Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
तृष्णा-त्याग म्हणजे धम्म

धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य व सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे. कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही. पीडिताने परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये, असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही. उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या आधीन होऊ नये. भिक्खू रथपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की, ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात; त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे, अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सूक्तांत भगवान बुद्धाने आनंदाला लोभ-संयमनाची महती सांगितली आहे; तेथे तो म्हणतो, ‘‘आनंद, लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेत पर्यवसान होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही, असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते.’’ लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतो ते असे की, पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिपाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वाचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बुद्ध आणि त्याचा धम्म)

कु तू ह ल
लघुग्रहांचा वेध
लघुग्रहांचा वेध यानांमार्फत घेतला गेला आहे का?

लघुग्रहांच्या पट्टय़ातून सुखरूपपणे पलीकडे जाणारे पहिले मानवनिर्मित यान म्हणजे पायोनिअर- १०. १६ जुलै १९७२ रोजी जेव्हा ते या लघुग्रहांच्या पट्टय़ात शिरले तेव्हा या पट्टय़ातील असंख्य लघुग्रह व इतर कचरा या यानावर धडकेल की काय, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत होती. मात्र त्यानंतरही पायोनिअर ११, व्हॉयेजर- १ व २, डलिसिस इत्यादी याने या पट्टय़ातून सुखरूप पार झाल्यावर एखाद्या लघुग्रहावर ही याने अचानक आदळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. यानंतरच्या काही यानमोहिमांद्वारे गॅस्प्रा, इडा, माथिल्ड, मासूर स्काय, अ‍ॅन फ्रँक व इतर काही लघुग्रहांचा वेध घेतला गेला. यापैकी निअर (निअर अर्थ अ‍ॅस्टेरॉईड रान्दीवू) मोहीम खास लघुग्रहांच्या अभ्यासासाठीच आखली गेली. या मोहिमेतील ‘शूमेकर’ यानाने इरॉस व माथिल्ड या लघुग्रहांचा अभ्यास केला व वेगवेगळय़ा कोनातून छायाचित्रेही घेतली. ९ मे २००३ रोजी सोडण्यात आलेल्या हायाबुसा मोहिमेतील म्युसेस-सी या यानाने २००५ साली इटोकावा या लघुग्रहाचा अगदी जवळून म्हणजे सुमारे ३ किमी ते २० किमी इतक्या अंतरावरून वेध घेतला. या मोहिमेमुळे आपल्याला लघुग्रहांचे आकार, वस्तुमान, पृष्ठभाग, जडणघडण याबद्दलची महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती २००८ सालच्या अखेरीस ‘स्टेन्स’ या लघुग्रहाचे निरीक्षण करणाऱ्या ‘रोसेटा’ यानाने आपल्याला पुरविली आहे. या यानाचा मुख्य उद्देश मात्र धूमकेतूचा अभ्यास करणे हा आहे. २७ सप्टेंबर २००७ ला सोडण्यात आलेले ‘डॉन’ हे यानदेखील सेरस व व्हेस्टा या दोन मोठय़ा लघुग्रहांचा अभ्यास करणार आहे.
महेश नाईक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
कमला नेहरू

कमला जवाहरलाल नेहरू यांचा वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी मृत्यू झाला. माहेरचे कौल आडनाव असणाऱ्या कमलाचा १ ऑगस्ट १८९९ रोजी जन्म झाला. त्या काळात काश्मिरी पंडितांच्या स्त्रियांना शिक्षण सोडाच, पण साधे घराबाहेर पडण्याचीही सोय नव्हती. त्यामुळे कमलेचे शिक्षण लिहिण्या-वाचण्याइतपत घरीच झाले. वयाच्या सतराव्या वर्षी प्रतिष्ठित अशा नेहरू घराण्यातील जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर १९१६ साली मोठय़ा थाटामाटात त्यांचा विवाह झाला. ज्या नेहरू खानदानात त्यांचा विवाह झाला ते मोठे प्रतिष्ठित घराणे होते. परिणामी, कमलाची तेथे थोडी घुसमट झाली. त्यांची सासू सनातनी, नणंद स्वरूप कुमारी हिच्याशीही कमलाचे जमले नाही. पती जवाहरलाल यांना राजकारणामुळे कमलाच्या सुखदु:खाकडे पाहण्यासाठी म्हणावा असा वेळच त्यांना नव्हता. १९ नोव्हेंबर १९१७ रोजी त्यांनी एका कन्येला जन्म दिला. तिचे नाव इंदिरा. आपल्या घराण्याचा, पतीचा समाज आणि राजकारणाचा वारसा कमलाने समर्थपणे चालविला. विशेष म्हणजे प्रकृती साथ देत नसताना. कारण त्यांना क्षयाची बाधा जडली होती. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तथापि दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली, तेव्हा आजारपणाला कंटाळलेल्या कमला नेहरूंनी रामकृष्ण मिशनच्या स्वामी शिवानंदांकडून दीक्षा घेतली. बिहारमधल्या भूकंपग्रस्तांसाठी उन्हातान्हाची पर्वा न करता त्या फिरल्या. तेव्हा उपचारासाठी पं. नेहरूंनी त्यांना स्वित्र्झलड येथे नेले. ‘भारताचा शोध’ या आपल्या आत्मचरित्रात पं. नेहरूंनी आपण आपल्या पत्नीला हवी तशी साथ देऊ शकलो नाही अशी स्पष्ट कबुली दिली. तेव्हा अखेरच्या क्षणी तरी आपण तिच्याजवळ असावे, असे पंडितजींना वाटले. त्यामुळे भारतात येण्याचा बेत रद्द केला. अखेर २८ फेब्रुवारी १९३३ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
ऋतुराणींची गाणी

