Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

आदिवासींच्या शिक्षणाचे प्रणेते : कर्मवीर भाऊसाहेब हिरे

नाशिक जिल्ह्य़ातील आदिवासी उत्थानाची सुरूवात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी केली. आदिवासी शिक्षण आणि विकास विषयक मर्यादांच्या पाश्र्वभूमीवर भाऊसाहेबांचे योगदान दिशादर्शक ठरणार आहे. १ मार्च रोजी हिरे यांची जयंती, त्यानिमित्त त्यांच्या आदिवासी शिक्षण विषयक कार्याची ओळख करून देणारा लेख..

महाराष्ट्र ही शिक्षणाची उज्ज्वल व यशस्वी परंपरा लाभलेली भूमि असून कर्मवीर भाऊसाहेब हिरे या भूमीचे थोर पुत्र आहेत. भाऊसाहेबांचे समाजकारण, अर्थकारण, राजकारण असे विविधांगी कार्य असून आदिवासी शिक्षणातील त्यांच्या मौलिक योगदानामुळे त्यांना श्रेष्ठत्व लाभले आहे. आदिवासी विकासासाठी शिक्षण ही मुलभूत गरज असल्याचे ओळखून भाऊंनी बुवा गुरूजींच्या साथीने आदिवासी सेवा समितीची स्थापना केली. नाशिक जिल्ह्य़ात या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एकूण सामाजिक परिस्थिती व त्यातही आदिवासींची स्थिती विचारात घेता आदिवासी सेवा समितीची स्थापना ही वंचितांसाठी संधी ठरली. महाराष्ट्रात ठक्कर बाप्पा, आचार्य भिसे, अनुताई वाघ, शंकरराव ठकार यांच्याप्रमाणेच आदिवासी शिक्षणासाठी वाहून घेतलेल्यांमध्ये कर्मवीर हिरे व दादासाहेब बीडकर यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
कर्मवीर हिरे यांनी कुळकायद्याव्दारे आदिवासींना शेतजमिनीचे मालक बनविण्याचे महनीय कार्य केले. यामुळे वेठबिगारी, र्सवकष शोषण असे जीणे वाटय़ाला आलेल्या आदिवासींना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळाली. सध्या महाराष्ट्रातील ८५ टक्के आदिवासी चरितार्थासाठी शेतीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील ४५ टक्के आदिवासी जमातीपैकी कोकणा, महादेव कोळी या शेतीवर स्थानिक झालेल्या प्रगतीशील जमाती आहेत. महाराष्ट्रातील नाशिक हा आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत ठाण्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा असून एकूण लोकसंख्येत आदिवासी लोकसंख्येचे शेकडा प्रमाण २३.९२ टक्के आहे. आदिवासींसंदर्भात हे चित्र निर्माण होण्यास कर्मवीरांनी केलेला कुळकायदा आणि आदिवासी शिक्षणाची सुरूवात या दोन क्रांतीकारक घटना जबाबदार आहेत.
दुर्गम भागात दारिद्रय़ाच्या दुहेरी रेषेखालचे जीवन जगणाऱ्या आदिवासींसाठी शिक्षणाची कवाडे खुली करण्याचे कार्य भाऊंनी केले. मुख्य प्रवाहापासून दूर जंगल सान्निध्यात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या आदिवासींसाठी समस्यांचा डोंगर असताना शिक्षणाची गंगा पोहचण्याचे कार्य भाऊसाहेबांनी केले. जंगलाधिष्ठीत आदिवासी जीवनाला धक्का न लावता भाऊंनी आदिवासी आश्रमशाळांची स्थापना केली. जिल्ह्य़ातील बहुजन, दलित व आदिवासींसाठी कार्य करताना कर्मवीरांना अनेक खंद्या सेनानींची साथ लाभली. कोकणा, महादेव कोळी, भिल्ल, कातकरी अशा आदिवासी जमातींना शोषण मुक्तीचा शिक्षणमंत्र कर्मवीरांनी दिला. भाऊसाहेबांनी पाडय़ावर शिक्षण नेले तर शिक्षित आदिवासींना नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले. स्वतंत्र भारत व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कर्मवीरांना महादेव कोळी व इतर आदिवासींची साथ लाभली. आदिवासींकडे ‘वोट बँक’ म्हणून न पाहता निस्पृह भावनेतून भाऊसाहेबांनी कार्य केले. आदिवासींना सोबत घेऊन कार्य करणारे द्रष्टे समाजकारणी म्हणून कर्मवीरांचे योगदान आहे. नाशिक हा आदिवासी बहुल जिल्हा असून सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, इगतपुरी व सटाणा हे आदिवासी लोकसंख्येचे तालुके आहेत. प्रस्तुत तालुक्यांमध्ये भाऊसाहेबांनी स्थापन केलेल्या महात्मा गांधी विद्या मंदीर व आदिवासी सेवा समिती या संस्थांच्या माध्यमातून आदिवासी शिक्षणाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. या संस्था शैक्षणिक बदल स्वीकारताना आदिवासी भागासाठी विशेष योजना राबवत असून त्यामुळे सामाजिक न्यायाने भिन्न संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी भागात प्राथमिक शिक्षण हे पदव्युत्तर शिक्षण, व्यवसायाभिमुख शिक्षण, संगणक प्रशिक्षण, विशेष मार्गदर्शन वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा गरजेनुसारच्या शिक्षणाला महत्व दिले जात आहे. नाशिक जिल्ह्य़ातील आदिवासी बांधव सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय अशा अनेक आघाडय़ांवरून सन्माननीय पदांवर कार्यरत असून त्याचे श्रेय भाऊसाहेब हिरे व दादासाहेब बिडकरांना आहे. आदिवासी व त्यांच्या समस्या याविषयी बोलणारे अनेक असून प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांमध्ये कर्मवीरांचे स्थान अग्रणी आहे.
भाऊसाहेबांसारख्या द्रष्टय़ा व तळमळीच्या कार्यकर्त्यांने शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम मानून आदिवासी विकासाची सुरूवात केली. सध्या भारत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वच आघाडय़ांवरून संक्रमणावस्थेतून जात आहे. देशात सामाजिक अभिसरण होत असले तरी ते धीमे असून जागतिकीकरण आदिवासींच्या उपेक्षेत भर टाकणारे ठरत आहे. शिक्षण ही बाजारसेवा बनली असून शहरी-ग्रामीण असा विचार करता प्रचंड विरोधाभासाची स्थिती अस्तित्वात आहे. देशाचा विचार करता आदिवासी शिक्षण आघाडीवरील साचेबद्ध प्रयत्न आदिवासी विकासाच्या मर्यादा निश्चीत करणारे आङेत. या पाश्र्वभूमीवर भाऊसाहेब हिरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय व अंमलबजावणी महत्वाची आहे.
प्रा. जी. डी. खरात, येवला.