Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

झोपडपट्टीवासीयांना घरे, विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, कोथरूडला शिवसृष्टी
महापालिकेचे अंदाजपत्रक तीन हजार कोटींचे
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

झोपडपट्टीवासियांना सदनिका देणारी जिजामाता घरकुल योजना, कोथरूड येथे शिवसृष्टी, दहावीपर्यंतच्या

 

विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, महिला भवनाची उभारणी, कार्टुन म्युझिमय, श्वान वन, उड्डाण पूल, भुयारी मार्ग अशा अनेकविध योजनांचा समावेश असलेले तीन हजार २७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सादर केले.
‘पुणे पॅटर्न’च्या वादात देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्यापर्यंतचे प्रयत्न झाल्यानंतरही अखेर ‘स्थायी समिती अध्यक्ष’ या नात्याने देशपांडे यांनीच आज अंजादपत्रक सादर केले, शिवाय ‘भगवे बजेट’ सादर करून त्यांनी शिवसेनेचा वरचष्माही दाखवून दिला. अंदाजपत्रकाचा रंग भगवा असून ‘राजमाता जिजाऊ घरकुल योजने’ची माहिती देणारी स्वतंत्र पुस्तिकाही संपूर्ण भगव्या रंगातीलच आहे. याशिवाय कोथरूड येथे शिवसृष्टी, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानासाठी ‘कार्टुन म्युझियम,’ अत्याचारग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘महिला भवन’ अशा काही योजनाही ‘भगव्या बजेट’ला पुरेशा सुसंगत आहेत.
महापालिका आयुक्तांनी सन २००९-१० साठी २,६८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यात स्थायी समितीने ३४७ कोटींची वाढ करून अंदाजपत्रक ३,०२७ कोटींवर नेले आहे. जकातीचे उत्पन्न आयुक्तांनी ७५० कोटी रुपये धरले होते, ते समितीने ८५० कोटी केले आहे, तसेच सर्वसाधारण कराचे उत्पन्नही ४७ कोटींनी वाढवले आहे. या शिवाय बँकांकडून २५० कोटींचे कर्ज आयुक्तांनी प्रस्तावित केले होते, ते स्थायी समितीने ३६० कोटी केले आहे. भांडवली व विकास कामांसाठी आयुक्तांनी १,५६८ कोटी रुपये प्रस्तावित केले होते. स्थायी समितीने हा आकडा १,९२९ कोटींपर्यंत नेला आहे.
जिजाऊ घरकुल योजना
सर्वसमावेशक आणि शहराच्या विकासाला गती देणारे असे हे अंदाजपत्रक असल्याचे देशपांडे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. झोपडपट्टीवासियांना सदनिका मिळवून देण्यासाठी ‘राजमाता जिजाऊ घरकुल योजना’ जाहीर करण्यात आली असून शहराच्या झोपडपट्टय़ांचा संपूर्ण कायापालट करेल, अशी ही योजना असल्याचे देशपांडे म्हणाले. या योजनेत झोपडीधारकाला २७० चौरसफुटांचे घर एक ते दीड लाख रुपयांत देण्याची योजना आहे. या बांधकामाच्या मोबदल्यात संबंधित विकसकाला महापालिकेतर्फे टीडीआर दिला जाईल. योजनेचा लाभ १ जानेवारी १९९५ पूर्वीच्या झोपडीधारकांपासून ते २५ फेब्रुवारी २००९ पर्यंतच्या झोपडीधारकाला मिळणार आहे. ‘एसआरए’च्याच धर्तीवर ही योजना राबवली जाईल. योजनेच्या प्रारंभीची प्रशासकीय कार्यवाही गतीने व्हावी म्हणून आठ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन याप्रमाणे १६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शिवसृष्टी, महिला भवन
कोथरूड येथे जुन्या कचरा डेपोच्या जागेवर भव्य शिवसृष्टी उभारण्याची योजना असून त्यासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना या प्रकल्पाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. अत्याचारग्रस्त महिलांना कायमस्वरूपी व्यवसाय प्रशिक्षण व कायदा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ‘महिला भवन’ उभारण्याची योजना असून त्यासाठी एककोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी असे भवन उभारण्याची मागणी केली होती. याशिवाय महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सर्व १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचीही योजना आहे.
विद्यार्थ्यांना मोफत प्रवास
पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी होत असलेला त्रास कमी करण्याच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी ‘पीएमपी’चा प्रवास मोफत करण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी नऊ कोटींची तरतूद असून त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षितरीत्या होईल व हेच विद्यार्थी ‘पीएमपी’चे उद्याचे नियमित प्रवासी बनतील, असे प्रतिपादन देशपांडे यांनी केले.शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने भूमिगत वाहनतळ बांधण्यासाठी भरीव २२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातील काही भूमिगत वाहनतळ स्वयंचलित असतील. कचऱ्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन जपान सरकारच्या मदतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचाही कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कार्टुन म्युझियम, श्वान वन
प्रसिद्ध व्यंगचित्रकारांच्या गाजलेल्या व्यंगचित्रांचे कायमस्वरूपी संग्रहालय आणि उद्यान अशी एक नवी योजना अंदाजपत्रकात मांडण्यात आली आहे. त्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव देणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न कायद्याच्या कक्षेत राहून सोडविण्यासाठी अशा कुत्र्यांसाठी ‘श्वान वन’ तयार करण्याची योजना असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा, उड्डाण पूल
भामा आसखेड धरणातून पाणी आणून ते नगर रस्ता भागात पुरविण्याच्या योजनेसाठी भरीव ३५ कोटी रुपयांची, तर वारजे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय पौड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या रुंदीकरणासाठी दहा कोटी, नळ स्टॉप चौकातील उड्डाणपुलासाठी दहा कोटी, संचेती हॉस्पिटल चौकातील उड्डाणपुलासाठी दहा कोटी आणि शनिपार चौकातील पादचारी भुयारी मार्गासाठी तीन कोटींची तरतूद आहे.रस्त्यांवर महिला व पुरुषांसाठी सशुल्क स्वच्छतागृह बांधण्यासाठी ५० लाखांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
सभेत शिवसृष्टीसाठी घोषणा, फलक
अंदाजपत्रक सादर करताना कोथरूड येथील शिवसृष्टीसाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगण्यात आल्यानंतर काँग्रेसचे दीपक मानकर यांनी त्याला आक्षेप घेतला. ही तरतूद अतिशय अपुरी असून ती वाढवून द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यापाठोपाठ प्रेक्षक कक्षात बसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. ही तरतूद अपुरी असून ती वाढवून द्या, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर अध्यक्ष श्याम देशपांडे, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे, सभागृहनेते अनिल भोसले यांनी चर्चा करून तरतूद वाढविण्याचा निर्णय घेतला. शिवसृष्टीसाठी सात ऐवजी १५ कोटींची तरतूद केली जाईल, असे भोसले यांनी सांगितल्यानंतर सभेतील घोषणा थांबल्या.
अंदाजपत्रक विशेष..
अंदाजपत्रक व माहिती पुस्तिका भगव्या रंगात
खासदार प्रकाश जावडेकर यांचे छायाचित्र नाही
भामा आसखेड प्रकल्पासाठी ३५ कोटींची तरतूद
कार्टुन म्युझियमसाठी पाच, तर श्वान वनासाठी एक कोटी
वाहनतळांसाठी २२ आणि उड्डाण पुलांसाठी ३० कोटी
शनिपार चौकात भुयारी मार्ग