Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

विशेष

नजर पंधराव्या लोकसभेवर
चौदावी लोकसभा गुरुवारी पडद्याआड गेली आणि आता साऱ्या देशाला वेध लागले आहेत ते पंधराव्या लोकसभा निवडणुकांचे. आर्थिक महाशक्ती होण्याच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या भारतात येत्या मे महिन्यात काय घडणार याची उत्कंठा साऱ्या जगालाही लागली असेल. भारताच्या इतिहासातील सर्वात कमकुवत व दुबळे सरकार, असे वर्णन करून लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखालील भाजपने सतत हिणवलेल्या मनमोहन सिंग सरकारने बघता बघता पाच वर्षे पूर्ण केली. मनमोहन सिंग सरकारविषयी अडवाणींचे वा विरोधकांचे मत काहीही असले तरी आघाडी सरकारचा प्रयोग अधिक विश्वासार्हतेने यशस्वी होऊ शकतो, हे काँग्रेसने दाखवून दिले.

मुंबईकरांची ‘सुटका’ होणार तरी केव्हा ?
‘स्लमडॉग मिलिऑनर’ द्वारा बकाल मुंबईचे चित्रण हेतुपुरस्सर जगापुढे आणले गेल्याची टीका काहींनी केली. या आरोपात तथ्य असण्याचा प्रश्नच नाही. याचे कारण चित्रपटाच्या पटकथेच्या गरजेनुसार कोणताही कॅमेरा दृश्ये टिपत असतो आणि जे आहे ते वास्तव कॅमेरा दाखवतो. बकाल शब्दही कमी पडावा अशा धारावीच्या काही भागांतील किळसवाणी वाटू शकतील अशी दृश्ये या ऑस्कर विजेत्या चित्रपटात आहेत. पण धारावी वगळता मुंबईचा अन्य भाग काय लंडन, रोम वा पॅरिसप्रमाणे चकाचक आहे ? या सर्व भागांतही तीच घाण, तीच दरुगधी आणि तोच कमालीचा बकालपणा आहे हे कटू सत्य हे टीकाकार अमान्य करु शकतील काय ? परवा एक सहकारी मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्थानकावर परदेशी व्यक्तीबरोबर तिला ‘राजधानी एक्स्प्रेस’मध्ये बसवण्यासाठी गेला होता. गाडी सुटण्यासाठी वेळ होता म्हणून फलाटावरच ते गप्पा मारत उभे राहिले.

