Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये आज ‘कोकण निसर्गदर्शन’ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

आजच्या धकाधकीच्या जीवनात निसर्ग सौंदर्य, कला यांचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही ही प्रत्येकाच्या मनातील खंत आहे. काही जण मात्र मिळालेल्या वेळेत आपले वेगवेगळे छंद जोपासतात. निसर्गातील निवडक आविष्कार आपल्याला पाहता आले तर. ही संधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात अधीक्षक अभियंता म्हणून निवृत्त झालेले सुधीर लिमये यांनी नाशिककरांना आपल्या छायाचित्र प्रदर्शनातून उपलब्ध करून दिली आहे. येथील वा. गो. कुलकर्णी कलादालनात शनिवारी सकाळी दहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार प्रसाद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष अभय ओझरकर, श्रीगुरूजी रूग्णालयातील डॉ. धनंजय देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कणकवली येथे वास्तव्यास असताना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील निसर्गसौंदर्याने भारलेल्या लिमये यांनी छायाचित्रणाचा कोणताही पाया नसतांना केवळ हौस म्हणून निसर्गाच्या विविध छटा, निसर्गाने नटलेल्या स्थानांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
हे सौंदर्य इतरांनाही पाहता यावे, त्याचा आस्वाद घेता यावा या हेतूने ‘कोकण निसर्गदर्शन’ या छायाचित्रप्रदर्शनाची संकल्पना त्यांना सूचली. कलाप्रेमींना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील निर्सग, देवालये, किल्ले, समृध्द सागरकिनारे यांचा पट पहायला मिळणार आहे. याआधी मुंबई, पुणे येथील बालगंधर्व सभागृह, सिंधुदुर्ग, कणकवली, कुडाळ, सोलापूर, पनवेल या ठिकाणी या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर कोकणाची ओढ साऱ्यांना लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदर्शनास प्रवेश मूल्य न ठेवल्यामुळे कलाप्रेमींनी या प्रदर्शनास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.