Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पवारांची भलामण करीत आदिकांची काँग्रेसवर टीका
मुंबई, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा व नंतर एकसंध झालेल्या काँग्रेस पक्षात पंतप्रधानपद पवारांकडे सोपवावे, अशी मागणी मंत्रीपद नाकारल्याने संतप्त झालेल्या गोविंदराव आदिक यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आज जाहीररीत्या केली. तसेच असा प्रयत्न न झाल्यास आपल्याला या दिशेने वाटचाल सुरू करावी लागेल, असे विधान करून काँग्रेस पक्षाला आपण रामराम करणार असल्याचेही जवळजवळ स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात एकेकाळी आदिक हे पवारांचे निकटवर्तीय मानले जात. नंतर पवारांशी त्यांचे फाटले. काँग्रेसने मंत्रिपद नाकारल्याने तसेच नगर जिल्ह्य़ातील राजकीय विरोधक बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र राधाकृष्ण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे आदिक आणखीनच बिथरले. त्यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांशी चर्चा केली तेव्हाच ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले होते. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचा आधीच पवारांवर राग आहे. त्याच पवारांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांच्याकडे पंतप्रधानपद सोपविण्याची मागणी सोनिया गांधी यांच्याकडे करून आदिकांनी आगीत तेल ओतले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हे अननुभवी आहेत. त्यांना परिपक्वता येण्यााठी पाच ते दहा वर्षे लागतील. एखाद्या ज्येष्ठ व जाणत्या नेत्याच्या हाताखाली काम केल्यास भविष्यात ते देशाचे नेतृत्व करू शकतील. पवारांना काँग्रेस पक्षात सामील करून त्यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवावे म्हणजे राहुल गांधी यांच्या हाताखाली काम करतील असेच आदिकांनी सुचवले पवारांच्या काँग्रेस प्रवेशासाठी आपण पुढाकार घ्यावा, असेही आदिक यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मंत्रिपद नाकारल्यानंतर आदिकांना काँग्रेस पक्ष हा गुंड, समाजकंटक, बदफैली, व्यसनी, छंदीफंदी व भ्रष्टाचारी कार्यकर्त्यांचा असल्याचा साक्षात्कार झाला आहे. एकूणच काँग्रेस नेतृत्वावर टीका करून पक्षाने हकालपट्टी करावी अशीच आदिकांची इच्छा दिसते.