Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

उत्तर महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरीसच उन्हाचे चटके
प्रतिनिधी / नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच दुसरीकडे उन्हाचे चटकेही तितक्याच तीव्रतेने बसत असल्याने कधी नव्हे ते यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानाने ३६ ते ३८ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद धुळे जिल्ह्य़ात झाली असली तरी जळगाव, नंदुरबार आणि थंड वातावरणासाठी प्रसिद्ध असणारे नाशिकही त्याला अपवाद ठरू शकलेले नाही. दरम्यान, तापमानाच्या नोंदीपासून आजवर वंचित असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्य़ात या वर्षीही अधिकृत नोंद होण्याची व्यवस्था झालेली नाही.

कुठे बालकवी संमेलन; तर कुठे पुस्तकांचे संकलन
मराठी भाषादिन उत्साहात साजरा
प्रतिनिधी / नाशिक

बालकवी संमेलन, मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांचे संकलन, व्याख्याने आणि कविता वाचन अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांनी शुक्रवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून शहरातील विविध संस्था, संघटना, महाविद्यालये आणि राजकिय पक्षांनी उत्स्फुर्तपणे साजरा केला. सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या सार्वजनिक वाचनालयातर्फे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठीच्या संवर्धनासाठी, मायबोलीचे महत्व, मराठी दिन वाचकांपर्यंत पोहचावा यासाठी फलकांवर मराठी विषयाशी संबधित वृत्तपत्रिय लेख, मान्यवरांचे लेखन प्रदर्शित करण्यात आले होते. या शिवाय, बाहेरील फलकावर कुसुमाग्रजांची कविता सादर करण्यात आली.

मनमाड येथे आज नाशिक विभागीय वकील परिषद
वार्ताहर / मनमाड

मनमाड शहर वकील संघ आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी नाशिक विभागीय वकील परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांच्या हस्ते होणार आहे. पल्लवी मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिषदेत पाच जिल्ह्य़ांतून सहाशे वकील सहभागी होणार आहेत.

‘डाऊ’ कंपनी विरोधात जनजागृतीयात्रा
नाशिक / प्रतिनिधी

‘डाऊ’ या परदेशी कंपनीच्या विरोधात येथे संतभूमी संरक्षण संघर्ष समितीच्या स्थानिक शाखेतर्फे जनजागृती यात्रा काढण्यात आली. समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि विश्व वारकरी सेनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष नामानंद महाराज मातोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळाराम मंदीर येथून यात्रेचा प्रारंभ होवून शिवाजी रस्त्यावरील वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय जाधव, विश्व वारकरी सेनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रदीप महाजन, मनोहर अहिरे, दीपचंद दोंदे, शांताराम महाराज, वेल्हाळ मुकणेकर आदी उपस्थित होते. ही प्रबोधन यात्रा जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुक्यांत आतापर्यंत फिरली असून शिंदेगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. यात्रेत वारकरी, कीर्तनकार टाळ मृदुंगासह सामील झाले होते. शासन जोपर्यंत ‘डाऊ’ कंपनीचा परवाना रद्द करीत नाही, तोपर्यंत अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतभूमी संरक्षण संघर्ष समिती आणि विश्व वारकरी सेवा तीव्र आंदोलन छेडतच राहणार असल्याचे प्रतिपादन नामानंद महाराज यांनी केले. वारक ऱ्यांच्या प्रश्नावर भारिप बहुजन महासंघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष डॉ. संजय जाधव यांनी दिली.

खादी ग्रामोद्योगच्या बहुउद्देशीय संकुलचे आज उद्घाटन
नाशिक / प्रतिनिधी

जिल्हा सहकारी खादी व ग्रामोद्योग संघातर्फे सिडकोतील उत्तमनगर येथे बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय संकुलाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पाच वाजता माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत नाशिक येथील खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष दिनकर शिरसाठ यांनी दिली.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आ. डॉ. वसंत पवार उपस्थित राहणार आहेत. सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शरद जरे, माजी खासदार माधवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नाना महाले, नगरसेवक लक्ष्मण जायभावे, खादी ग्रामोद्योग आयोगचे राज्य संचालक यशोधन बारामतीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिडको येथील बहुउद्देशीय संकुलात शिलाई विभाग सुरू करण्यात येणार आहे. नेहरू शर्ट, पायजमा, शोल्डर बॅग आदींची निर्मिती करून त्या वस्तुंची विक्री खादी ग्रामोद्योग भांडारात करण्यात येणार आहे. नजिकच्या काळात शिलाई उत्पादनात वाढ करून संपूर्ण महाराष्ट्रात रेडिमेड विक्री करण्याचा संस्थेचा मानस आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष पद्माकर पाटील यांसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षक परिषदेच्या सभेत विविध मागण्यांवर विचारविनिमय
नाशिक / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची सभा प्रांताध्यक्ष बाबा काळे यांच्या अध्यक्षतेखाली रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात झाली. सभेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय, सध्याचे शासनाचे धोरण व प्रलंबित मागण्यांबाबत विचार विनिमय करण्यात आला.
सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून केंद्राप्रमाणे आयोगातील तरतुदी लागू करणे, कायम विनाअनुदानित शाळेतील ‘कायम’ शब्द काढण्याबाबत अध्यादेश काढावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून विद्यमान व नियमित पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवकाचे मानधन तिप्पट करावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा नवीन व न्याय आकृतीबंध त्वरीत लागू करावा, संस्थेचे थकीत वेतनेत्तर अनुदान द्यावे, परीक्षा काळातील भारनियमन त्वरीत रद्द करावे, विनाअनुदानित शाळांना त्वरीत अनुदान देण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या असून मागण्या मान्य करण्यासाठी प्रांताध्यक्ष बाबा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे, असे संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांची कार्यशाळा
नाशिक / प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाच्या येथील उपकेंद्रात सॉफ्ट स्कील्स विभागातर्फे जिल्ह्य़ातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांची कार्यशाळा झाली. इंग्रजीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना केवळ अध्यापन करून परीक्षार्थी बनविण्यापेक्षा त्यांना प्रयोगशील बनवून आत्मनिर्भर करण्यावर भर द्यावा. इंग्रजीसारखा विषय सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांना संभाषणकुशल बनविणे ही काळाची गरज आहे. चांगल्या संवाद कौशल्यातून मानवी संबंध वाढण्यास मदत होते आणि विद्यार्थी आत्मविश्वासाने अंगिकृत कामात यशस्वी होऊ शकतो, असे विचार पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीधर गोखले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यशाळेत डॉ. गोखले यांनी ‘संभाषण कला आणि संवाद कौशल्ये’, प्राचार्य हर्षवर्धन कडेपूरकर यांनी ‘खेळकर शैलीतून इंग्रजीचे अध्यापन’ आणि डॉ. उद्धव आष्टेकर यांनी ‘इंग्रजी भाषा आणि दैनंदिन व्यवहार’ या विषयांच्या अनुषंगाने प्रात्यक्षिकांसह उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. नाशिक उपकेंद्राचे समन्वयक व प्राचार्य डॉ. पी. एस. पवार यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन डॉ. पांडूरंग भाबड यांनी केले.