Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

बीएमएमच्या मराठीकरणाला अखेर मान्यता
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

मुंबई विद्यापीठाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या ‘बॅचलर ऑफ मास मिडीया’ (बीएमएम) या इंग्रजाळलेल्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र व मराठीशी संबंधित विषयांचा समावेश करण्याचा निर्णय आज विद्यापीठाच्या विद्वत परिषदेत घेण्यात आला. एवढेच नव्हे तर, मराठी भाषेतील स्वतंत्र आराखडय़ालाही विद्वत परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषेतील अभ्यासक्रम विविध महाविद्यालयांतून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज योगायोगाने मराठी भाषादिनाच्या पाश्र्वभूमीवरच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठातील पदव्युत्तर पत्रकारिता विभागाचे प्रमुख संजय रानडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने ‘बीएमएम’चा सुधारीत मसुदा तयार केला आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार अरूण साधू, ‘लोकसत्ता’चे महानगर संपादक विनायक परब, मुंबई मराठी पत्रकार संघाचे कार्यवाह प्रसाद मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, इकॉनॉमिक्स टाइम्सचे राजकीय संपादक गिरीश कुबेर, महानगरचे कार्यकारी संपादक युवराज मोहिते आदींचा या समितीमध्ये समावेश होता. समितीने सध्या अस्तित्वात असलेल्या ‘बीएमएम’मध्ये अनेक सुधारणा केल्या असून या अभ्यासक्रमाचा मराठी आराखडाही तयार केला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय चळवळी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील वृत्तपत्रांची भूमिका, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अशी महत्त्वाची प्रकरणे आता बीएमएममध्ये (इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांतून) नव्याने शिकविली जातील. ‘बीएमएम’मध्ये सध्या सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयांमध्ये अनेक त्रुटी असून पत्रकारितेशी संबंधित ज्ञान या विषयातून मिळत नाही. त्यामुळे या विषयांची पत्रकारितेशी सांगड घालण्यात आल्याचा मुद्दा संजय रानडे यांनी मांडला. समितीने सुचविलेल्या बदलांसह वेगळा मराठी बीएमएम अभ्यासक्रम सुरू करा, पण हे बदल सध्याच्या इंग्रजी बीएमएममध्ये करण्यास काही सदस्यांनी विरोध दर्शविला. त्यावर रानडे व विनायक परब यांनी आक्षेप घेत कोणत्याही भाषेच्या वृत्तपत्रातील पत्रकारांमध्ये फरक नसतो. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सर्वच भाषिक वृत्तपत्रातील पत्रकारांच्या कामाचे स्वरूप एकच असते. त्यामुळे बीएमएमच्या सर्व भाषेतील विद्यार्थ्यांना मुलभूत ज्ञान मिळायला हवे, असा मुद्दा मांडला. ‘बीएमएम’मधील गंभीर त्रुटींवर उपस्थित सदस्यांनीही चिंता व्यक्त करून नव्या बदलास पाठिंबा व्यक्त केला. अनिता राणे, डॉ. उदय साळुंखे या सदस्यांनी ‘बीएमएम’मध्ये बदल गरजेचा असल्याचे सांगितले. स्वत: कुलगुरू डॉ. विजय खोले, प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत तसेच बहुतांशी सदस्यांनीही ‘बीएमएम’मधील बदलांचे समर्थन केले. इंग्रजाळलेल्या ‘बीएमएम’ अभ्यासक्रमातील अनागोंदी कारभाराच्या बातम्या ‘लोकसत्ता’ने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रसिद्ध केल्या होत्या. ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर विद्यापीठानेही दखल घेऊन ‘बीएमएम’मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मराठी बीएमएम सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास सहकार्य करण्याची तयारी ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने दर्शविली आहे. इच्छूक महाविद्यालयांनी केंद्राचे पदाधिकारी दीपक पवार यांच्याशी ९८२०४३७६६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधवा.