Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

कापूस खरेदी सुरू ठेवण्यासाठी शिवसेनेचे निवेदन
वार्ताहर /धुळे

कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे सुरू असणारी कापूस खरेदी येत्या २० मार्च पर्यंत सुरू ठेवावी, कापसाचे शेवटचे बोंड खरेदी होईपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील हा सरकारने दिलेला शब्द पाळावा असा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. येत्या २८ फेब्रुवारी पासून कापूस उत्पादक पणन महासंघ बंद करणार असल्याचे परीपत्रक प्रसिद्ध झाल्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेतर्फे प्रा. शरद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

‘बळ’ दाखविणारे महाअधिवेशन
लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागल्याचे चित्र दिसत असले तरी यावेळच्या तयारीला कधी नव्हे ती एक साशंकता, अनिश्चिततेची किनार लाभली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होईल की नाही, शिवसेना-भाजपा युती कायम राहील की नाही, शिवसेना-राष्ट्रवादी ही नवीन युती जन्माला येईल काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप कोणालाही माहीत नसताना कार्यकर्त्यांना मात्र प्रत्येक पक्षाकडून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व काही ‘हवेत’ असताना कामाला लागावे म्हणजे नेमके काय करावे हेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे.

जळगाव व रावेरमध्ये विद्यमान खासदारांची लगबग
वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदार संघातून येत्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जळगाव मतदार संघातून विद्यमान खा. वसंत मोरे राष्ट्रवादीचे तर रावेरमधून विद्यमान खा. हरिभाऊ जावळे भाजपकडून उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. दोन्ही मतदार संघात विरोधी उमेदवारांची प्रतिक्षा केली जात असताना रावेर मधून काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील हेच शर्यतीत इतरांच्या पुढे असल्याचे चित्र दिसते.

जळगाव : रस्त्यांची धूळधाण अन् नेतेमंडळींची धूळफेक
वार्ताहर / जळगाव

सोन्याची मोठी बाजारपेठ अशी ओळख लाभलेल्या जळगावचा विकास व्यापारी व उद्योजकीय पातळीवर होऊ लागला असला तरी शहरातील बिकट अवस्थेतील रस्त्यांनी या मार्गात विविध स्वरूपाचे अडथळे निर्माण केले आहेत. रस्ते चकचकीत करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सध्या डागडुजी देऊन केवळ मुलामा देण्याचे आरंभलेले सत्र म्हणजे धूळफेकीचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विरोधकांनीही रस्ते चकचकीत नव्हे तर रखरखीत केले जात असल्याचे म्हटले आहे.

सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कारित असतेच असे नाही - प्रिया बेर्डे
कळवण / वार्ताहर

सुशिक्षित प्रत्येक व्यक्ती ही सुसंस्कारित असतेच असे नाही, एक विद्यार्थी म्हणून शैक्षणिक प्रगती करताना आपण कुठे कमी पडणार नाही याची जाणीव ठेवावी. दुसऱ्याचा आदर करणे शिका तेव्हाच आपलाही आदर दुसरा करेल असा सल्ला अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी दिला. कळवण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

व्यक्तिमत्त्व विकास - ३
पेन्सिलीची गोष्ट

तो छोटासा मुलगा त्याची आजी पत्र लिहीत असताना एकटक निरीक्षण करत होता. काही वेळाने त्याने विचारले, ‘‘आजी, तू आपल्याबद्दल त्या पत्रात लिहीत आहेस का?’’
आजीने दिलेले उत्तर फार मार्मिक होते. ती म्हणाली, ‘‘बाळा, मी आपल्याबद्दलच या पत्रात लिहीत आहे. पण मी काय लिहिले, त्या शब्दापेक्षा मी लिहीत असलेली पेन्सिल जास्त महत्त्वाची आहे. मोठा झाल्यावर तू या पेन्सिलीसारखे व्हावे असं मला वाटतं!’’

पॉलिश करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे दागिने लंपास
लासलगाव / वार्ताहर

