Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

२ मार्चपासून नेहरू सेंटरमध्ये गुणीदास संगीत संमेलन रंगणार
प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले ‘गुणीदास संगीत संमेलन’ यंदा मुंबईत आयोजित करण्यात येत

 

आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या कला सादरीकरणामुळे नावारूपाला आलेल्या या संगीत सोहळ्याचे यंदा ३२वे वर्ष आहे. यंदाच्या संमेलनात पंडित जसराज, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित राजन आणि साजन मिश्रा, गौरव मजुमदार, सुहास व्यास, बिश्वजीत रॉय-चौधरी, गणेश, कुमारेश आदी दिग्गज सहभागी होणार आहेत. हा सोहळा २ ते ४ मार्च या कालावधीत नेहरू सेंटर, अ‍ॅनी बेझंट मार्ग, वरळी येथे होणार आहे. या सोहळ्याची तिकिटे रिदम हाऊस (काळाघोडा) व नेहरू सेंटर येथे उपलब्ध करण्यात आली आहेत.
पंडित सी. आर. व्यास यांनी आपले गुरू पंडित जगन्नाथबुवा पुरोहित ऊर्फ गुणीदास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९७७ साली गुणीदास संमेलनाचे प्रथम आयोजन केले होते. त्यानंतर अत्यंत प्रतिष्ठा प्राप्त झालेले हे संमेलन मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली व चेन्नई येथे वेळोवेळी आयोजित केले आहे.
गेल्या ३२ वर्षांपासून संगीताची परंपरा जपत आलेले हे गुणीदास संमेलन मैलाचा दगड ठरले असून संगीत क्षेत्रातील हा अत्यंत दुर्मिळ सोहळा असल्याचे मत या संमेलनाचे आयोजक पंडित सतीश व्यास यांनी व्यक्त केले आहे. विविध घराण्यातील संगीत कला या संमेलनात सादर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.