Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

विखे, राजळे समर्थकांचे शक्तिप्रदर्शन
काँग्रेस पक्षनिरीक्षकांकडून उमेदवारीबाबत चाचपणी

नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी आज खासदार बाळासाहेब विखे व आमदार राजीव राजळे यांच्या समर्थकांनी घोषणा देत शक्तिप्रदर्शन करून काँग्रेसच्या पक्षनिरीक्षकांकडे आपल्या नेत्यासाठी उमेदवारीची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांनीही निरीक्षकांची भेट घेत उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे प्रथमच सूचित केले. अ. भा. काँग्रेस समितीने शिरूर (पुणे), नगर व शिर्डी मतदारसंघासाठी आमदार राजकुमार सिंघानिया (रायपूर, छत्तीसगड) यांची पक्षनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

शिर्डी-पुणतांबे रेल्वे सेवा आजपासून
राहाता, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

शिर्डी-पुणतांबे रेल्वे सेवेचा प्रारंभ व साईनगर रेल्वेस्थानकाचे उद्घाटन उद्या (शनिवारी) दुपारी दोन वाजता होत आहे. शिर्डी-मुंबई विशेष रेल्वेला रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव हिरवा झेंडा दाखवतील. यानिमित्त शिर्डीकरांसह साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार बाळासाहेब विखे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी पालकमंत्री दिलीप वळसे, शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, जि. प.च्या अध्यक्षा शालिनीताई विखे, शिर्डीच्या नगराध्यक्षा सुमित्रा कोते आदी उपस्थित राहतील.

दत्त देवस्थानच्या विश्वस्तांना भाविकांचा घेराव
लक्ष्मीदर्शन हॉल उघडण्यास नकार दिल्याने वाद

नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सावेडी येथील श्रीदत्त देवस्थानमधील श्रीरामकृष्ण क्षीरसागरमहाराज यांचा लक्ष्मीदर्शन हॉल दर्शनासाठी उघडण्यास नकार दिल्याने भाविक व विश्वस्तांमध्ये जोरदार खडांजगी झाली. बाहेरगावच्या भाविकांनी त्यांना घेराव घालून राजीनाम्याची मागणी केली. श्रीदत्त मंदिरासमोरील पटांगणात हे आंदोलन चालू होते. सहायक पोलीस अधीक्षक संजय दराडे पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस येताच भाविकांमध्ये पळापळ झाली.

दरोडय़ाच्या तपासासाठी कुकाण्यात ‘बंद’
नेवासे, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील बागडे ज्वेलर्सवरील दरोडय़ाच्या तपासासाठी आज कुकाणे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. कुकाण्यात आतापर्यंत अनेक चोऱ्या झाल्या आहेत. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. मात्र, एकाही चोरीचा, दरोडय़ाचा पोलिसांना तपास लागला नाही. त्यातच परवा बागडे ज्वेलर्सचे प्रशांत बागडे यांच्यावर हल्ला करून ५० लाख रुपयांचे दागिने दरोडेखोरांनी लुटले. या घटनेच्या तपासासाठी कुकाणे ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला.

नगरसेवकांच्या कार्यशाळेस थंड प्रतिसाद
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महापालिका कायद्याची माहिती व्हावी म्हणून आयोजित केलेल्या विशेष कार्यशाळेकडे बऱ्याच नगरसेवकांनी पाठ फिरवली. अशी माहिती दिल्यास त्यांचे प्रतिबिंब सर्वसाधारण सभा, तसेच नगरसेवकांशी संबंधित कामकाजात पडून काम करणे सुलभ होईल या प्रशासनाच्या अपेक्षेवर नगरसेवकांच्या थंड प्रतिसादाने पाणी पडले. पहिल्या सत्रात जेमतेम १०-१२ व दुसऱ्या सत्रात तर मोजून आठजण, त्यातही पुन्हा ६ महिला अशी यश पॅलेस येथील या कार्यशाळेची अवस्था होती. मनपा व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. आय. केंद्रे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. महापौर संग्राम जगताप अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर नजीर शेख या वेळी उपस्थित होते.

मारहाण झालेल्या अपंग मुलाचा जबाब नोंदवून घेण्याचा आदेश
पाथर्डी, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

जुन्नर तालुक्यातील अपंग शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तेरा वर्षांच्या संदेश महाजन या अपंग मुलाला केलेल्या मारहाणप्रकरणी संदेशचा जबाब नोंदवून घेण्याचा आदेश बाल सुधारगृहाचे अधीक्षक खान यांना देण्यात आला आहे. दरम्यान, नगर येथील चाईल्ड लाईन या सामाजिक संस्थेनेही या मारहाणीची गंभीर दखल घेतली आहे.

