Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘स्ट्रॅण्ड बुक स्टॉल’चे संस्थापक टी. एन. शानभाग यांचे निधन
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

सर्वसामान्य वाचक ते विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ पुस्तकप्रेमी आणि पुस्तके यांच्यातील लोकप्रिय दुवा असलेले स्ट्रॅण्ड बुक स्टॉलचे संस्थापक पद्मश्री टी. एन. शानभाग यांचे आज वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, विवाहित कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
पुस्तकांच्या दुकानाकडे शानभाग यांनी कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. स्वत: शानभाग हे एक चांगले वाचक आणि साहित्यप्रेमी होते. केंद्र शासनानेही शानभाग यांना ‘पद्मश्री’ हा नागरी सन्मान देऊन गौरविले होते. फोर्ट परिसरातील सर पी. एम. मार्गावरील शानभाग यांचे ‘स्ट्रॅण्ड बुक हाऊस’ हे केवळ पुस्तकांचे दुकान नव्हते तर ते साहित्य-सांस्कृतिक वर्तुळातील रसिकांचे एकमेकांना भेटण्याचे आणि गप्पांचे फड जमविण्याचे एक हक्काचे ठिकाण होते. शानभाग यांच्या निधनाने पुस्तकांचा खरा मित्र हरपल्याची भावना साहित्य आणि पुस्तकप्रेमींमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
शानभाग यांचा जन्म दक्षिण कर्नाटकातील एका गावात झाला. त्यांचे वडील मोठे जमीनदार होते. ते दोन वर्षांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. शानभाग यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कर्नाटकातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सेंट झेविअर्स महाविद्यालयात दाखल झाले. त्याच काळात ते अर्धवेळ नोकरीही करत होते. त्या काळात ताडदेव ते महाविद्यालयापर्यंत ट्रामचे पाच रुपये वाचवून चालत जात. आणि बचत केलेल्या पैशातून पुस्तके विकत घेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुस्तकविक्रीचा व्यवसाय करायचा असे त्यांनी ठरवले होते. काही दिवस रस्त्यावर पुस्तकांची विक्री केल्यानंतर एकदा स्ट्रॅण्ड चित्रपटगृह परिसरातील एक मोकळी जागा त्यांना दिसली. त्यांनी तातडीने चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे जाऊन ही जागा मिळविण्याबाबत विचारणा केली. त्यांनी जागेचे मालक के. के. मोदी यांची भेट घेण्यास सांगितले. मोदी यांची भेट झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत दरमहा ४५० रुपये इतके भाडे देऊन त्यांना ही जागा मिळाली. पुढे मेहनतीने शानभाग यांनी हा व्यवसाय वाढवला. पुस्तकविक्रीच्या क्षेत्रात आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करून आपल्या नावाचा आणि दुकानाचा खास ठसा उमटवला.
शानभाग यांनी २० नोव्हेंबर १९४८ मध्ये स्ट्रॅण्ड बुक स्टॉलची स्थापना केली. त्यांच्या दुकानात सर्व प्रकारच्या पुस्तकांवर २० टक्के इतकी सवलत मिळत असे. तर काही पुस्तकांवर चक्क ६५ टक्क्यांपर्यतही सवलत देण्यात येत असे. स्टिफन हॉकींग यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाची मूळ किंमत १ हजार ७७५ रुपये होती. मात्र ‘स्ट्रॅण्ड’मध्ये ते ६५ टक्के सवलत देऊन ६२५ रुपयांना त्याची विक्री करण्यात आली. तसेच नोबेल पुरस्कार विजेते व्ही. एस. नायपॉल यांचे ‘हाफ ए लाईफ’ हे १ हजार २०५ रुपये किंमतीचे पुस्तक ७७ टक्के इतकी सवलत देऊन अवघ्या २७५ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. गेली ५७ वर्षे शानभाग दररोज पुस्तकांच्या दुकानात येत असत. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापर्यंतचे उच्चपदस्थ पुस्तकप्रेमी आपल्या दुकानात पुस्तक खरेदीसाठी येऊन गेल्याचे शानभाग अभिमानाने सांगत असत. याच डॉ. कलाम यांच्याकडून आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला, याचाही ते गौरवाने उल्लेख करत. रात्री उशिरा शानभाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.