Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

विज्ञानाबाबत मराठी शाळा उदासीन
सुनील डिंगणकर

विज्ञान विषयाचे केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा विषय रंजक पद्धतीने समजावा यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम शाळेत राबविले जावेत किंवा शाळेने विद्यार्थ्यांना या उपक्रमांसाठी विज्ञान परिषदेच्या वास्तुमध्ये पाठवावे यासाठी विज्ञान परिषदेचे प्रतिनिधी विविध शाळांशी संपर्क साधत असतात. पण याबाबतीत मराठी शाळांकडून अत्यल्प

 

प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खास शनिवार-रविवारची वेळ राखून ठेवलेली असते. पण या व्याख्यानांसाठीही मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची उपस्थिती अजिबात नसते. एकूणच मराठी शाळा याबाबतीत उदासीन असल्याचे विज्ञान परिषदेच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मराठी विज्ञान परिषदेच्या सचिव डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी सांगितले की, मराठी शाळांची ही तऱ्हा तर याच्या उलट परिस्थिती इंग्रजी शाळांची असते. इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी राबविण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळतो. एवढा की, नावनोंदणी थांबविण्याची वेळ येते. काही काही पालक तर पुढील वर्षांची आगाऊ नोंदणीही करतात. दर आठवडय़ाला असलेल्या सुट्टीच्या वारी चालणाऱ्या वार्षिक उपक्रमासाठी गेल्या वर्षी मराठी माध्यमातील केवळ दोनच विद्यार्थी आले होते. दोन मुलांसाठी वर्ग चालविणे परिषदेला आर्थिकदृष्टय़ा परवडण्यासारखे नव्हते. नाईलाजास्तव त्या दोन मुलांना इंग्रजी वर्गामध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. सुरुवातीच्या दोन वर्गाना त्या मुलांना व्याख्यान समजण्यास कठीण जात होते. त्यानंतर ते इंग्रजी भाषेला सरावले. आज कोणत्याही अडथळ्याशिवाय विविध स्पर्धामध्ये भागही घेत असल्याची माहिती राजाध्यक्ष यांनी दिली.
मराठी विज्ञान परिषदेची वास्तू चुनाभट्टीला आहे. तेथे येणे काही पालकांना कठीण वाटते. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘पूल’ तयार केला आहे. म्हणजे चुनाभट्टीला नेण्याची जबाबदारी एक पालक स्वीकारतो आणि आणण्याची जबाबदारी दुसरा स्वीकारतो. त्यामुळे प्रवासाचाही प्रश्न सुटतो. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या काही मराठी माध्यमाच्या शाळांनी विज्ञान परिषदेचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी दादरमधील शारदाश्रम आणि राजा शिवाजी विद्यालयातर्फे हे उपक्रम शाळेत राबविण्यात आले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. आता माहीमच्या सरस्वती विद्यामंदीर शाळेनेही याबाबतीत पुढाकार घेतला आहे.
परिषदेच्या कार्याविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या की, पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्यांपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रयोगांवर जास्त भर देण्यात येतो. प्रशिक्षकसुद्धा कमीत कमी बोलून प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानातील विविध गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगतो. यात विज्ञान प्रयोग मेळावा, निरंतर विज्ञान कक्ष, विज्ञान खेळणी, विज्ञान सफर, विज्ञान मित्र, सौरउर्जा ओळख वर्ग इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. मराठी विज्ञान परिषदेच्या महाराष्ट्रात ६० शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून हे उपक्रम ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यात येतात. या संस्थेच्या संकेतस्थळाविषयी विचारणा केली असता राजाध्यक्ष यांनी सांगितले की, मराठी विज्ञान परिषदेचे संकेतस्थळ तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत हे संकेतस्थळ सुरू होईल. त्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही पर्याय असणार आहेत.
परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना मानधनही देण्यात आले होते. मानधन केवळ पाच शाळांमध्ये उपक्रम राबविण्यासाठी देण्यात आले असले तरी त्यांनी आपापल्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील दहा-पंधरा शाळांमध्ये हे उपक्रम राबविले. ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे विज्ञान प्रसाराचे काम करण्याची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी किंवा शाळांनी अधिक माहितीसाठी २४०५४७१४ किंवा २४०५७२६८ या क्रमांकांवर (मंगळवार सोडून) संपर्क साधावा.