Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

प्रादेशिक

येऊरमध्ये हातोडा!
ठाणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

गेली १० वर्षे चर्चेत आणि कारवाईच्या प्रतिक्षेत असलेल्या येऊरच्या अनधिकृत बंगल्यांवर अखेर आज पालिकेने हातोडा मारला. दिवसभरात धनदांडग्यांचे १३ बंगले जमीनदोस्त करण्यात आले असून उद्याही कारवाई सुरू राहणार आहे. कारवाई होणार असलेल्या बंगल्यांमध्ये जयदेव ठाकरे, प्रताप सरनाईक, मनोहर साळवी आदींच्या बंगल्यांचा समावेश आहे. महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त बी. जी. पवार तसेच नऊ सहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली.

भारतीय अभिजात संगीतासाठी राज्याचे विशेष पॅकेज
* पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने युवा शिष्यवृत्ती योजना
* मुंबईत दरवर्षी ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर संगीत महोत्सव
* किराणा घराण्याचे शिक्षण देण्यासाठी गुरुकुल
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

राज्य शासनाने भारतीय अभिजात संगीतासाठी आज एका विशेष पॅकेजची घोषणा केली असून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव आणि पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ मिळाल्याचे औचित्य साधून हे पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत याची सविस्तर माहिती दिली. पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना, मुंबईत दरवर्षी ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर संगीत महोत्सव, पुण्यातील सवाई गंधर्व स्मारकाच्या सहकार्याने किराणा घराण्याचे शिक्षण देण्यासाठी गुरुकूल आणि अन्य काही योजनांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने केला मराठी कामगारांचाच विश्वासघात!
मुंबई, २७ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

एखाद्याच्या खांद्यावर विश्वासने मान टेकवावी आणि त्याने केसाने गळा कापावा या म्हणीची प्रचिती ‘महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने’वर विश्वास टाकलेल्या ठाणे येथील ‘वाय. जी. वन. इंडस्ट्रीज इंडिया’मधील सर्व कामगार सध्या घेत आहेत. या कामगारांना ले ऑफ म्हणून कंपनीकडून पाच लाख रुपये मिळणार होते. मात्र मनसेच्या कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर १० लाख रुपये मिळतील अशी आशा दाखविण्यात आली होती. प्रत्यक्षात कामगार सेनेच्या उपाध्यक्षाने या कामगारांना अंधारात ठेवून कंपनीशी केलेल्या ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटीमुळे कामगारांच्या हाती नारळ मिळण्याची वेळ आली आहे.

ठाण्यातील डंपिंग ग्राऊंडचा निषेध
मुंबई पालिकेसमोर ‘कचरा फेको’ आंदोलन
ठाणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
गेले वर्षभर सातत्याने सनदशीर मार्गाने आंदोलन करूनही त्याची दखल मुंबई महापालिका घेत नसल्याने संतप्त झालेल्या ठाणे शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री कचऱ्याचे ट्रक थेट मुंबई पालिका मुख्यालयासमोर रिकामे करून प्रशासनास जोरदार दणका दिला. त्यामुळे कचऱ्यावरून सुरू असलेले दोन शहरांतील शीतयुद्ध आता पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पश्चिम रेल्वेवर लवकरच १५ डब्यांच्या लोकल
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

पश्चिम रेल्वेवर लवकरच ठराविक स्थानकांवर थांबणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. बोरिवली स्थानकात आणखी एक फलाट बांधण्यात येणार आहे. नऊ डब्याच्या लोकलच्या ३२ फेऱ्या मार्चपासून १२ डब्यांच्या होणार आहेत. याखेरीज येत्या काही महिन्यांत प्रवाशांना मोबाईलद्वारे उपनगरी तिकिटे मोबाईलद्वारे मिळू शकणार आहेत. मुंबई सेंट्रल-विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकल चालविणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य आहे.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती सुधारली
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती आता सुधारते आहे. शिवसेनाप्रमुखांना काल लीलावतीत दाखल करण्यात आले तेव्हा त्यांच्या अंगात ताप होता आणि त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यांच्या आज विविध चाचण्या करण्यात आल्या. आता त्यांची तब्बेत सुधारते आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, या साऱ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांचा १ मार्च रोजी जळगाव येथे आयोजिलेला मेळावा रद्द करण्यात आला आहे.

