Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘दहा कलाकारांवर लघुपट काढणार’
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येत्या वर्षभरात राज्यातील दहा चालत्या बोलत्या कलाकारांच्या रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्दीचा वेध

 

घेणारे लघुपट नाटय़ परिषदेतर्फे तयार केले जातील व प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ. देशपांडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की नाटय़ परिषद ही अधिक लोकाभिमुख व्हावी ही प्रा. डॉ. देशपांडे यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे येत्या वर्षांअखेर पर्यंत राज्यातील दहा नामवंत कलाकारांच्या संघर्षमय जीवनावर आधारित लघुपट तयार केले जातील. त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल. रंगभूमीवर उत्कृष्ट कलाकार निर्माण करणाऱ्या प्रा. देशपांडे यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यावाह डॉ. वि. भा. देशपांडे म्हणाले, की रंगभूमीवरील आविष्काराच्या सिद्धांताचे नेमके उपयोजन आणि आदर्श सादरीकरण यांचा सुरेख मेळ घालणाऱ्या बहुरूपी किमयागाराला मराठी रंगभूमी कायमची मुकली आहे.
प्रा. डॉ. देशपांडे यांच्या भाची स्वाती रांजेकर म्हणाल्या, की आयुष्यभर रसिकांना खळखळून हसविणारा माझा मामा तमाम रसिकांना रडायला लावून कायमस्वरूपी निघून गेला. हे सांगताना त्यांना भावना अनावर झाल्या अन् त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. त्यांच्या भावनांनी उपस्थितांचा कंठ दाटून आला.जयंत दिवाण यांनी देशपांडे यांच्या सहवासातील महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. रंगभूमीचा ध्यास असलेला कलाकार आपल्यातून गेल्याने एक ध्यासपर्व संपले आहे, असे उद्गार त्यांनी काढले.प्रभाकर निलेगावकर म्हणाले, की सरांकडून नाटय़शास्त्राचे धडे घेत असताना रंगभूमीवर प्रत्यक्ष दृक-श्राव्य आविष्कार कसा सादर करावा यातील बारकावे त्यांनी शिकविले.बंडा जोशी म्हणाले, की तंत्रज्ञानाचा वापर न करता नाटय़प्रयोग रंगविण्याचा वस्तुपाठ देशपांडे यांनी घालून दिला. मराठवाडय़ातील वऱ्हाडी बोलीला मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेयही त्यांनाच आहे. रंगभूमीच्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी ते चालते बोलते विद्यापीठ होते.
बाळकृष्ण दामले म्हणाले, की असामान्य ऊर्जा असलेला अप्रतिम सादरीकरणाने रसिकांवर जादूची भुरळ घालणारा असामान्य कलाकार आपल्यातून निघून गेल्याने मराठी रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. यशप्राप्तीची खात्री आणि जाणीव असल्याने येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असा दस्तऐवज त्यांनी तयार केला आहे. यावरून त्यांची दूरदृष्टी दिसते.विजय कोटसकर, सुनील महाजन यांनीही श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.