Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

इगतपुरी तालुका ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथे एक मार्च रोजी ११ वे ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, कथाकथन, एकपात्री प्रयोग, कविसंमेलन आणि पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने या उपक्रमाचा परिचय..

सध्या विविध प्रकारची साहित्यसंमेलने होत आहेत. नुकतेच विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत झाले. महाबळेश्वर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून ओबीसी साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, भटक्या विमुक्तांचे संमेलन, ख्रिस्ती, मुस्लीम, बाल, विज्ञान, कामगार अशी साहित्य संमेलने नेहमी साजरी होतात. अखिल भारतीय मराठी सहित्य संमेलन हे आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहाराचे महत्वाचे अंग बनले आहे. नाशिक जिल्ह्य़ातही सातत्याने नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्हा पातळीवर साहित्य संमेलन भरविले जाते. त्याचप्रमाणे सिन्नर, सटाणा, येवला, मालेगाव, इगतपुरी, आदी तालुक्यांमध्ये दरवर्षी जिल्हा पातळीवरील साहित्य संमेलने होत असतात. या संमेलनांमध्ये सर्वसामान्य मराठी रसिकांच्या दृष्टीने मराठीच्या साहित्य विश्वात एकत्रितपणे विहार करण्याची एक उत्कृष्ट संधी असते.
कवीवर्य कुसुमाग्रजांच्या आशीर्वादाने १९९९ मध्ये स्थापन झालेल्या इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षी सहित्य संमेलन पुंजाजी मालुजकर यांच्या पुढाकाराने भरविले जाते. आजपर्यंत या तालुक्यात १९९९ पासून वाडिवऱ्हे, घोटी, वैतरणा नगर, इगतपुरी, मुकणे आदी ठिकाणी एक दिवसीय साहित्य संमेलने झालेली आहेत. तालुक्याच्या डोंगराळ भागातून, निसर्गरम्य परिसरातून, नदी, नाले, झाडी, धरणाच्या पाणलोट क्षेत्रांचे दर्शन या निमित्ताने नाशिक जिल्ह्य़ातील साहित्यिकांना झाले. धार्मिक स्थळे, रस्ते, गावांची रचना, तेथील ग्रामस्थांचे राहणीमान, त्यांचे प्रश्न, त्याची उपजीवकिेची साधने या सर्वाची तोंडओळख, साहित्यिकांना, विचारवंतांना प्रसारमाध्यमांमार्फत पोहोचविण्यात हे साहित्य मंडळ यशस्वी झाले आहे.
साहित्य मंडळाने कोणत्याही प्रकारचा निधी उभारलेला नाही किंवा कोणाचे अनुदानही घेतले जात नाही. असे असतानाही दरवर्षी न चुकता १० ग्रामीण साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन झाले आहे. या एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पाहुण्यांची भाषणे, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन व शेवटी समारोप असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम होत असतो. त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन नवोदित लेखक कवींना प्रेरणा मिळते व ज्येष्ठ साहित्यिकांशी या निमित्ताने संवाद साधता येतो. ग्रामीण भागातले कवी, लेखक या छोटेखानी संमेलनात सहभागी होऊन आपल्या साहित्याचे सादरीकरण करतात. यानिमित्ताने या कवी, लेखकांना व्यासपीठ मिळते. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर चर्चा होते. पुढील पुस्तकांचे लेखन त्याच प्रमाणे इतर ठिकाणी संपन्न होणाऱ्या साह्य़िसंमेलनाबद्दल चर्चा आदि माध्यमातून या लेखक मंडळींची चर्चा होत असते.
इगतपुरी तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या साहित्यिकांच्या या एकदिवसीय साहित्य संमेलनाचा खर्च त्या त्या क्षेत्रातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून पूर्ण केला जातो. मंडप खर्च, भोजन खर्च, स्वागत व चहापान यांसाठी वेगवेगळे प्रोयोजक शोधून मंडळाने हा डोलारा उभा केला आहे. प्रामुख्याने ही साहित्य चळवळ अधिकाधिक समाजाभिमुख होण्यासाठी मंडळाने साहित्य व सामाजिक चळवळीत मोलाच योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी ‘सर्वतीर्थ’ हा पुरस्कार मागील दोन वर्षांंपासून सुरू केला असून गेल्या वर्षांपासून आदिवासी तालुक्यात सामाजिक कार्यासाठीचा ‘महर्षी वाल्मिक समाजभूषण’ हा पुरस्कारही सुरू केला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण संमेलनातच करण्यात येते. काव्यलेखन स्पर्धा, कथा स्पर्धा, निबंधस्पर्धाचे आयोजन करून अनेक नवोदित कवी लेखांना सहभागी करून घेतले जाते. हे या संमलेनाचे महत्वाचे वैशिष्टय़ होय.
या संमेलनासाठी ग्रामीण भागातील कथालेखक पुंजाजी मालुंजकर, भिमा मालुंजकर, गणपत दिवटे, रामदास बाबा मालुंजकर, सुशील बेदमुथा, भास्करराव कातोरे, के. टी. राजोळे, नवनाथ गायकर, अशोक शिंदे, बाळासाहेब पलाटणे, दशरथ मालुंजकर, अलका कोठावदे, गोपाळा लहामगे, साधन जाधव आदींचे सहकार्य मिळत आहे.
प्रा. छाया लोखंडे-गिरी, नाशिक.