Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

एक पणती जपून ठेवा..
प्रवीणसिंह परदेशी

झोपडपट्टीतील आयुष्य कसे असते, तेथील माणसं कशी जगतात हे अनेकदा मी पाहिले आहे, पण

 

लांबून. माझी फार इच्छा होती की एकदा आपण झोपडीतील जगणं अनुभवायचं..
म्हणूनच कालची रात्र मी येरवडय़ाच्या लक्ष्मीनगर भागात काढायचं ठरवलं आणि रात्री साडेआठच्या सुमारास मी येरवडय़ाला पोहोचलो. येरवडय़ाला लक्ष्मीनगर, कामराजनगर, गांधीनगर अशा अनेक नावांनी असलेल्या झोपडपट्टय़ांचीही स्वत:ची काही वैशिष्टय़ं आहेत. इतर झोपडपट्टय़ांपेक्षा गांधीनगरची परिस्थिती थोडी चांगली आहे कारण या झोपडपट्टीमध्ये काही वर्षांपूर्वीच वाल्मिकी आंबेडकर योजना राबविण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी सोडलेले रस्ते, एखाद्या सोसायटीत शोभणारी दोन-तीन मजल्यांची पक्की बांधकामे, पाणी-गटारांची व्यवस्था. त्यामुळे गांधीनगरचे झोपडपट्टी हे संबोधन रद्द करावे लागणार आहे. मी पहिल्यांदा गांधीनगरला पोहोचलो. तेथील नगरसेवक बापूराव कर्णे गुरूजी यांचा या कामात मोठा वाटा आहे. ज्यांची घरं लहान आहेत, त्यांच्या घरातील मुलांना अभ्यास करता यावा, याकरिता तेथे अभ्यासिका उभारण्यात आली आहे. त्या अभ्यासिकेतील मुलांना मी भेटलो. त्यात मुलींचे प्रमाण अधिक असल्याचं मला जाणवलं. बारावीची परीक्षा चालू असल्यानं मुलांचा अभ्यास जोरात चालल्याचं दिसलं. ‘‘आम्हाला मेरिटमध्ये यायचयं,’’ माझ्या प्रश्नाला मला अपेक्षित असंच उत्तर आलं.
तिथून मी निघालो आणि ‘घरटं’ या प्रकल्पाकडं आलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजत आले होते. रस्त्यावर भीक मागणाऱ्या तसंच निराधार मुलांना आसरा देणारा हा प्रकल्प आहे. तिथं तीन वर्षांपासूनची नऊ वर्षांपर्यंतची मुलं होती. या मुलांना जगण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी सोडून दिलेले असल्यानं त्यांना पालकांची आठवण येत असल्याचं दिसलं नाही. मी आल्याचं पाहून मुलांनी नमस्कार केला. काही मुलांनी गाण सादर केलं, ‘‘अंधार फार झाला, एक पणती जपून ठेवा..’’. अनेकदा मुलं पाठ केलेली गाणी म्हणतात, त्याचा अर्थ त्यांना माहिती नसतो. हे गाणंही या मुलांनी तसंच पाठ केलं असावं, असं मला वाटलं. त्यामुळं मी त्यांना गाण्याचा अर्थ विचारला. आश्चर्य असं की त्यांनी अचूक अर्थ सांगितला, ‘आम्हाला प्रकाशाकडं जायचं आहे, आमच्या आयुष्यात प्रकाश फुलवायचा आहे,.’ मला या मुलांच कौतुक वाटलं.
या प्रेमाची ऊब असलेल्या ‘घरटय़ा’तील मुलांचं कौतुक मनात ठेऊनच मी गांधीनगर सोडलं आणि लक्ष्मीनगरकडं निघालो. लक्ष्मीनगर ही झोपडपट्टी अगदी अरूंद रस्त्यांची, एकमेकांना खेटून असलेल्या घरांची आहे. तिथं एक-एका खोलीची अनेक घरं आहेत. मी तिथं पोहोचल्याचं तेथील नगरसेवक हनिफ शेख यांना कळलं. ते पुण्यात गेले होते. ते तातडीनं तिथं आले. त्यांनी तिथल्या महिलांना बोलावलं. लक्ष्मीनगरमधल्या काही घरांसाठी वाल्मिकी आंबेडकर योजना राबविण्यात आली आहे तर काही घरं त्या योजनेत नाहीत. ही योजना म्हणजे झोपडवासीयांना आहे त्याच जागी पक्कं घर बांधण्यासाठी अनुदान देण्याची योजना आहे. त्यासाठी त्या झोपडवासीयांना दहा टक्के रक्कम उभी करावी लागणार असते. ‘‘आम्हाला पैसा उभा करणं अवघड आहे, रोजीरोटीचेच पैसे मिळविताना कष्ट करावे लागतात.’’ काही महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. तुम्ही कामाला कुठं जाता, मी विचारलं तर एकानं उत्तर दिलं, ‘‘कल्याणीनगरला.’’ मी प्रतिप्रश्न केला, ‘‘मग बसनं जाता का,’’ या प्रश्नावर आलेल्या उत्तरानं मी अंतर्मुख झालो. उत्तर आलं, ‘‘आम्ही बसचं तिकीट विकत घेऊ शकत नाही. त्यामुळं चालतच जातो कामाला.’’ मी विचार केला, आपण पीएमपीएमएलच्या ऑफिसमध्ये बसून तिकीटदर वाढवायचे, कमी करायचे असा विचार करतो, पण प्रत्यक्षात लोकांना काय सोसावं लागतं ते इथं कळतं.
लक्ष्मीनगरमध्ये फिरत, लोकांना मी भेटत होतो तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. तेथल्या काही तरूणांची गाठ पडली. त्यांच्याबरोबर बसलो. त्यांच्याशी बोलत असतानाच मी सोबत नेलेला लॅपटॉप उघडला आणि माझी काही कामं करू लागलो. जीनिव्हाला असलेल्या माझ्या कुटुंबीयांची मी इंटरनेटद्वारे व्हिडिओफोन केला. काही मुलं हा प्रकार पहिल्यांदाच पाहत होती. एकाने त्याच्या परदेशात असलेल्या मित्राला फोन करायची इच्छा व्यक्त केली. ती मी लागलीच पुरी केली. रात्रीचे दोन वाजून गेले आणि माझे डोळे मिटू लागले. आसिया पठाण या महिलेच्या जेमतेम पन्नास चौरस फुटाच्या घरात मी पोहोचलो होतो. पठाण शेजारी असलेल्या महिलांच्या घरी गेल्या आणि मी व हनिफ यांनी त्यांच्या घरात पाय पसरले. सकाळी सहाला जाग आली तेव्हा दोन मिनिटे मला मी कुठं आहे, तेच समजेना, पण नंतर मी उठलो. त्यांच्या घरात एकच छोटी मोरी आणि घराचं दार उघडलं की मोरी बंद होत होती. एकाच दाराचा असा टु-ईन-वन उपयोग मी प्रथमच पाहत होतो. घराला स्वच्छतागृह नव्हते म्हणून मी बाजूच्या घरात जाऊन आन्हिकं उरकली आणि पुन्हा त्या घरात आलो. त्या मोरीत थंड पाण्यानं आंघोळ करून पुन्हा लोकांमध्ये मिसळलो..थोडय़ा वेळानं फोन सुरू झाले, अकराला महापालिकेत अंदाजपत्रक सादर होणार होतं, त्यामुळं सगळ्यांचा निरोप घेत मी माझ्या गाडीत बसलो अन् गाडी महापालिकेची वाट चालू लागली.
(शब्दांकन- सुनील माळी)