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगत येथील महावीरनगर मधील जव्हेरीलाल फुलफगर यांच्या कुटुंबियांचे सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचे सोने दोन भामटय़ांनी लांबविले. लासलगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सेवानिवृत्त शिक्षक जव्हेरीलाल फुलफगर यांच्या घरी आलेल्या दोघांनी, आम्ही कंपनीची कामे करतो, रॉयल पावडर विक्री करतो, केवळ १४ रुपयात दोन पुडय़ा देतो असे सांगून बंगल्याची नामपट्टीका पावडर लावून स्वच्छ करून दाखवली. यानंतर या भामटय़ांनी फुलफगर यांची सून रुपालीच्या हातातील चार सोन्याच्या बांगडय़ा पॉलिश करून देतो असे सांगितले. परंतु, त्यांनी नकार दिला. मग उभयतांनी घरातील इतर महिलांकडून पॉलिश करून देण्याच्या नावाखाली सोन्याचांदीची दागिने घेतले. एका कुकरमध्ये दागिने टाकत असल्याचे भासवित त्यात दुसरे एक द्रव्य व हळदही टाकली. कुकर गॅसवर ठेवण्यास सांगत अध्र्या तासानंतर दागिने काढून घ्या, तोपर्यंत आम्ही बाहेर बसतो असे त्यांनी सांगितले. थोडय़ा वेळाने भामटे व सोने दोघेही गायब झाल्याचे महिलांना दिसून आले.

सरकारी नोकर पतपेढीच्या इमारतीचे भूमिपूजन
अमळनेर / वार्ताहर

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या पतपेढीत १७ कोटींच्या ठेवी असणे हीच सभासदांच्या विश्वासाची पावती असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. बी. एस. पाटील यांनी येथे पतपेढीच्या तीन मजली इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात केले. सभासदांच्या पाल्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी या ठेवींचा वापर करावा, त्यासाठी अल्पदरात शिक्षण देण्यासाठी डी. एड., बी. एड. महाविद्यालये सुरू करावीत, असा सल्लाही आ. डॉ. पाटील यांनी दिला. पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. प्रारंभी हनुमंतराव पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. यावेळी अध्यक्ष विलास नेरकर यांनी संस्थेच्या शाखांची माहिती देत दोन इमारती प्रस्तावित असल्याचे सांगितले. सुमारे ४५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून नऊ महिन्यात या इमारतीचे काम पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी धुळे जिल्हा सरकारी नोकरांच्या पतपेढीचे अध्यक्ष एम. एल. पाटील, माध्यमिक शिक्षण पतपेढीचे संचालक पी. डी. पाटील, माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, हरी बोरोले, अमळनेर शाखेचे संचालक वाल्मिक पाटील यांच्यासह विद्यमान संचालक उपस्थित होते.

मोटारसायकलची ट्रॉलीला धडक; एक ठार
शहादा / वार्ताहर

ट्रॅक्टरला धडक बसल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहादा-खेतिया रस्त्यावर घडली. शहाद्याला येणाऱ्या ट्रॅक्टरला मोटारसायकलस्वार विजय वसंत चौधरी (३४) हा येऊन धडकला. त्यात तो ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. ट्रॅक्टर चालक रामसिंग हंसराज राठोड (रा. कुसुमवाडा) यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान दुसऱ्या एका घटनेत तळोदा तालुक्यातील आमलाड येथे वजन काटय़ावर ट्रकचे वजन करीत असताना पायावरून ट्रकचे चाक गेल्याने देवा मोरसिंग पाडवी हा जखमी झाला, त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. ट्रकचालकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर येथे रस्ता कामास मंजुरी
वार्ताहर / धुळे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष आ. रोहिदास पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील भोकर येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी आठ लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. दरम्यान, रस्त्याच्या मंजुरीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. भोकर येथे गावांतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्यामुळे गावात रस्त्यांची कामे करण्यात यावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आ. पाटील यांनी भोकर येथे भेट देवून गावांतर्गत रस्त्यांची पाहणी केली व त्या अनुषंगाने आ. पाटील यांनी उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांतर्गत रस्त्या कामास मंजुरी मिळविली आहे. या रस्त्याच्या कामास त्वरीत सुरूवात करण्याच्या सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात दोन जखमी
वार्ताहर / वणी

दिंडोरी तालुक्यातील टाक्याचा पाडा शिवारात बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निवृत्ती चौधरी यांच्या शेतात गुरूवारी दुपारी अचानक पक्ष्यांचा किलबिलाट होऊ लागल्याने शेत मजुरांना संशय आला. पांडूरंग काशिनाथ चौधरी (४०) व हिरालाल नामदेव चौधरी (४२) हे दोघे पुढे गेल्यावर चार ते पाच फुटावरून अचानक बिबटय़ाने हिरालाल यांच्या अंगावर झेप घेतली. त्यानंतर त्याने पांडूरंग यांनाही जखमी केले. हा प्रकार पाहून मोतीराम चौधरी यांनी आरडाओरड करताच बिबटय़ा शिवारात पळून गेला व दिसेनासा झाला. जखमींना संपतराव कुंवर, मुरलीधर चौधरी, युवराज गवळी, राम चौधरी आदी ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टाक्याचा पाडा व परिसरात शोध घेतला. परंतु, बिबटय़ाचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, वाघाच्या भीतीने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.