सिनेमा थेट हृदयाला भिडायला हवा..
गेला आठवडाभर किंवा त्याच्याही आधीपासून वृत्तपत्रात आणि विविध वाहिन्यांवर ऑस्कर झळकत होते. परवा स्लमडॉग मिलेनिअरला हा पुरस्कार जाहीर झाला अन् भारतीयांच्या आनंदाला पारवार उरला नाही. चांगला सिनेमा, हिंदी गाणी मला आवडतात. आठ ऑस्कर पुरस्कार एका भारतीय पाश्र्वभूमीवरच्या सिनेमाला मिळाले. भारतीय गीतकार, संगीतकार, अभिनेते, तंत्रज्ञ यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले गेले, याचा मलाही भरपूर आनंद झाला. अतिशय उत्सुकतेने मी स्लमडॉग सिनेमा पाहिला. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच एक नकोसेपणाची भावना मुळी घट्ट झाली. हा सिनेमा मला अजिबात आवडला नाही. ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या एका कार्यक्रमात झोपडपट्टीतला गरीब मुलगा भाग घेतो. तिथे जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे त्याला जगण्यातून आलेल्या अनुभवाच्या आठवणीतून तो देत जातो. ती सारी बरोबर येतात.

पर्यटनाबरोबर चोंडीमध्ये शिल्पसृष्टीतून प्रबोधन - मोहिते
जामखेड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडीतील अहल्या शिल्पसृष्टीचे काम वर्षभरात पूर्ण होईल. पर्यटनाबरोबर लोकप्रबोधनाचे मोठे काम शिल्पसृष्टीतून होईल. इतिहासाच्या पाऊलखुणा त्यामुळे नव्याने जाग्या होतील, असे ग्रामविकास व पर्यटनमंत्री विजयसिंह मोहिते यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील शिल्पसृष्टीचे भूमिपूजन श्री. मोहिते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

वस्तूसंग्रहालय इतिहास संशोधनाची प्रयोगशाळा बनावी - सुरेश जोशी
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय केवळ पर्यटकांचे आकर्षण केंद्र न राहता ते इतिहास संशोधनाची प्रयोगशाळा बनावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेश जोशी यांनी व्यक्त केली. जोशी यांनी आज ८०व्या वर्षांत पदार्पण केले. त्यानिमित्त मुक्तचिंतन करताना त्यांनी संग्रहालयाच्या आणि इतिहास संशोधनाच्या कार्यात तरुण पिढीने सक्रिय होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. आर्थिक मदत नसल्याने संग्रहालयाची कुचंबणा होत आहे. सुरक्षा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याने दोनतृतीयांश वस्तू संग्रहालयात अजून मांडता आलेल्या नाहीत. अभ्यासिका, एम. फिल. केंद्र पैशांअभावी चालविता येत नाहीत. शिर्डी संस्थानने ५० लाखांची मदत मंजूर केली आहे, पण तो धनादेश अद्याप मिळाला नसल्याने आम्ही हतबल झालो आहोत, असे श्री. जोशी म्हणाले.

जि. प. अभियंत्यांनी सदस्यांना विश्वासात घेऊन काम करावे - विखे
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी सामाजिक भान ठेवून, सदस्यांना विश्वासात घेऊन काम करावे. त्याचबरोबर कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी आज ‘आदर्श अभियंता’ पुरस्कार वितरण प्रसंगी केले.जि. प.च्या वतीने भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वराय यांच्या नावाने आदर्श अभियंता पुरस्कार दिला जातो.सन २००५-०६ व २००६-०७च्या पुरस्काराचे वितरण आज बाराजणांना करण्यात आले.

‘वेश्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज’
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्येही सापडतात. कधी त्यांना राजदरबारात नर्तिकेचे स्थान मिळाले, तर कधी त्यांचे उदात्तीकरण केले गेले. पण वेश्या मग ती सामान्य असो वा श्रीमंत, तिला समाजाने नेहमीच तिरस्काराची वागणूक दिली. या महिलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणले, तरच त्यांच्या शतकानुशतकांच्या समस्या दूर होऊ शकतील, असे प्रतिपादन डॉ. अनिल कुडिया यांनी केले.

