Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

परीक्षा केंद्रांवर विजेची पर्यायी व्यवस्था करा
उच्च न्यायालयाचा आदेश
मुंबई, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या वेळी ज्या केंद्रांवर भारनियमनामुळे नियमित वीज पुरवठा उपलब्ध असणार नाही तेथे इन्व्हर्टर अथवा जनरेटर लावून विजेची पर्यायी व्यवस्था केली जावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. उच्च माध्यमिक परीक्षा गुरुवारपासून सुरु झाली आहे तर शालान्त परीक्षा त्यानंतर मार्चमध्ये होणार आहे.
परीक्षेच्या वेळी तरी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी निदान परीक्षा केंद्रे तरी भारनियमनातून वगळावीत,अशी जनहित याचिका खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथीलएक सामाजिक कार्यकर्ते विष्णु गवळी यांनी गेल्या वर्षीच्या परीक्षांपूर्वी केली होती. त्यावर न्यायालयाने सर्व संबंधितांनी एकत्र बसून या समस्येतून कसा मार्ग काढता येईल, यावर विचार करण्यास सांगितले होते. त्यानुसार बैठक झाली. त्या बैठकीचे इतिवृत्त न्यायालयास सादर केले गेले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी भारनियमनाचा त्रास होऊ नये यासाठी शक्य ती सर्व पावले टाकली जातील, असे आश्वासन प्रतिवादींनी दिल्याने त्या वेळी न्यायालयाने गवळी यांची याचिका निकाली काढली होती.
गेल्या वर्षीच्या बैठकीत असे ठरले होते की, जादा वीज खरेदी करून किंवा स्वतंत्र फीडर सुरू करून परीक्षा केंद्रांना परीक्षेच्या वेळी अविरत वीजपुरवठय़ाची लगेच सोय करणे शक्य नाही. तरीही आगीमी वर्षीच्या परीक्षेपर्यंत परीक्षा केंद्रांवर जनरेटरसारखी पर्यायी व्यवस्था करणे शक्य होईल. या आदेशाचे पालन झाले नाही व विद्यार्थ्यांना यंदाही वीज नसलेल्या अवस्थेतच परीक्षा द्यावी लागल्याने विष्णु गवळी यांनी अवमान याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर देण्यासाठी सरकार, वीज मंडळ इत्यादी प्रतिवादींनी वेळ मागितला. त्यानुसार १३ मार्चपर्यंत वेळ दिली गेली. मात्र प्रतिवादींनी आधीच्या आदेशाचे पालन करावे, असे न्यायालयाने सांगितले.