Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य गौरव पुरस्काराचे वितरण
नाशिक / वार्ताहर

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आनंदीबाई गोपाल जोशी गौरव पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिरीष कोतवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. जी. वाघ, महिला व बालकल्याण समिती सभापती मालती आव्हाड, शिवराम झोले, प्रकाश वडजे, अनिल कदम, बाबासाहेब पिंपरकर आदी उपस्थित होते.
आरोग्य सेवा सुधारताना शासकीय यंत्रणेने लोकसहभाग मिळवावा व शासनाच्या योजना यशस्वीपणे तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन सोनवणे यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय स्तरावर त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये व स्मृती चिन्ह देवून रुग्णालयाच्या पथकास सन्मानित करण्यात आले. वाघ यांनी जिल्ह्य़ातील अनेक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय असल्याचे मान्य करून चांगल्या बदलाची सुरूवात स्वत:पासून करा, दूरदृष्टीने व संवेदनशिलतेने कार्य केल्यास उत्कृष्ट कामगिरी करणे शक्य आहे, असा आशावाद पुरस्कारार्थीमुळे निर्माण झाल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रामध्ये आलेल्या रुग्णांशी सामंजस्याने संवाद साधून शासकीय निधीचा वापर लोककल्याणासाठी करा व जिल्ह्य़ात आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण द्या असेही ते म्हणाले.
आरोग्य समिती सभापती विष्णुपंत म्हैसधुणे यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांचा आदर्श यंत्रणेने घ्यावा व जिल्ह्य़ात आरोग्य परिवर्तन घडवून आणावे असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आत्मपरिक्षण करून आणि सकारात्मक बदल केल्यास जिल्हा आरोग्याच्या दृष्टीने शिखरावर नेणे शक्य आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार वितरण सोहळ्यात उपकेंद्र स्तरावर परघडी यांना प्रथम, मानूर उपकेंद्रास द्वितीय तर पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रास तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील प्रथम क्रमांकाचा २५ हजार रुपये व सन्मानचिन्हाचा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव बसवंत यांनी मिळविला. प्रास्तविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. पी. चव्हाण यांनी केले. सूत्रसंचलन बाळासाहेब कोठुरे यांनी केले.