कुमारच्या बाबांनी नवा बंगला सुशोभित करण्यासाठी गालिचे, पेटिंग्ज, पुतळे, फर्निचर विकत घेतले. त्याचबरोबर हॉलमध्ये टांगण्यासाठी दोन मैना आणि एक पिंजराही घेतला. मैनेचा पिंजरा आला आणि कुमारचे सगळे जगच बदलून गेले. धान्य, दाणे, सुका मेवा, फळे देऊन पक्ष्यांची त्याने चंगळ करून टाकली. जोडीचे त्याने नाव ठेवले ‘ऋतू’ आणि ‘राणी’. तो पक्ष्यांना बोलायला शिकवायचा. पण पक्षी बोलायचे नाहीत. आपण या पिंजऱ्यात कैदी आहोत याचे पक्ष्यांना फार दु:ख व्हायचे. उदासपणे पंख मिटून, माना वळवून, चोच पंखात खुपसून ते बसून राहायचे. ऋतू म्हणायचा, ‘‘संधी मिळाली की आपण इथून निसटून जाऊ. पुन्हा झाडावर बसू. गाणी गाऊ. घर बांधू. आपल्याला इवली इवली बाळे होतील. त्यांच्यासाठी चोचीमध्ये चारा आणू. त्यांना उडायला शिकवू.’’ राणी म्हणे, ‘‘कुमार, आपल्यावर प्रेम करतो. काळजी घेतो. खायला देतो.’’ ऋतू म्हणाला, ‘‘अगं, ते प्रेम नाही. प्रेम असतं तर असं पिंजऱ्यात कोंडून ठेवलं नसतं त्यानं आपल्याला. आपलं स्वातंत्र्य घालवलं नसतं. आपल्याला दु:खी केलं नसतं. आपण दोघं त्याच्यामुळेच जाळय़ात अडकलो. शहाणी असलीस तर चल माझ्याबरोबर.’’ राणीला रागाने ओरडली, ‘‘तुला चांगला वाईट कळत नाही. इथं राहायला सुरक्षित जागा आहे. कष्ट न करता खायला भरपूर मिळतं. हे सुखाचं जीवन सोडून मी येणार नाही.’’ दुसऱ्या दिवशी ऋतू खरंच उडून गेला. राणी पिंजऱ्यात एकटीच उरली. ऋतूची उंबराच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. मनसोक्त उंबरं खाल्ली. पुन्हा भूक लागल्यावर चरणाऱ्या गुरांच्या मागे राहून त्यांच्या हालचालीमुळे गवतामधून उडणारे टोळ, नाकतोडे त्यानं कौशल्यानं गट्ट केले. तो स्वत:वर खूश झाला. साळुंक्यांचं कुलुकुलु बोलणं सुरू झालं तशी त्याला राणीची आठवण आली. तो परतला. पाहतो तर पिंजऱ्याला कुलूप आणि राणी आत बंद होती. खाण्याला तोंड न लावता मलूलपणे पडली होती. एक पक्षी उडून गेला आणि दुसरा आजारी म्हणून कुमार रोज राणीशी बोले. खायला देई, पण राणी खाण्याला तोंड लावेना. कुमारचे बाबा नोकराला म्हणाले, ‘‘अरे, मेलेला पक्षी कशाला ठेवलाय फेकून द्या आणि पिंजरा धुऊन टाका.’’ कुमारनं राणीला अलगद ओंजळीत घेतलं. तिचं शरीर उबदार होतं. छाती हालत होती. ऋतू उडून झाडावर बसला होता. कुमारनं राणीला अलगदपणे झाडाच्या दुबेळक्यात ठेवलं. घरी येऊन खिडकीत उभं राहून पुढे काय होतं ते पाहू लागला. ऋतू राणीच्या जवळ बसून पंखांनी ऊब देत होता. गर्द तपकिरी रंगाची ती जोडी झाडावर बसली होती. दोघं शब्द करीत होती. रिडिआऽऽरिडिआऽऽऽ. पक्षी पाळण्याची चूक पुन्हा आयुष्यात कधीही करायची नाही, असं कुमारनं त्याचक्षणी ठरवून टाकलं.
आपल्या हातून चुका होतात. यातून मार्ग नाही, असं वाटून आपण हैराण होतो. चुका सुधारण्यासाठी तुम्ही माफी मागू शकता, पुन्हा नव्यानं सुरुवात करू शकता, अशी चूक पुन्हा करायची नाही, असं ठरवू शकता. आजचा संकल्प- मी माझी चूक सुधारेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com