Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इंडियन आयडॉलच्या ग्रॅन्ड फिनालेची जय्यत तयारी
प्रतिनिधी

देशवासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन आयडॉल -४ च्या ग्रॅन्ड फिनालेची तयारी जोरात सुरू

 

आहे. आता स्पर्धेत तीन स्पर्धक उरले असून अंतिम बाजी कोण मारणार. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आपल्या दिलखेचक अदाकारीबरोबर आवाजातील गोडवा कायम ठेवणारी तोर्शा सरकार किताबजिंकणार की, गाणे गाताना त्यात जीव ओतून परफॉर्मन्स करून गाणारी सौरभी विजेती ठरणार हे १ मार्चला ठरेल. या दोन महिला स्पर्धकांमध्ये कपिल थापा त्याची वेगळी ओळख ठेवून आहे. कपिलच्या गाण्याला परीक्षकांबरोबर प्रेक्षकांनी देखील दाद दिली आहे.
याखेपेस एखादी मुलगी नक्की इंडियन आयडॉल म्हणून निवडली जाईल अशीही शक्यता आहे. परिक्षकांनी देखील फिनालेसाठी जोरदार तयारी केली आहे. जावेद अख्तर यांनी ग्रॅन्ड फिनालेसाठी एक खास गाणे लिहिले आहे. संगीतकार अन्नु मलिक यांनी त्या गाण्याला स्वरबद्ध केले. ग्रॅन्ड फिनालेच्या दिवशी स्पर्धकांबरोबर परिक्षक देखील हे गाणे गात स्टेजवर उतरणार आहेत. तरूण वर्गाला या गाण्याची चाल विशेष आवडेल असा अनु मलिक यांना विश्वास वाटतो. हे गाणे म्हणजे आत्तापर्यंतचा स्पर्धकांचा प्रवास वर्णन करणारा, त्यांच्या मेहनतीची माहिती देणारे हे गाणे असेल. स्पर्धकांबरोबर परिक्षकही स्टेजवर येऊन परफॉर्मन्स देणारा हा पहिलाच रिअ‍ॅलिटी शो आहे. परिक्षकांमध्ये जावेद अख्तर, अन्नु मलिक, अलिशा चिनॉय, कैलाश खेर, सोनाली बेंद्रे यांनी स्पर्धकांबरोबर या गाण्याची रिव्हर्सल नुकतीच इंडियन आयडॉलच्या सेटवर केली. त्यावेळी अंतिम तीन स्पर्धकांबरोबर अंतिम फेरीपर्यंत आलेले १४ स्पर्धकही स्टु्डिओत आले होते. त्यानीही कोरस बनून गाण्याला साथ दिली. परीक्षकांनी आम्हाला सुरुवातीला गाण्याच्या उच्चारावरून, शब्दफेकीवरून फटकारले त्याचा चांगला फायदा झाला. त्यानी आमच्या चुका दाखवून दिल्या त्यामुळे प्रत्येक फेरीला त्या चुका टाळत आम्ही अंतिम फेरीपर्यंत येऊ शकलो अशी कबुली तोर्शा सरकारने व कपिल थापा यांनी दिली. सौरभीने देखील त्यांच्या शब्दात हो मिळवून अंतिम फेरी जिकण्यापेक्षा आमचा परफॉर्मन्स अजुन चांगला कसा होईल याकडे लक्ष देण्यासाठी आमची तयारी सुरू असल्याचे सांगितले. तुमच्या तिघांपैकी कोण जिंकणार असे विचारले असता, आम्ही ग्रॅन्ड फिनालेपर्यंत पोचलो यातच आमचा मोठा विजय आहे. आमच्या दृष्टिने आम्ही तिघेही बेस्ट आहोत. त्यामुळे एकाला टाळणे अशक्य आहे अशी गुगली टाकणारे उत्तर कपिल थापाने दिले तेव्हा उपस्थित सारेजण आश्चर्यचकित झाले. तीनही स्पर्धकांमध्ये आता मैत्रीचे एक अतुट नाते जुळलेले दिसते. आमच्याकडून आम्ही जास्तीजास्त चांगला परफॉर्मन्स देऊ. बाकी निर्णय परिक्षकांचा आणि प्रेक्षकांचा असेल असे सांगून आम्हाला नक्की व्होट करा असे सांगायला तिनही स्पर्धक विसरले नाही. एक मार्चच्या ग्रॅन्ड फिनालेसाठी कॅतरिना कैफ, नील नितीन मुकेश उपस्थित राहणार आहेत.