Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

जोगेश्वरीच्या ब्लाइंड होममधील समस्यांमुळे अंध रहिवासी हैराण
प्रतिनिधी

जोगेश्वरी येथे अंधांसाठी चालविण्यात येत असलेल्या ‘एम. एन. बी. होम फॉर द ब्लाइंड’ या संस्थेतील

 

व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे तिथे राहणाऱ्या अंध व्यक्तींना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संस्थेच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली असतानाही त्याची दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप संस्थेतील अंध रहिवाशांनी केला आहे.
जोगेश्वरीमध्ये संस्थेची तब्बल साडेतीन एकर जागा आहे. अंधांच्या कल्याणासाठी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी मंचरजी मनारजी नवरोजी यांनी ही जागा संस्थेला देणगी स्वरूपात दिली होती. या जागेतच संस्थेचे वर्कशॉप व वर्किंग होस्टेल चालविण्यात येते. होस्टेलची ६० व्यक्तींची प्रवेशक्षमता आहे. येथे राहणाऱ्या अंधांकडून निवास व भोजनासाठी चारशे रूपये शुल्क आकारण्यात येते. परंतु, संस्थेने हे शुल्क अचानक बाराशे रूपये केले आहे. वास्तविक, संस्थेला जवळपास वीस टक्के भोजन बाहेरच्या संस्थांकडूनच दिले जाते. संस्थेच्या परिसरात चित्रपट तसेच मालिकांचे चित्रीकरण करण्यात येते. त्यातूनही संस्थेला मोठय़ा प्रमाणात भाडे मिळते. इतरही दानशूर व्यक्ती व संस्थांकडून संस्थेला मोठय़ा प्रमाणात निधी मिळतो. तरीही संस्था अंधाची समस्या ध्यानात न घेता त्यांच्याकडून भरमसाठ शुल्क आकारत असल्याचा आरोप या अंध रहिवाशांनी केला आहे. संस्थेच्या कार्यालयातील कर्मचारी तसेच भोजन कक्षातील कर्मचारी आमची हेटाळणी करतात, आमच्या व्यंगाचा उल्लेख करून खिल्ली उडवतात, अंधांच्या नावाखाली संस्था चालविण्यात येत असली तरी अंधांनाच मानहानीची वागणूक दिली जाते, अशी तक्रार अंध रहिवाशांनी केली आहे. संस्थेतील समस्या सोडविण्याच्या मुद्दय़ावर आम्ही सर्व अंधांनी एक समिती स्थापन केली असता, संस्थेतून काढून टाकण्याची तंबी संचालकांनी दिली असल्याचेही या अंधांनी सांगितले. ब्लाइंड होम मधील विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर केल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा समतावादी छात्रभारतीचे अध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे.
याबाबत, संस्थेचे संचालक बी. के. गिठ्ठे यांच्याशी संपर्क साधला असता, संस्थेतील अंधांनी आमच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन आम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतील निवास व भोजनाच्या दरात गेल्या दहा वर्षांपासून वाढ केली नव्हती. त्यामुळे आम्ही काही प्रमाणात वाढ केली आहे. परंतु, ती वाढही कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. संस्थेतून आम्ही कुणालाही काढून टाकणार नसल्याचेही ते म्हणाले.