Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

अरुण गवळी यांची ‘हत्ती’वर बसून दिल्लीस्वारी
मुंबई, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

‘गली गली में एक ही शोर हाथी चला दिल्ली की ओर’ ही घोषणा बहुजन समाज पक्षात कांशीराम यांच्यापासूनच लोकप्रिय आहे. आता बहेन मायावती यांना देशाच्या पंतप्रधानपदी बसविण्याच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी स्वत: अरुण गवळी उर्फ डॅडीच प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत. या पराकाष्ठेचे बक्षिस त्यांना आगाऊच देण्यात आले आहे. मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची बसपाची उमेदवारी बसपाने डॅडींना बहाल केली आहे. बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास गरुड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की, अरुण गवळी यांचा अखिल भारतीय सेना हा पक्षच बहुजन समाज पक्षात विलीन करण्याचे गवळी यांनी मान्य केले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण-मध्य मुंबईमधून गवळी हे बसपाचे लोकसभेचे उमेदवार असतील. गवळी हे सध्या चिंचपोकळी मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांची जनमानसातील प्रतिमा ‘डॉन’ अशी असली तरीही मतदारसंघामध्ये मात्र ते अत्यंत लोकप्रिय आमदार आहेत. अशा लोकप्रिय आमदारामुळे दक्षिण-मध्य मुंबईतून यावेळी बहुजन समाज पक्षाचा उमेदवारच दिल्लीला जाणार हे नक्की आहे, असे गरुड यांनी यावेळी सांगितले.
दक्षिण-मध्य मुंबई म्हणजे पूर्वीच्या उत्तर-मध्य मुंबईतून सध्या काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे गेल्या वेळी मनोहर जोशींसारख्या मोठय़ा नेत्याला हरवून विजयी झाले होते. यंदा या मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवारच मिळत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे गायकवाड तसे बिनधास्त होते. मात्र काँग्रेसचेच गुरुदास कामत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याने गायकवाड यांना पक्षांतर्गतच भीती आहे. त्यात आता गवळी यांच्या उमेदवारीमुळे नवी स्पर्धा निर्माण होणार आहे. गवळी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येच्या आरोपामध्ये मोक्का कायद्याखाली आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे ते निवडणूकही तुरुंगातूनच लढवतील असे दिसते. मात्र आरोप अद्याप सिद्ध व्हायचा असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे दिसते. गवळी यांच्या पक्षाचे दोन नगरसेवक असून तेही आता बहुजन समाज पक्षात प्रवेश करणार आहेत. गवळी यांच्या कन्या गीता गवळी व सुनील घाटे हे दोघे नगरसेवकही आता बहुजन समाज पक्षाला बोनस म्हणून भेट मिळणार आहेत.