Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

सिप्ला कंपनीच्या बसला अपघात; २३ जखमी
पनवेल/प्रतिनिधी : पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील सिप्ला कंपनीच्या बसला आज पहाटे रसायनी व सावळादरम्यान झालेल्या अपघातात २३ कर्मचारी जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्याना किरकोळ वा मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, कोणाच्याही प्रकृतीला धोका नसल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. पहिल्या पाळीतील कामगारांना कंपनीत घेऊन जाणारी ही गाडी पनवेलहून सुटली होती. यावेळी गाडीत ४२ कर्मचारी होते. रसायनी व सावळादरम्यान विक्रम डहाणे या बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही गाडी उलटली व आतील कर्मचाऱ्यांना दुखापती झाल्या. यावेळी बहुतांश कर्मचारी झोपेत असल्याने अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही, परंतु गाडी भरधाव वेगात असल्यानेच हा प्रकार घडला, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले, मात्र गाडीचे स्टिअरिंग जखडले गेल्याने हा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला. यातील १५ जखमींवर रेगे रुग्णालयात, तर आठ रुग्णांवर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऐरोली बालाजी मंदिराचा ‘कल्याणम’ महोत्सव
मुंबई/प्रतिनिधी : ऐरोली येथील भव्य बालाजी मंदिर हे परिसरातील भाविकांच्या आकर्षणाचे आणि श्रद्धेचे केंद्र झालेले आहे. मंदिरात आज शनिवार व उद्या रविवारी ‘कल्याणम’ आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. येथील तेलुगु असोसिएशनने पुढाकार घेऊन या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. तिरुपती येथील बालाजी मंदिराच्या धर्तीवर ‘अग्माशास्त्रा’च्या संहितेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने या मंदिराची रचना केलेली आहे. हम्पी पीठाचे शंकराचार्य श्री भारती स्वामीजी यांच्या हस्ते मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

अतिक्रमण विभागाचे टेंडर ‘रिंग’?
ठेकेदारांना धमकावल

नवी मुंबई/प्रतिनिधी : नवी मुंबई परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी खासगी पद्धतीने ठेका देण्यासाठी महापालिकेने मागविलेले टेंडर रिंग झाल्याच्या चर्चेमुळे आज महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. कंत्राटी कामांमध्ये सोकावलेल्या ‘रिंग मास्टर’ना अटकाव बसावा यासाठी ई-टेंडरिंगचा पर्याय पुढे आणणाऱ्या आयुक्त विजय नाहटा यांच्याकडेही या ठेक्यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विशेष म्हणजे, या कामाचे टेंडर भरावयास आलेल्या काही ठेकेदारांना मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धमकावले गेल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या असून, टेंडर भरावयाची तारीख पुढे ढकलावी, अशी रास्त मागणी आयुक्तांनी फेटाळल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, विरोधी पक्षनेते रमाकांत म्हात्रे यांनी अतिक्रमण विभागाचे टेंडर रिंग झाल्याचा आरोप करत, थेट मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने नाहटा पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पेण प्रा. शिक्षक पतपेढी निवडणूक
उरण गटातून शिक्षक सेनेचे यशवंत पाटील विजयी

उरण/वार्ताहर : पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उरण गटातून शिक्षक सेनेचे उमेदवार यशवंत पाटील हे निवडून आले आहेत, तर महिला राखीव गटातून रंजना केणी विजयी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. जिल्ह्यातून २६ उमेदवारांच्या निवडीसाठी पालकर पॅनेल, शिवाजी पॅनेल व शिक्षक सेना आणि दोंदे पॅनेलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

सांस्कृतिक कार्यक्रमातून साजरा झाला मराठी दिन
उरण/वार्ताहर : येथील उरण एज्युकेशन संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मराठी दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला. या दिनाचे औचित्य साधून मराठी संस्कृतीची माहिती देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शाळेच्या पालक मैदानात मराठी दिवस साजरा करताना विद्यार्थ्यांनी मराठीच्या थोरवीची माहिती मनोरंजन व विविध मराठमोळ्या वेशभूषेतून दिली. पोवाडय़ाने सुरुवात करून मराठी भाषेतील, विविध प्रांतांतील भाषांमधून सुसंवादाचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी ‘महाराष्ट्र दर्शन एक्स्प्रेस’ मनोरंजक कार्यक्रमातून तुफान वेगाने हाकली. यावेळी महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या विविध मराठी सणांचेही महत्त्व व माहिती विद्यार्थ्यांनी मनोरंजन कार्यक्रमातून दिली. महाराष्ट्रातील लोकगीते व लोकनृत्यांचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्रभारी अध्यक्ष मिलिंद पाडगावकर, स्नेहल प्रधान, आनंद भिंगार्डे, इतर पदाधिकारी व पालक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

परवान्यांच्या नूतनीकरणामुळे रिक्षाचालकांना दिलासा
बेलापूर/वार्ताहर : तांत्रिक कारणांमुळे परवान्यांचे नूतनीकरण करू न शकलेल्या रिक्षाचालकांना शासनाने पुन्हा एकदा परवाना नूतनीकरणाची संधी दिली आहे. नवी मुंबईतील २९५० रिक्षाचालकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे रिक्षांच्या संख्येत वाढ होऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. आरटीओने जाहीर केलेल्या मुदतीत परवाना नूतनीकरण करण्यास अडचणी आलेल्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते; मात्र हातावर पोट असलेल्या या घटकाने वारंवार आरटीओकडे परवाना नूतनीकरणासाठी पाठपुरावा केला. नवी मुंबई आरटीओने याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा केला. याची दखल घेत अखेर शासनाने उपरोक्त निर्णय घेतल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले. ३० मेपर्यंत परवाना नूतनीकरणाची अंतिम मुदत असल्याचे ते म्हणाले.