फटाक्याची ठिणगी पडल्याने मंगल कार्यालयाचा मंडप जळाला
पाथर्डी, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

विवाहानंतर वाजवलेल्या फटाक्यांची ठिणगी मंडपावर पडून संपूर्ण मंडप जळाला. आज संस्कारभवन या मंगल कार्यालयात हा प्रकार झाला. या आगीमध्ये लाखो रुपये किमतीचा मंडप जळून खाक झाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पाथर्डीचे उपनिरीक्षक मारुती पाखरे यांचा मुलगा सचिन याचा विवाह तालुक्यातील भारजवाडी येथील बन्सीधर बटुळे यांची मुलगी संगीता हिच्याशी संस्कारभवन मंगल कार्यालयात दुपारी पार पडला. मंगलाष्टक संपल्याबरोबरच फटाके वाजवण्यात आले. यातील एक फटाका मंडपावर पडल्याने मंडपाच्या कापडाने पेट घेतला. रखरखीत ऊन व थोडा वारा सुटल्याने आग पसरून संपूर्ण मंडपाचे कापड काही क्षणात जळून खाक झाले. मंडपाखाली टाकलेल्या चटया उपस्थित वऱ्हाडींनी बाजूला टाकल्या, तर मंडपाच्या लाकडी खांबांवर पाणी टाकल्याने खांब वाचले.

मुद्देमाल सादर केला नाही; तपासी अधिकाऱ्यास नोटीस
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

एका जळीत प्रकरणातील मुद्देमाल सादर न केल्याने न्यायालयाने कर्जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक जी. के. गोजरे व हवालदार एच. ए. पठाण यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी या नोटिसा बजावल्या. कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे २९ एप्रिल २००६ रोजी गणपत श्रीपती गायकवाड यांचे राहते छप्पर पेटवून देण्यात आले होते. या प्रकरणात सुनील बापू गायकवाड हा आरोपी असून त्याच्याविरुद्ध खटला सुरू आहे. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक गोजरे व हवालदार पठाण करीत होते. सुनावणी सुरू असताना पोलिसांनी जळालेली दरवाजाची लाकडे, स्टीलचा डबा आदी मुद्देमाल न्यायालयात सादर केला नाही. सरकारी वकील सुरेश लगड यांनी हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्यायालयाने त्याची दखल घेत तपासी अधिकारी व पोलिसांना नोटीस काढली. पुढील सुनावणी ९ मार्चला होईल.

ओबीसी आरक्षण बचाव अधिवेशन उद्या सावेडीत
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आरक्षणावर गंडांतर येऊ नये, म्हणून ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्क व सामाजिक हितासंदर्भात आयोजित ओबीसी आरक्षण बचाव अधिवेशन १ मार्चला सावेडीतील महापालिका क्रीडा संकुलात होणार आहे, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्या. बापट आयोगाची अंमलबजावणी व्हावी, ओबीसी आरक्षणावर गंडांतर येणार असल्यामुळे सराफ आयोग रद्द करावा याविषयी मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना सद्बुद्धी यावी, यासाठी अधिवेशनात विक्रमशास्त्रीमहाराज (मुंबई) यांच्या हस्ते महायज्ञ होणार आहे. राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत उपरे अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील.

मालमोटारीची धडक; शाळकरी मुलगा ठार
देवळाली प्रवरा, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

नगर-मनमाड मार्गावरील गुहा गावाजवळ रस्त्याने जाणाऱ्या शाळकरी मुलास धडक देऊन ठार करणाऱ्या मालमोटारचालकाविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेनंतर चालक गाडी सोडून पळून गेला. काल सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास हा प्रकार घडला. अजित धोंडीराम सौदागर (वय ९) असे मुलाचे नाव आहे. एम. पी. ०९/एचएफ ३६९० या मालमोटारीने धडक दिली. अजित जागीच ठार झाला. नवनाथ सौदागर यांनी फिर्याद दिली.

बांधकाम चालू असताना भिंत कोसळून मजूर ठार
नगर, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

घराची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना ढवणवस्ती भागातील सूर्यनगर येथे घडली. तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विलास बाबूराव धोत्रे (वय ३०, रा. बोल्हेगाव) असे मृत मजुराचे नाव आहे. सूर्यनगर येथे एका घराचे काम चालू असताना भिंत कोसळली. त्याखाली दबून धोत्रे ठार झाला, तर दादाभाऊ भिकाजी साळवे हा मजूर जखमी झाला.