Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरीसच उन्हाचे चटके
प्रतिनिधी / नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच दुसरीकडे उन्हाचे चटकेही तितक्याच तीव्रतेने बसत असल्याने कधी नव्हे ते यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानाने ३६ ते ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्य़ात झाली असली तरी जळगाव, नंदुरबार आणि थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असणारे नाशिकही त्याला अपवाद ठरू शकलेले नाही. दरम्यान, तापमानाच्या नोंदीपासून आजवर वंचित असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्य़ात या वर्षीही अधिकृत नोंद होण्याची व्यवस्था झालेली नाही.
उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना यंदा थंडीची अनुभूती फार काळ मिळू शकली नाही. थंडी गायब झाल्यानंतर हळूहळू उन्हाचा तडाखा वाढू लागला आणि सध्या तर ऐन एप्रिल-मे मध्ये जसे वातावरण असते, तशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशकात उन्हाची तीव्रता या काळात इतकी प्रखरतेने अलीकडील काळात कधी जाणवली नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नाशिकचे कमाल तापमान सध्या ३७ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. वातावरणात झालेल्या कमालीच्या बदलांनी कडाक्याच्या उन्हाळ्याची चाहूल मिळू लागली आहे. कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असणारे नाशिकचे तापमान आज जळगावशी स्पर्धा करीत आहे. गेल्या काही वर्षांंत जळगाव हा सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या जळगाव व नाशिकचे तापमान एकसमान असल्याने आगामी काळात नेमकी कशी स्थिती राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी उन्हाळ्याच्या काळात जळगाव शहरात ४७ तर भुसावळला ४८ अंश इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली होती. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत थंडीचे प्रमाण कमी राहिले. नाशिक, जळगावसह नंदुरबार जिल्ह्य़ात होळीनंतर तापमापकाचा पारा उंचावण्यास सुरूवात होते. यंदा मात्र १० ते १५ दिवस अगोदरच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. सकाळी अकरानंतर उन्हाची दाहकता वाढत असल्याने शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य होऊन जातात. त्यामुळे बाजारपेठेतही सामसुम होत असून दिवसभराचे व्यवहार थंडावल्याचे दिसत आहे. सायंकाळी सहानंतर उष्मा काहिसा कमी झाल्यानंतर खरेदी व इतर कामांसाठी नागरीक घराबाहेर पडताना दिसतात. जळगावचे तापमान आताच ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने यंदा गेल्या वर्षीचा उच्चांक मोडला जातो की काय अशी चिंता सर्वाना सतावत आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. धुळे जिल्ह्य़ात ३८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून गेल्या वर्षी तापमान थोडय़ा-फार फरकाने असेच राहिले होते. नंदुरबारमध्ये उन्ह्य़ाचा तडाखा बसू लागला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व प्रमुख ठिकाणी तापमानाची नोंद घेण्यासाठी व्यवस्था असली तरी नंदुरबार जिल्ह्य़ात मात्र तापमापक उपलब्ध नाही. परिणामी, नंदुरबार जिल्ह्य़ात तापमान कितीही वाढले तरी त्याची अधिकृत माहिती मिळू शकत नाही. नंदुरबार जिल्हा प्रशासन धुळे जिल्ह्य़ातील तापमान हेच आपले तापमान मानण्यात धन्यता मानते. नंदुरबार येथे तापमापक उपलब्ध व्हावे म्हणून हवामानशास्त्र विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.