Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

शत्रूला ओळखण्याची वेडय़ा राघूची पद्धत
अभिजीत काळे, पुणे यांना २००० साली मराठी विज्ञान परिषदेचा कै. शरद नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ

 

दिला जाणारा ‘विज्ञान संशोधन पुरस्कार’ मिळाला. त्यांच्या संशोधनाचा विषय होता, ‘पक्षी आपल्या शत्रूला कसे ओळखतो?’ हा प्रकल्प त्यांनी आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणे येथे इ.रू. ला असताना (मे २०००) केला होता.
अभिजीत आणि त्यांच्या मित्रांनी ‘पक्ष्यांमध्ये मनुष्यप्राण्याप्रमाणेच लक्षात ठेवण्याची काही पद्धती असते का?’ या विषयावर संशोधन केले होते. त्यासाठी त्यांनी ‘वेडा राघू’ (स्मॉल ग्रीन बी. इटर) या पक्ष्याची निवड केली. ‘पक्षी त्यांच्या शत्रूला कसे ओळखत असतील?’ याचे संशोधन त्यांनी स्वतंत्रपणे सुरू केले.
वेडा राघू हा हिरव्या रंगाचा कीटकभक्षी पक्षी आहे. त्यांच्या विणीचा हंगाम साधारणत: मेच्या शेवटापासून ते जूनच्या सुरुवातीपर्यंत असतो. म्हणूनच या काळात त्यांची घरटी शोधणे सोपे जाते. दांडीवर बसलेल्या वेडय़ा राघूच्या चोचीत कीटक असूनही तो त्याला गट्ट करत नसेल तर समजावे, जवळच त्याचे घरटे आहे.
वेडा राघू त्याच्या घरटय़ात लगेच शिरत नाही. त्या आधी तो एका फांदीवरून दुसऱ्या फांद्यांवर- तारांवर आपली जागा सतत बदलत राहतो जेणे करून त्याची निश्चित जागा- घरटे शोधण्यात शत्रूचा गोंधळ व्हावा. बराच वेळ त्याचं स्वत:च्या घरटय़ाचं निरीक्षण चालू असतं. शत्रू अथवा घरटय़ावर नजर ठेवणारा जोपर्यंत नजरेआड होत नाही, तोपर्यंत तो घरटय़ात शिरत नाही. घरटय़ाच्या आत वेडा राघू अधिकच सजग असतो. घरटय़ातली त्याची हालचाल अगदीच मर्यादित असते. त्याचे घरटे शोधताना निरीक्षणकर्त्यांला आपण दुसरीकडे पाहतोय, असा बहाणा करावा लागतो किंवा त्याच्या दृष्टिक्षेपातून दूर व्हावे लागते. त्याचे घरटे शोधण्यासाठी अभिजीत यांनी हीच युक्ती केली.
निरीक्षणकर्ता घरटय़ाकडे बघतोय की, आणखी कुठे हे पक्ष्याला कळतं का? निरीक्षणकर्त्यांचे शरीर, डोके आणि डोळे यांच्या दिशेप्रमाणे त्यांचे वर्तन होते का? हे त्यांनी तपासले. यासाठी अभिजीत यांनी वेडय़ा राघूची ५ घरटी निवडली. प्रत्येकाची १५० पेक्षा जास्त वेळा सुमारे १०० घडय़ाळी तास निरीक्षणे केली.
प्रयोगावरून अभिजीत यांनी असा निष्कर्ष काढला की, जेव्हा निरीक्षणकर्ता घरटय़ाकडे लक्ष ठेवून होता, तेव्हा वेडय़ा राघूचे घरटय़ात येण्याचे प्रमाण कमी होते. जेव्हा निरीक्षणकर्ता पक्ष्याकडे पाहत होता, तेव्हा वेडय़ा राघूचे घरटय़ात येण्याचे प्रमाण कमी असले तरी आधीच्या मानाने जास्त होते.
जेव्हा निरीक्षणकर्ता पक्षी आणि घरटे दोहोंकडे पाहायचा नाही, तेव्हा वेडय़ा राघूचे घरटय़ात येण्याचे प्रमाण खूप जास्त होते. वेडा राघू निरीक्षणकर्त्यांच्या दृष्टीनुसार वेगवेगळे वर्तन करत होता. म्हणजे निरीक्षणकर्त्यांच्या दृष्टीचा अर्थ लावायचा प्रयत्न करत होता. जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी विज्ञान संशोधनाकडे वळावे, या हेतूने देण्यात येणारा ‘विज्ञान संशोधन पुरस्कार’ दिला जातो. त्याचे पहिले मानकरी ठरले, अभिजीत काळे विशेष म्हणजे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आताही संशोधन क्षेत्रातच काम करत आहेत. अमेरिकेच्या अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीन डिपार्टमेंट ऑफ जेनेटिक्स, डॉ. बेकर लॅब येथे ढँ.ऊ. करत आहेत.