नामांकित कंपन्यांच्या कुलरपेक्षा गृह उद्योगातील कुलर स्वस्त असल्याने यंदा कुलर दोन हजार रुपयांपासून मिळू लागले आहेत. मंदीचे सावट असल्याने कुलर विक्रीचा उद्योग थंडावला आहे. विक्रेत्यांनी कुलरच्या किमतीत विशेष सूट देऊन ग्राहकाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. उन्हाळ्यात मात्र पंख्यांची मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे स्वस्त कुलर व पंखे बाजारात असताना ग्राहकांची मात्र प्रतीक्षा आहे.

‘माहिती, जैवतंत्रज्ञाचा विकास सर्वात जलद गतीने’
उदगीर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

जगाचे रूपांतर एका खेडय़ासारखे झाले आहे. जगाचे व जगण्याचे संदर्भ बदलत असले तरी माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञाचा जगात सर्वात जलद गतीने विकास होतो आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू कॅप्टन व्ही. व्ही. ढोबळे यांनी केले.येथील एम.सी.ए. महाविद्यालयात एका राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सुधीर जगताप होते. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. सुधीर जगताप म्हणाले की, माहिती-तंत्रज्ञानामुळे सबंध मानवाच्या जीवनाचा दर्जा उंचावतो. या परिषदेसाठी देशभरातून १५ शास्त्रज्ञ व ३००च्या वर संशोधक अभ्यासक सहभागी झाले आहेत.

शिवा संदेश रथयात्रा आज जळकोटमध्ये
जळकोट, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

लिंगायत वाणी व लिंगायत या जातीसह उपजातींना ‘ओबीसी’चे आरक्षण मिळावे यासाठी काढण्यात आलेली शिवा संदेश रथयात्रा उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता येथे येत आहे.
इतर आरक्षणाला धक्का न लावता लिंगायत समाजासाठी वेगळे पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असून ती मागणी पूर्ण करण्यासाठी ही रथयात्रा काढण्यात आली आहे.

पदाचा वापर जनतेच्या हितासाठी - मोदी
अंबाजोगाई, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

नगराध्यक्षपद, राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे उपाध्यक्षपद, तसेच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालकपद ही सर्व पदे आपल्याला जनतेच्या आशीर्वादानेच मिळाली. त्यामुळे या पदांचा वापर जनतेच्या हितासाठीच करू, अशी ग्वाही नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दली. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे उपाध्यक्षपद व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालकपद मिळाल्याद्दल श्री. मोदी यांचा योगश्वरी नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष महेमूद दादामियाँ यांच्या फार्महाऊसवर सत्कार करण्यात आला. राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अ. र. पटेल व सचिव रमाकांत उडाणशिव यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. श्री. मोदी म्हणाले की, जनसामान्यांचे कुठलेही काम असो ते अग्रक्रमाने सोडविणे आपले कर्तव्य समजून आपण प्रामाणिकपणे पार पाडले व सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. माजी उपाध्यक्ष सय्यद मुर्तूजा मोमीन यांच्या बहारदार शेर-शायरीच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.

‘कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वसतिगृहाचे भूमिपूजन
लातूर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

लातूरचे कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय हे २१ व्या शतकाचा वेध घेणारे महाविद्यालय असून हे महाविद्यालय जागतिक पातळीवर ठसा उमटवेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले. कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, त्र्यंबकदास झंवर आदी उपस्थित होते.यावेळी कृषीमंत्री थोरात यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत राहील, अशी ग्वाही दिली. अ‍ॅड्. बेद्रे यांनी महाविद्यालयातील पदवी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस विलासराव देशमुख सुवर्णपदक देण्याची घोषणा केली. समारोप शिक्षण संचालक व अधिष्ठाता डॉ. प्र. रा. शिवपुजे यांनी केला. या वेळी अमित देशमुख, आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, जिल्हाधिकारी एकनाथ डवले, उपनगराध्यक्ष मोईज शेख, प्राचार्य हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण यांच्यामुळेच वीज उपकेंद्र मंजूर - राजेश टोपे
जालना, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

मानेगाव जहांगीर व डांबरी येथील वीज उपकेंद्रे आमदार अरविंद चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच मंजूर झाली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री राजेश टोपे यांनी केले. मानेगाव व डांबरी येथील ३३ के. व्ही. वीज उपकेंद्रांचे भूमिपूजन श्री. टोपे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार अरविंद चव्हाण होते. मुख्य अभियंता किशोर सिरसीकर, अधीक्षक अभियंता इरवाडकर या प्रसंगी उपस्थित होते. श्री. टोपे म्हणाले की, या उपकेंद्रामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगली नियमित वीज उपलब्ध होईल. वेळोवेळी वीज खंडित होणार नाही. आमदार चव्हाण यांनी श्री. टोपे यांनी विकासाची कामे करताना अंबड-घनसावंगीसोबतच जालना-बदनापूर तालुक्यांच्या विकासाकडेही लक्ष द्यावे,अशी मागणी केली. आमदार चव्हाण यांची पक्षाला गरज असून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल, असेही श्री. टोपे यांनी या प्रसंगी सांगितले. सूत्रसंचालन बाबासाहेब रायमल यांनी केले. आभार एस. आर. इरवाडकर यांनी केले.

‘वाढीव वीजकपातीची कळ उद्यापर्यंत सोसा’
लातूर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

औद्योगिक वसाहतीतील १३२ केव्ही विद्युत उपकेंद्रातील २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे लातूर शहराच्या काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून ग्राहकांनी १ मार्चपर्यंत कळ सोसण्याचे आवाहन महापारेषणने केले आहे. काल रात्री ७.३० वाजता ट्रान्सफॉर्मर बंद पडला. त्यामुळे शहराला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या कार्यान्वीत होऊ शकल्या नाहीत. ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम मंडळाने हाती घेतले असले तरी ते काम अद्यापि पूर्ण झाले नाही. त्यामुळे काही भागात अतिरिक्त वीजकपात सुरू आहे. बंद पडलेला ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असून रविवार, १ मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे पारेषणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजीची परीक्षा आज होती. व आदल्या दिवशी वीज गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

केळी परिषदेचे उद्घाटन
लातूर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

सिद्धेश्वर अ‍ॅग्रोटेक २००९ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या केळी परिषदेचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मन्मथअप्पा किडे होते. कार्यक्रमास मुख्य संयोजक विक्रम गोजमगुंडे, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे, राज्य साश्ररता परिषदेचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, जिल्हाधिकारी एकनाथ डवले, सिद्धेश्वर देवस्थानचे सचिव ज्ञानोबा गोपे, जैन एरिगेशन टिश्यू कल्चरचे विभागप्रमुख के. बी. पाटील, रावसाहेब लकडे आदींची यावेळी उपस्थित होते.

सूर्यकांता पाटील यांच्या उपक्रमांना सरकारचे पाठबळ - मुख्यमंत्री
हिंगोली, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघासाठी व संपूर्ण महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारचा निधी महाराष्ट्राला मिळवून देणाऱ्या केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या लोककल्याणकारी उपक्रमांना राज्य सरकारचे सर्वार्थाने पाठबळ राहील, असे उद्गार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले. शहरातील नऊ झोपडपट्टय़ांमध्ये २ हजार ८७७ घरकुलाची निर्मिती सर्व सामाजिक आणि मूलभूत सुविधांसह उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाला त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अनिस अहमद, जयप्रकाश दांडेगावकर, रजनीताई सातव, भाऊराव गोरेगावकर, गजानन घुगे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वागत नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले.