Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मनमाड येथे आज नाशिक विभागीय वकील परिषद
वार्ताहर / मनमाड

मनमाड शहर वकील संघ आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या हस्ते होणार आहे.
पल्लवी मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत पाच जिल्ह्य़ांतून सहाशे वकील सहभागी होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. आर. वाय. गानू तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष राजीव पाटील उपस्थित राहणार आहेत. तालुकास्तरावर वकील आणि पक्षकारांना येणाऱ्या अडचणींवर अभ्यासपूर्ण चर्चा करून काही महत्वाचे ठराव यावेळी मांडले जातील, अशी माहिती अ‍ॅड. अनिल कुंझरकर व अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी दिली.
प्रथम सत्रात दिवाणी न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पाच लाखापर्यंत व अपील अधिकार क्षेत्र २५ लाखापर्यंत वाढवावे यावर चर्चा होणार आहे.
दुसऱ्या सत्रात तालुकास्तरावरील व ट्रायल कोर्टावरील विविध प्रश्न, हुकूमनामा अमलबजावणीबाबतच्या अडचणी, न्यायालयात इमारत व इतर प्रश्न मराठी भाषेच्या वापरासंबंधीच्या अडचणी, कलम १३८ खटल्याबाबतच्या त्रुटी व सूचना यावर चर्चा होणार आहे. न्यायालयीन कामकाजाच्या तरतुदी, दिवाणी तसेच फौजदारी प्रक्रियेबाबतच्या अडचणींवर चर्चा केली जाईल. सर्वसामान्यांचे न्यायालयीन कामकाज तालुका व जिल्हास्तरावरील ट्रायल न्यायालयात चालते.
महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने ट्रायल न्यायालय सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू ठेवले आहे. मोठय़ा परिषदांमध्ये विशेष करून ट्रायल न्यायालयाचे व तालुका न्यायालयाचे विविध प्रश्न, अडचणींची चर्चा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही. या सर्व प्रश्नांची चर्चा व्हावी व त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.