Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कुठे बालकवी संमेलन; तर कुठे पुस्तकांचे संकलन
मराठी भाषादिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी / नाशिक

बालकवी संमेलन, मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांचे संकलन, व्याख्याने आणि कविता वाचन अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांनी शुक्रवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून शहरातील विविध संस्था, संघटना, महाविद्यालये आणि राजकिय पक्षांनी उत्स्फुर्तपणे साजरा केला.
सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या सार्वजनिक वाचनालयातर्फे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठीच्या संवर्धनासाठी, मायबोलीचे महत्व, मराठी दिन वाचकांपर्यंत पोहचावा यासाठी फलकांवर मराठी विषयाशी संबधित वृत्तपत्रिय लेख, मान्यवरांचे लेखन प्रदर्शित करण्यात आले होते. या शिवाय, बाहेरील फलकावर कुसुमाग्रजांची कविता सादर करण्यात आली. लोकहितवादी मंडळातर्फे बालकवी संमेलनाच्या माध्यमातून मराठीदिन साजरा करण्यात आला. संमेलनात राज्यभरातील ८० हून अधिक बालकवी सहभाग घेतल्याची माहिती संयोजकांनी दिली. राका कॉलनी येथील सभागृहात आयोजित संमेलनाचे उद्घाटन आ. हेमंत टकले यांच्या हस्ते झाले. छोटय़ा गटात मराठा हायस्कुलची तनवी पाटील, रचना हायस्कुलची इशा कुलकर्णी आणि इशा गांगुर्डे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर रचना विद्यालयाचा प्रथमेश कुलकर्णी, शासकीय कन्या विद्यालयाची निकीता सुलाखे उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. मोठय़ा गटात शारदा मंदिरची अपूर्वा जोशी, आदर्श हायस्कुल वैदेही शिंदीकर, रचना हायस्कुलची कृतिका देव विजेते ठरले. पंचवटी माध्यमिक विद्यालयाची पूनम चोरमोरे, सिडीओ मेरीची करिश्मा लोहार यांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड झाली. उपमहापौर अजय बोरस्ते यांच्या हस्ते पुरस्कार्थीना गौरविण्यात आले. परिक्षक म्हणून अरूणा कुलकर्णी, सुधीर सराफ यांनी काम पाहिले. संमेलनात मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, सचिव नवीन तांबट, ज्येष्ठ निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे, रमेश देशमुख आदी उपस्थित होते.
मराठी दिनानिमित्त मनसेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी दिली. मनसेच्या विद्यार्थी संघटनेतर्फे कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेचे वाचन पराग शिंत्रे यांनी केले. मनसेतर्फे तीन मार्च रोजी कुसुमाग्रज करंडक घोष वाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील राजकिय नेता कसा असावा?, मराठीचे आज, उद्या आणि पुढे काय?, महाराष्ट्रातील वाढती घुसखोरी हे विषय निश्चित करण्यात आले असून आतापर्यंत ८० हून अधिक स्पर्धकांनी नांव नोंदणी केली आहे.
के. टी. एच. एम महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने स्वानंद बेदरकर यांचे ‘मराठी दिनाचे महत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभ्यास केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरता मर्यादीत न ठेवता विविध करीअर त्याचा विचार केला पाहिजे, असा सल्ला गायकवाड यांनी दिला. मराठी भाषा वैश्विक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. एच. पी. टी महाविद्यालयात मराठी विभागातर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जनस्थान पुरस्कार प्राप्त ना. धो. महानोर यांच्या कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या.
कुसुमाग्रजांच्या कवितांचेही वाचन यावेळी करण्यात आले. ‘मराठी दिनाची गरज आणि महत्व’ या विषयावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बदलत्या काळात इंग्रजी येणे गरजेचे असले तरी विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध संधी लक्षात घेऊन मराठीचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे आवाहन यावेळी करण्यात आले. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयात विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाची सीडी दाखवण्यात आली.