Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

फेब्रुवारीतच पारा ४० अंशांजवळ
या वेळचा उन्हाळा त्रासदायक ठरणार?
पुणे, २७ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

 

फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. परभणीत पारा ३९.८ अंशांवर गेला. त्यामुळे या उन्हाळय़ात उकाडा किती त्रासदायक ठरणार, याचीच उत्सुकता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र राहणार असल्याने असाच उकाडा सहन करावा लागणार आहे.
राज्यातील सरासरी आकडे पाहिले तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ३४-३५ अंशांच्या आसपास असते. उन्हाळय़ात अतिशय उष्ण असणाऱ्या उत्तम महाराष्ट्रात किंवा विदर्भ-मराठवाडय़ातही फेब्रुवारी महिन्यात तापमान फारसे वाढत नाही. या वेळी मात्र फेब्रुवारी महिना संपण्याच्या आतच तापमानाचे आकडे ४० अंशांजवळ पोहोचले आहेत. परभणीतील ३९.८ अंशांव्यतिरिक्त सांगली (३९.३ अंश), सोलापूर (३९.३), अकोला (३९), नागपूर (३९) येथेसुद्धा तापमान सरासरीच्या तुलनेत ४-५ अंशांनी जास्त होते. विशेष म्हणजे राज्याच्या सर्वच भागांतील तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा तापमानात बरीच वाढ झाली आहे. तिथे आजचे कमाल तापमान सरासरीपेक्षा सात अंशांनी जास्त म्हणजे ३३.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. राज्यात दुपारच्या या उकाडय़ाबरोबरच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वच भागांत ही स्थिती होती.
राज्यात इतर ठिकाणी आज नोंद झालेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे- (आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात त्याची सरासरीशी तुलना दिली आहे)- मुंबई ३२.४ (२), डहाणू ३१.६ (३), रत्नागिरी ३४.३ (३), महाबळेश्वर ३३.९ (७), नाशिक ३७.३ (४), पुणे ३७.४ (४), सांगली ३९.३ (५), सातारा ३७.८, कोल्हापूर ३७.६ (४), सोलापूर ३९.३ (४), औरंगाबाद ३७ (४), परभणी ३९.८ (५), अकोला ३९ (५), नागपूर ३९ (५).