Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

पश्चिम रेल्वेवर लवकरच १५ डब्यांच्या लोकल
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

पश्चिम रेल्वेवर लवकरच ठराविक स्थानकांवर थांबणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. बोरिवली स्थानकात आणखी एक फलाट बांधण्यात येणार आहे. नऊ डब्याच्या लोकलच्या ३२ फेऱ्या मार्चपासून १२ डब्यांच्या होणार आहेत. याखेरीज येत्या काही महिन्यांत प्रवाशांना मोबाईलद्वारे उपनगरी तिकिटे मोबाईलद्वारे मिळू शकणार आहेत.
मुंबई सेंट्रल-विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकल चालविणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य आहे. या लोकल केवळ दादर, अंधेरी, बोरिवली, वसई आदी स्थानकांवर थांबतील. मात्र दादर येथे नव्याने बांधलेल्या टर्मिनसला दक्षिण बाजूने जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हे शक्य होईल. मात्र त्यासाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही, असे सुतोवाच पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आर. एन. वर्मा यांनी केले. आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पश्चिम रेल्वेने बोरिवली स्थानकातील समस्या सोडविण्यासाठी बेस्ट, पोलीस, महापालिका आणि एमएमआरडीएला मदतीची विनंती केली आहे. याखेरीज तेथे ‘सहा-ए’ क्रमांकाचा आणखी एक फलाट बांधण्याची योजना आहे. त्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, असे वर्मा यांनी सांगितले. एमयूटीपीच्या नव्या आधुनिक डीसी-एसी लोकल सदोष असल्याने, त्या बोरिवली-विरारदरम्यानच्या दोन नव्या रेल्वेमार्गावर चालविण्यात येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्या या रेल्वेमार्गावर कधीपर्यंत लोकल धावू शकतील, या प्रश्नाचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नव्हते. एमयूटीपीच्या २१ पैकी १६ लोकल पश्चिम रेल्वेने ताफ्यात दाखल केल्या आहेत. १ मार्चपासून नऊ डबा लोकलच्या ३२ फेऱ्या १२ डबा करण्यात येणार आहेत व त्यापैकी बहुतांश बोरिवली-विरार पट्टय़ात चालविल्या जाणार आहेत, असे वर्मा यांनी नमूद केले. याखेरीज प्रवाशांना मोबाईलद्वारे तिकिटे देण्याची योजना येत्या दोन महिन्यांत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येईल. तसेच रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळतात गो मुंबई कार्ड योजना सुरू केली जाईल.

‘जीएम’ सापडले.. प्रश्नांच्या कात्रीत!
पदभार स्वीकारल्यावर तब्बल दोन महिन्यांनंतर मीडियाला सामोरे जाणाऱ्या महाव्यवस्थापक आर. एन. वर्मा यांना आज प्रश्नांच्या भडिमाराला तोंड द्यावे लागले. पत्रकारांच्या प्रश्नांमुळे कात्रीत सापडलेल्या महाव्यवस्थापकांनी अनेकदा उत्तरांचा ट्रॅक बदलला. प्रश्न संपण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहून, त्यांना अखेर पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली. आपण बोरिवली स्थानकाला भेट दिली होती का? या पहिल्या-दुसऱ्याच प्रश्नाने महाव्यवस्थापकांची दांडी उडाली. स्वत: गेलो नसलो तरी, विभागीय अधिकाऱ्यांनी अनेकदा भेटी दिल्याचे त्यांनी सांगितले. विरार-बोरिवलीदरम्यानच्या नव्या दुहेरी मार्गाचा पुरेपुर वापर केला जात नसल्याबाबत विचारले असता, एमयूटीपीच्या नव्या लोकल सदोष असल्याचे कारण त्यांनी पुढे केले. मात्र त्यांच्या या उत्तराने पत्रकारांचे समाधान झाले नाही. महाव्यवस्थापक म्हणून आपण कोणत्या पाच गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य देता? या प्रश्नाचेही उत्तर देताना ते केवळ वेळ मारून नेत असल्याचे जाणवले.