Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

ठाण्यातील डंपिंग ग्राऊंडचा निषेध
मुंबई पालिकेसमोर ‘कचरा फेको’ आंदोलन
ठाणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

 

गेले वर्षभर सातत्याने सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही त्याची दखल मुंबई महापालिका घेत नसल्याने संतप्त झालेल्या ठाणे शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री कचऱ्याचे ट्रक थेट मुंबई पालिका मुख्यालयासमोर रिकामे करून प्रशासनास जोरदार दणका दिला. त्यामुळे कचऱ्यावरून सुरू असलेले दोन शहरांतील शीतयुद्ध आता पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई शहरात गोळा होणारा घनकचरा हरिओमनगर येथे टाकला जातो. कचऱ्याच्या या दुर्गंधीने गेली काही वर्षे ठाणेकर हैराण आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीने गेले वर्षभर विविध मार्गाने आंदोलन करून मुंबई पालिकेचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. ऐन गणेशोत्सवात चर मारून मुंबई महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडय़ा अडविण्याबरोबरच गाडय़ा फोडणे, आयुक्तांना व महापौरांना डेटॉलची भेट पाठविणे, ठाणेकरांना आजारावर उपचार घेण्यासाठी स्थायी समितीने अर्थसंकल्पात तरतूद करावी आदी पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले होते.
मध्यंतरी सेना-भाजपनेही मुंबई महापालिकेविरोधात भूमिका घेऊन ठाण्याच्या सीमेवरील डंपिंग ग्राऊंड अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. त्यानंतरही मुंबई महापालिकेने काहीच कारवाई केली नाही. परिणामी कचऱ्याच्या दुर्गंधीने ठाणेकर हैराण झाले आहेत. आजवर कोपरी-नौपाडा भागापुरती पसरणारी ही दुर्गंधी आता माजिवडय़ापर्यंत पोहोचली असून, लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद पाटील, नजीब मुल्ला, नितीन पाटील व अन्य कार्यकर्त्यांनी रात्री मुंबई महापालिकेची कचऱ्याची गाडी ताब्यात घेऊन पुन्हा मुंबईला नेऊन पालिका मुख्यालयासमोर खाली केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर मुंबई महापालिकेत खळबळ उडाली.