Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘सेलिब्रिटींना तिकीट देणार नाही’
लोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय मनसे दोन दिवसांत घेणार - राज ठाकरे
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सेलिब्रिटींना निवडणुकीत उमेदवारी देण्याची धडपड करीत असले तरी मनसे मात्र अशा भाडय़ाच्या उमेदवारांना तिकीट देणार नाही, तर पक्षकार्यकर्त्यांनाच देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी आज केली. तसेच लोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असेही राज यांनी स्पष्ट केले. पक्षातील सर्व संपर्कप्रमुखपदे रद्द करीत असल्याचा झटकाही राज यांनी आज पदाधिकाऱ्यांना दिला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कातच टाकली. पक्षाच्या नव्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन आणि पक्षाच्या माटुंगा रोड येथील नव्या मुख्य कार्यालयाची घोषणा राज यांनी रंगशारदात आयोजिलेल्या कार्यक्रमात केली.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जनसेवा करण्यासाठी ज्या व्यक्तींकडे वेळ आहे अशा व्यक्तींनाच मनसे उमेदवारी देणार आहे. सपाने अभिनेता संजय दत्त यांना निवडणुकीचे तिकीट दिले तर शिवसेना माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांत आहे. मात्र आपण अशा प्रकारे सेलिब्रिटींना तिकीट देणार नाही. हे सेलिब्रिटी निवडून आले आणि मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसला तर त्याचा जाब मतदार आपल्याला विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असे राज म्हणाले.
राज्यातील खासदारांवर टीका करताना ते म्हणाले की, संसदेत राज्याचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे प्रश्न प्रभावीपणे मांडत नाहीत. जो उमेदवार संसदेत राज्याचे प्रश्न न डगमगता मांडेल त्यालाच आपल्याला उमेदवारी द्यावयाची आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मनसेचे कार्यालय आजपासून राजगड येथून रुपारेल महाविद्यालयामागील ‘मातोश्री टॉवर’मध्ये हलविण्यात आले असून ‘महाराष्ट्र माझा’ या मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर संपादित पाक्षिकाचे प्रकाशन रंगशारदात झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. या प्रकाशन समारंभानिमित्त सांगीतिक कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.