हिंदुत्ववादी संघटनांची बदनामी करणारे संकेतस्थळ बंद
बेलापूर/वार्ताहर : शिवसेना, हिंदू जनजागृती समिती व श्रीराम सेना यांची बदनामी करणाऱ्या संकेतस्थळावर बंदी घालावी व हे संकेतस्थळ काढणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना व हिंदू जनजागृती समितीने पोलीस उपायुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली होती. मागील सप्ताहात हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. मात्र त्यानंतर हे संकेतस्थळ समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर बंद करण्यात आले. कोरिया येथील एका संकेतस्थळाने उपरोक्त संकेतस्थळ सुरू करण्यास परवानगी दिल्याचे समितीस आढळून आले. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित संकेतस्थळाला बदनामी करणाऱ्या संकेतस्थळाची माहिती देऊन ते बंद करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी कारवाईसाठी संबंधित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपशहरप्रमुख अतुल कुलकर्णी, नगरसेवक विजय माने, हिं.ज.स.चे यज्ञेश सावंत, डॉ. उदय धुरी पोलिसांना निवेदन देताना उपस्थित होते.

कोमसापतर्फे मराठी भाषा दिन
नवी मुंबई/प्रतिनिधी : कोमसाप, सीबीडी, नवी मुंबई शाखेतर्फे शाखाध्यक्ष शकुंतला महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ८०० विद्यार्थ्यांच्या समवेत मराठी भाषा दिन- कुसुमाग्रज जयंती साजरी करण्यात आली. त्या समारंभात जिल्हाध्यक्ष सुप्रसिद्ध कवी-पत्रकार परेन शिवराम जांभळे, गझलनवाझ मनोहर रणपिसे, बालकवी गजानन परब, कवयित्री ऊर्मिला बांदिवडेकर इत्यादींनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांसोबत स्वरचित कविता सादर केल्या. विद्याप्रसारक मंडळ हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा बेलापूर, भारती विद्यापीठ प्रशाला, ज्ञानपुष्प विद्यानिकेतन सीबीडी आणि नूतन मराठी विद्यालय नेरुळ या शाळांमध्ये हे कार्यक्रम झाले. संबंधित शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनीही कविता सादर केल्या.

महिलांसाठी रिव्हर क्रॉसिंगची सुवर्णसंधी
पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्लब ऑक्सिजन आयोजित व अजय गाडगीळ फाऊंडेशनच्या सहकार्याने महिलांसाठी रिव्हर क्रॉसिंगची सुवर्णसंधी चालून आली आहे. ८ मार्चला कराड ते गुळसुंदे या दरम्यान पाताळगंगा नदीचे २०० फूट लांब पात्र २५ फुटांवरून पार करण्याचा थरार महिलांना अनुभवता येणार आहे. यासाठी या दिवशी सकाळी ७ वाजता पनवेलहून सहा आसनी रिक्षांची सोय आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. या थरारापूर्वी गुळसुंदा-कराड गावातील अंतर बोटीद्वारे पार करण्याचा अनुभवही महिलांना मिळणार आहे. एक वेळचा चहा, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. यचा साहस शिबिरात अन्य नागरिकांनाही प्रवेश आहे. मात्र महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संपर्क- हेमचंद्र देवधर (९३२०२५९२२२).

दोन ग्रामपंचायतीतं काँग्रेसचे सरपंच
उरण : तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने दोन, तर शेकापने एक ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. उरण तालुक्यातील आवरे, मोठी जुई व कोप्रोली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत आवरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना म्हात्रे (काँग्रेस), तर उपसरपंचपदी विक्रांत वर्तक (मनसे) हे निवडून आले आहेत. मोठी जुई ग्रामपंचायतीवरही काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. या ठिकाणी सरपंचपदी गोमाजी जोशी, तर उपसरपंचपदी प्रतीक्षा पाटील हे निवडून आले. कोप्रोली ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी शेकापच्या अलका म्हात्रे, तर उपसरपंचपदी कृष्णा पाटील हे विजयी झाले आहेत. येत्या १ मार्च रोजी विंधणे, तर सोनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवडणूक ११ मार्च रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दिलीप वाळंज यांनी दिली.

आकलन क्षमतेनुसार अभ्यासक्रम असावा
बेलापूर : विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार अभ्यासक्रम व शैक्षणिक साधने उपलब्ध करावीत, असे मत डॉ. वृंदा दत्ता यांनी वाशी येथे व्यक्त केले. भारतीय महिला वैज्ञानिक असोसिएशन संचालित बालवाडी प्रशिक्षकांच्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बालवाडी शिक्षिकेचा डिप्लोमा करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या विज्ञान, परिसर अभ्यास, संवेदनक्षमता या विषयावर शैक्षणिक साधनांचे प्रदर्शन व शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. दत्ता उपस्थित होत्या. शैक्षणिक साधने कालसापेक्ष असावीत, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात औत्सुक्य निर्माण होईल, अशा तऱ्हेने शिकविणे गरजेचे असल्याचे मत डॉ. दत्ता यांनी व्यक्त केले. याप्रसंगी असोसिएशनच्या डॉ. सुधा राव यांनी या प्रदर्शन व शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी डॉ. बी.एस. महाजन, डॉ. उषा ठाकरे आदी उपस्थित होते