Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

साडेपाचशे पाने, हजारो योजना आणि अडीच लाख आकडे..
विनायक करमरकर, पुणे, २७ फेब्रुवारी

हजारो कामे व योजनांचे तपशील असलेल्या, फुलस्केप आकाराच्या साडेपाचशे पानांची आणि सुमारे

 

अडीच लाख आकडय़ांची छपाई बिनचूक पद्धतीने करण्याची कामगिरी महापालिका मुद्रणालयातील ८० कर्मचाऱ्यांनी यंदाही करून दाखवली आहे. या कर्मचाऱ्यांमधील संघभावना आणि त्यांनी रात्रंदिवस केलेले काम यामुळे महापालिका अंदाजपत्रकाची छपाई यंदा वेळेआधीच पूर्ण झाली.
महापालिका अंदाजपत्रक हा दरवर्षी मोठा चर्चेचा विषय ठरतो. मात्र ते तयार होतानाची प्रक्रियाही फार मोठी असते. यंदाचे अंदाजपत्रक प्रथमपासूनच वादग्रस्त ठरले होते. हे वाद संपून सर्वाचे एकमत झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया स्थायी समितीने खऱ्या अर्थाने सुरू केली. ही प्रक्रिया पूर्ण होऊन अंदाजपत्रकाचा अंतिमत: तयार झालेला मजकूर सोमवारी महापालिकेच्या घोले रस्त्यावरील ‘मामाराव दाते मुद्रणालया’त देण्यात आला. मजकूर मिळाल्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून छपाईचे काम मुद्रणालयात सुरू झाले आणि तीन दिवस अहोरात्र काम करून तेथील कर्मचाऱ्यांनी अंदाजपत्रकाच्या प्रतींची छपाई वेळेआधीच पूर्ण केली.
मजकूर तयार झाल्यानंतर त्याचे मुद्रित शोधन करणे, तयार झालेल्या पानांची ट्रेसिंग काढणे, त्यानंतर प्लेट तयार करणे, प्रत्यक्ष छपाई, छपाई झालेल्या फॉर्मचे फोल्डिंग करणे, फॉर्म जुळविणे, मुखपृष्ठ व आतील छायाचित्रांची रंगीत पाने मूळ छपाई झालेल्या पुस्तकात योग्य त्या त्या ठिकाणी समाविष्ट करणे, बाईंडिंग, स्टीचिंग आणि कटिंग असे कामांचे टप्पे पार पाडल्यानंतर अंदाजपत्रकाची ‘फायनल’ प्रत तयार होते, अशी माहिती मुद्रणालयाचे व्यवस्थापक जयंत पवार यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
मुद्रणालयातील हे काम साखळी पद्धतीचे असल्याने एका विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसरा विभाग ते काम पुढील प्रक्रियेसाठी हाती घेऊ शकतो. त्यामुळे अशा कामात ‘टीम वर्क’ला फार महत्त्व आहे. ही भावना ठेऊनच मुद्रणालयातील सर्व कर्मचारी गेले तीन-चार दिवस चोवीस तास काम करत होते. त्यामुळे अंदाजपत्रकाची छपाई आम्ही अतिशय सुबक पद्धतीने आणि वेळेपूर्वीच करू शकलो, असेही पवार यांनी सांगितले.
सन २००९-१० साठी तयार झालेल्या अंदाजपत्रकाची एक प्रत तब्बल दोन किलो वजनाची असून साडेपाचशे पानांचे, फुलस्केप आकाराचे हे पुस्तक टिकाऊ होण्यासाठीही विशेष प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. अंदाजपत्रक हा संपूर्ण आकडय़ांचा खेळ आहे. त्यामुळे आकडय़ांमध्ये कोणतीही चूक राहू नये, यासाठी विशेष लक्ष दिले जाते. एका अंदाजपत्रकात शेकडो योजना व हजारो कामांचा तपशील आहे आणि त्यासाठी किमान दोन ते अडीच लाख आकडे छापण्यात आले आहेत.
दाते मुद्रणालयाला मोठा इतिहास असून महापालिका, शिक्षण मंडळाबरोबरच सरकारी कार्यालये आणि सहकारी संस्थांसाठीची सर्व प्रकारची छपाई येथे होते. सुबक, दर्जेदार, बिनचूक आणि वेळेत छपाई हा या मुद्रणालयाचा लौकिक असून तो अनेक वर्षे टिकून आहे. या शिवाय चार रंगी छपाईचे एक स्वतंत्र मशीन आणि प्रीपिंट्रेड कॉम्प्युटराईज्ड स्टेशनरीसाठी एक मशीन घेण्याची मुद्रणालयाची योजना असल्याची माहितीही पवार यांनी दिली. हे प्रस्ताव मान्य झाल्यास सर्व प्रकारची कामे एकाच छताखाली होणारे हे एक अग्रगण्य मुद्रणालय ठरेल, असेही ते म्हणाले.