Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

भारतीय अभिजात संगीतासाठी राज्याचे विशेष पॅकेज
* पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने युवा शिष्यवृत्ती योजना
* मुंबईत दरवर्षी ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर संगीत महोत्सव
* किराणा घराण्याचे शिक्षण देण्यासाठी गुरुकुल
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

राज्य शासनाने भारतीय अभिजात संगीतासाठी आज एका विशेष पॅकेजची घोषणा केली असून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव आणि पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ मिळाल्याचे औचित्य साधून हे पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची सविस्तर माहिती दिली. पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना, मुंबईत दरवर्षी ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर संगीत महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व स्मारकाच्या सहकार्याने किराणा घराण्याचे शिक्षण देण्यासाठी गुरुकूल आणि अन्य काही योजनांचा यात समावेश आहे. या आणि अन्य सर्व उपक्रमांसाठी दरवर्षी दोन कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
भीमसेन जोशी यांच्या नावाने वय वर्षे १० ते १७ आणि १८ ते ३५ अशा दोन गटांसाठी दहाजणांना नऊ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. एका कलावंताला दोन वर्षांसाठी दरमहा अनुक्रमे पाच हजार आणि १० हजार अशी शिष्यवृत्ती असेल. भीमसेन जोशी यांच्या नावाने मुंबईत दरवर्षी तीन ठिकाणी पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर तीन दिवसांचे संगीत महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलावंताला एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राज्यभरातील विविध संस्थांना राज्यशासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शास्त्रीय आणि भारतीय अभिजात संगीतासाठी जाहीर केलेल्या या पॅकेजसाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार असून २००९-१० या आर्थिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीताची परंपरा अधिक जोमाने पुढे जावी आणि राज्यातील कलावंताना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.