Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

केळ्याच्या सालीपासून बिस्किटे
केळी आपण खातो आणि साल फेकून देतो. म्हणजेच केळ्याची साल आपल्या दृष्टीने टाकाऊ भाग

 

आहे. तर अशा या टाकाऊ भागाचा सुद्धा वापर आपल्या अन्न घटकांत कसा करून घेता येईल याचा यशस्वी प्रयत्न आपल्या प्रकल्पातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केला आहे आणि मराठी विज्ञान परिषदेचा सन २००४ सालचा दहा हजार रुपयांचा संशोधन पुरस्कार पटकावला आहे. ही आहे कुमारी रिचा विनय जोशी, नांदेड येथील विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी. तिच्या प्रकल्पाचा विषय होता. ‘केळ्याच्या सालीच्या लगद्यापासून कमी उष्मांक असलेली बिस्किटे.’
हा प्रकल्प बनवताना पुढील तीन मुद्दय़ांचा विशेष विचार केला गेला. (१) बिस्किटांमध्ये केळ्याच्या सालीचा समावेश करणे. (२) केळ्याच्या सालीच्या वापराने बिस्किटांमधील मूल्य घटकांची वाढ करणे. (३) लोकांच्या रुचीस उतरवणे.
यासाठी लागणाऱ्या साहित्यात पिकलेल्या केळ्याची साल, गव्हाचे पीठ, वनस्पती खाद्य तेल, आयसिंग शुगर, दूध पावडर, कस्टर्ड पावडर आणि तूप या घटकांचा समावेश आहे. केळ्याची साल संपूर्ण न वापरता फक्त आतील पांढरा भाग खरवडून काढून मिक्सरमधून त्याचा लगदा बनवून घेणे. या प्रकल्पात तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन प्रकारची बिस्किटे बनवली. अ) केळ्याच्या सालीचा वापर न करता ब) केळ्याची साल १० टक्के क) केळ्याची साल २० टक्के. खाद्यतेल, आयसिंग शुगर, दूध पावडर, कस्टर्ड पावडर आणि तूप एकत्र करून मिक्सरमधून एकजीव करून घेणे. या मिश्रणात गव्हाचे पीठ घालून मिक्सरमधून तीन मिनिटे फिरवून घेणे. नंतर केळ्याच्या सालीचा लगदा या मिश्रणात घालून एकजीव करून घणे. शेवटी या मिश्रणाचे लहान गोळे करून त्यांना बिस्किटांचा आकार देऊन ओव्हनमध्ये १५० सेंटी.ला ३० मिनिटे ठेवणे.
या बिस्किटांमध्ये उष्मांक, मेद, कबरेदके, प्रथिने, ओलावा, राख, तंतू (फायबर) किती प्रमाणात आहेत हे ठरवलं गेलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना ही बिस्किटे कितपत पसंत पडली ठरवलं गेलं. मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणावरून असं सिद्ध झालं की, केळ्याच्या सालीमुळे बिस्किटांमधील उष्मांक व मेदाचे प्रमाण कमी झाले व कबरेदकांच्या व तंतूच्या प्राणात वाढ झाली ही बिस्किटे मधुमेह व स्थूल असणाऱ्या लोकांना उपयोगी ठरतील आणि सर्वात मुख्य म्हणजे केळ्याच्या सालीमुळे या बिस्किटांच्या इतर गुणधर्मावर विशेष फरक पडलेला नाही. लोकांना बिस्किटे कितपत आवडली हे ठरवताना बिस्किटांचा रंग, कुरकुरीतपणा, चव, स्वाद या गोष्टींचा समावेश केला गेला. नेहमीच्या बिस्किटांप्रमाणेच ही बिस्किटे लोकांना आवडली. केळीच्या सालीच्या वापरामुळे बिस्किटांची किंमत ७.५ टक्के ते १७.५ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला म्हणायला हरकत नाही. आपल्यासारख्या देशातील लोकांना नक्कीच हे फायद्याचे ठरेल.
कु. रिचा जोशी ही सध्या कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात केमिकल इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम करत आहे.