शिखर संस्थेची स्थापना
केंद्र सरकारने फिल्म पॉलिसी १९५२ मध्येच कार्यान्वित करायला आरंभ करून, पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सव प्रथम मुंबईत व नंतर कोलकाता येथे भरविल्यावर चित्रपट संस्कृतीचे वातावरण देशात उभे राहायला आरंभ झाला. महोत्सवापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधीच प्रेक्षकांना मिळत नव्हती; याचे कारण ब्रिटिश सरकारने १९१८ सालीच हॉलीवूड व ब्रिटिश सिनेमा वगळता अन्य कोणत्याही देशातील चित्रपट भारतात आयात करायला बंदी घातलेली होती. त्यामुळे हॉलीवूडच्या मेट्रो, फॉक्स, वॉर्नर, पॅरामाऊण्ट व कोलंबिया या पाच बडय़ा स्टुडिओंनी भारतात आपली कार्यालये थाटून भारतात हॉलीवूड सिनेमा धडाक्याने प्रदर्शित करायला सुरुवात केली. हिंदी सिनेमा हॉलीवूडच्या सिनेमाची नक्कल करतो याचे हे प्रमुख कारण आहे. ब्रिटनची रँक व फ्रान्सची पॅथे कंपनी या हॉलीवूडशी स्पर्धा करणे शक्य नसल्याने या दोन्ही कंपन्यांनी भारतातून गाशा गुंडाळला.
भारतातील या विशिष्ट परिस्थितीमुळे जागतिक सिनेमाशी १९१८ मध्ये जो संपर्क तुटला तो १९५२ च्या महोत्सवाने अंशत: प्रस्थापित झाला. त्यामुळे जागरूक सिनेरसिकांना हॉलीवूड बाहेरचे चित्रपट पाहण्याचे एकमेव स्थान म्हणजे फिल्म सोसायटी याची जाणीव होऊ लागली. त्यावेळी अवघ्या सहा फिल्म सोसायटय़ा देशात होत्या. यामुळे केंद्र सरकारचे धोरण राबविण्यासाठी फिल्म सोसायटीतील कार्यकर्त्यांना शिखर संस्था स्थापन करायची निकड भासू लागली. ही परिस्थिती ओळखली सत्यजित राय व चिदानंद दासगुप्ता यांनी. स्वत: सत्यजित चित्रपटनिर्मितीत गुंतलेले असल्याने; चिदानंद दासगुप्ता यांनी फिल्म सोसायटय़ांची शिखर संस्था स्थापनेत पुढाकार घेतला. अमेरिकन कल्चरल सेंटरतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘स्पॅन’ त्रमासिकात ते संपादक होते. त्यामुळे त्यांचा मुक्काम दिल्लीतच होता. विजया मुळ्ये, एम. व्ही. कृष्णस्वामी, जगमोहन इ. दिल्लीतील सिनेरसिकांसमवेत चिदानंद दासगुप्तांनी देशातील सर्व फिल्म सोसायटय़ांची शिखर संस्था स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. साहित्य अकादमीचे तेव्हाचे सेक्रेटरी कृष्ण कृपलानी यांच्या घरी याचा विचार करण्यासाठी ४/५ लोकांची बैठक भरली. बैठकीत शिखर संस्थेचे नाव ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ असे निश्चित करण्यात आले.
उद्दिष्टांमध्ये मुख्य कलम असे आहे, की ‘‘चित्रपट हा ‘कला’ प्रकार आहे आणि सामाजिक मूल्य परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे याचा प्रसार करणे.’’ ‘सामाजिक मूल्य परिवर्तन’ या शब्दांचा व्यापक अर्थ लक्षात घेतला पाहिजे. पंडित नेहरूंना सरंजामशाही मूल्य व्यवस्थेवर निष्ठा ठेवणाऱ्या समाजात परिवर्तन होऊन तो विज्ञाननिष्ठ व आधुनिक विचारांचा बनायला पाहिजे होता. तरच भारताची सर्वागीण प्रगती होऊ शकेल. हे मानसिक मूल्य परिवर्तन ‘कला’च करू शकतील, असा पंडितजींचा विश्वास होता. ‘सिनेमा’ हे विज्ञानाचे अपत्य! विज्ञान विकसित झाले नसते तर सिनेमा अवतरूच शकला नसता. सिनेमा आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा असा हा सरळ संबंध असल्याने विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीला सिनेमा मोठय़ा प्रमाणात सहाय्यभूत ठरू शकतो. या अर्थाने सिनेमा हे सामाजिकदृष्टय़ा सशक्त माध्यम आहे. यासाठी ‘कला’त्मक चित्रपट निर्माण व्हावेत, त्यांचा आस्वाद घेणारा चित्रपट रसिक निर्माण व्हावा यासाठी फिल्म सोसायटी चळवळ प्रारंभापासूनच जागरूक होती. दिल्लीतील बैठकीनंतर १३ डिसेंबर १९५९ ला कलकत्ता येथे रीतसर ‘फेडरेशन’ ही शिखर संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. पहिले अध्यक्ष सत्यजित राय आणि चिदानन्द दासगुप्ता व विजया मुळ्ये संयुक्त सचिव. फेडरेशनचे सदस्यत्व फिल्म सोसायटी या संस्थेला मिळते. व्यक्तीला नाही. या अखिल भारतीय स्तरावरील शिखर संस्थेच्या दिल्लीच्या बैठकीत फेडरेशनचा मेमोरंडम तयार होऊन त्यावर सहा सोसायटय़ांच्या प्रतिनिधींच्या सह्य़ा झाल्या. सारा कारभार कोलकात्याहून चालायचा. फेडरेशनच्या स्थापनेत कोलकाता फिल्म सोसायटीचा विशेष पुढाकार होता. त्यामुळे फेडरेशनचे पहिले कार्यालय कोलकाता फिल्म सोसायटीतच सुरू झाले.
सुधीर नांदगावकर
फेडरेशनचे केंद्रीय सचिव

cinesudhir@gmail.com