सारस्वत ब्राह्मण समाजाची निवडणूक
मुंबई, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
मुंबईतील सारस्वत ब्राह्मण समाज या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाची त्रवार्षिक निवडणूक येत्या ८मार्चला होणार असून त्यासाठी फक्त संस्थेच्या कार्यालयात मतदान होणार आहे . ही निवडणूक मुळात बरेच महिने अगोदर व्हायची होती . तथापि , त्याविरुध्द काही सभासदांनी आक्षेप घेतले होते . अनेक ठिकाणी मतदानाची सोय असावी अशी त्यांची मागणी होती . व्यवस्थापक मंडळाने नेमलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन ठिकाणी मतदान घेण्याचे ठरविले. संस्थेच्या घटनेशी हे विसंगत असल्याने व्यवस्थापक मंडळाने त्यावर आक्षेप घेतला. याचा परिणाम म्हणून त्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यानंतर ,आक्षेप घेणाऱ्या सभासदांनी नगर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. ही बाब आपल्या अधिकार कक्षेबाहेरची आहे आणि ती धर्मादाय आयुक्तांपुढे मांडा असे सांगून न्यायालयाने हा दावा निकाली काढला. त्याचवेळी उभय पक्षांदरम्यान बोलणी होऊन ही निवडणूक ८ मार्चला व्हावी आणि त्यावेळी न्यायालयाने नेमलेले निरीक्षक उपस्थित राहावेत असे ठरले. त्यानुसार ही निवडणूक होत आहे.

सरांविषयी नितांत आदर - रामदास कदम
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आपण जे बोललो त्याचा विपर्यास करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून मनोहर जोशी यांच्याबाबत टीकात्मक बोलणे आपण कधी स्वप्नातही करणार नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते रामदास कदम यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. कदम यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे की, मनोहर जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. मी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना संघटना वाढीबद्दल जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ लावून आणि बातमीत जोशी यांचे नाव टाकून जोशी यांच्या नजरेतून मला उतरविण्याचे आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाद लावण्याचे काम केले गेले आहे. जोशी यांच्याबद्दल टीकात्मक बोलणे माझ्याकडून कधी झाले नाही आणि होणारही नाही.

कोळी महासंघाचा शिवतीर्थावर मेळावा
मुंबई, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

विविध पोटजाती तसेच राजकीय पक्षांमध्ये विखुरल्या गेलेल्या कोळी समाजाला एकत्र करण्याच्या हेतून कोळी महासंघातर्फे येत्या सोमवारी (२ मार्च रोजी) शिवाजी पार्क येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे संयोजक नामदेव भगत व समन्वयक राजहंस टपके यांनी अलीकडेच ही माहिती दिली. या मेळाव्याला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, रायगड, विदर्भ, खानदेश आदी भागांतून लाखो मच्छिमार बांधव उपस्थित राहणार आहेत. माजी मत्स्योपादन राज्यमंत्री दशरथ भांडे, गजेंद्र भानजी, रामभाऊ पाटील, रविकांत पेरकर, रामकृष्ण केणी, प्रकाश बोबडी, जे. टी. पाटील, कृष्णा गिधी, रमेश पाटील, अशोक तांडेल, यशवंत सपकाळे, पांडुरंग चौले, जोसेफ केणी आदी नेते पहिल्यांदात एकाच व्यासपीठावर येणार आहेत, असेही टपके यांनी सांगितले.

तलाठय़ास लाच घेताना अटक
ठाणे, २७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

रॉयल्टी न भरल्याची खोटी केस दाखल न करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या डहाणू तालुक्यातील एका तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. दिलीप मुकणे असे त्याचे नाव असून, तो सजा सरावली येथे कार्यरत होता. बाबूराव पाटील यांच्याकडे त्याने खोटी केस न दाखल करणपोटी दहा हजार रुपये लाच मागितली होती. चर्चेअंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील दोन हजार रु. २५ फेब्रुवारीला घेतल्यानंतर चार हजार रुपये घेताना आज मुकणे यास अटक करण्यात आली.

किरकोळ कारणावरून राबोडीत तणाव; पोलीस निलंबित
ठाणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

रस्त्यावरील फेरीवाल्यांना पोलीस हटकत असताना पवित्र कुराणची प्रत खाली पडल्याच्या कथित घटनेने राबोडीत आज सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी एका पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.पहिल्या राबोडीत मार्केट परिसरात फेरीवाले रस्त्यात बसत असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या होत्या. आज शुक्रवार असल्याने नमाजावेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी मस्जिद परिसरातील फेरीवाल्यांना तेथून हटकले. या कारवाईदरम्यान एका पुस्तक विक्रेत्याच्या गाडीवरील कुराणची प्रत खाली पडली. परंतु पोलिसांनी कुराणला लाथ मारल्याची अफवा काही वेळातच पसरली आणि संतप्त मुस्लिम तरुणांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून काही काळ परिसरात तणाव पसरला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांनी त्वरित घटनास्थळी येऊन जमावाला शांत केले. याप्रकरणी आजबे नावाच्या पोलिसास निलंबित करण्यात आले आहे.