Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

मराठा आरक्षणप्रश्नी नाशिकमध्ये रास्ता रोको
नाशिक / प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी राज्य शासनाने चालढकल करण्याची भूमिका स्वीकारल्याच्या निषेधार्थ गुरूवारी मराठा आरक्षण समन्वय समितीतर्फे शहरातील द्वारका चौकात रास्ता रोको करण्यात आले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये २५ टक्के आरक्षण मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असला तरी राज्य शासनाकडून त्याला थंड प्रतिसाद मिळत असल्याची तक्रार समन्वय समितीने केली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या या थंड प्रतिसादाच्या विरोधात गुरूवारी राज्यभरात रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने सकाळपासून द्वारका चौकात प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. नगरसेवक सचिन मराठे, समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी द्वारका चौकात रास्ता रोको करीत काही काळ वाहतूक रोखून धरली. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते.
तथापि, शासनातील काही घटक या आरक्षणास विरोध करीत असल्याने निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय न घेतला गेल्यास रेल रोको, मोर्चे व मंत्र्यांना घेराव घालून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा देण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी होऊ लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर द्वारका चौकातील वाहतूक पूर्ववत झाली.