Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘डोळ्यांना उन्हाचा त्रास रोखण्यासाठी पाण्याचा पुरेसा वापर हवा’
हडपसर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे डोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत, असे पुणे अंधजन मंडळ संचलित एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ. निखिल ऋषिकेश आणि डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मार्च-एप्रिल महिना कडक उन्हाळ्याचा हंगाम असून, अत्यंत महत्त्वाचा म्हणजे हा परीक्षांचा कालावधी आहे. डोळ्य़ांना त्रास होऊन शालेय नुकसान होऊ नये यासाठी उन्हाळ्य़ामध्ये डोळ्यांची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. डोळे अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतात. प्रत्येक ऋतूमध्ये बदलाप्रमाणे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्य़ामध्ये रस्त्यावरील धूळ, धूर, तसेच उन्हामुळे डोळ्यांना त्रास होतो. डोळे चुरचुरणे, लाल होणे, खाज सुटणे, चोळावेसे वाटणे, पाणी येणे व कधीकधी दुखणे, टोचणे आदी त्रास डोळ्य़ांना होतात. या सगळ्य़ा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हे डोळ्य़ांच्या मोठय़ा आजाराला कारणीभूत ठरते. त्यामुळे डोळ्य़ांचे विकार व त्रास वाढत असतात. त्यासाठी डोळ्य़ांची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उन्हाचे तापमान वाढल्यामुळे डोळ्य़ांतील अश्रूंची (टिअर फिल्म) वाफ लवकर होते व डोळे कोरडे पडतात, लाल होतात व चुरचुरतात. त्यासाठी दुचाकीस्वारांनी चष्मा व हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा तरी स्वच्छ करण्याची गरज आहे. डोळे कोरडे पडणे हा एक मोठा डोळ्य़ांचा आजार असून, उन्हाळ्य़ामध्ये त्याचा त्रास जास्त होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. उन्हामुळे त्रास झाला तर त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
डॉक्टरांनी सांगितलेल्याच औषधांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. उन्हाळ्य़ात जीवजंतूंमुळे होणारे विकार वाढण्याची शक्यता असते. डोळे येण्याचेही प्रमाण या वेळी जास्त असते.
अनेक प्रकारचे जंतू उन्हाळ्य़ात वाढतात व इन्फेक्शन वाढवतात. आजाराच्या सुरुवातीलाच त्यावर उपचार होणे अत्यंत गरजेचे असते, अन्यथा डोळ्य़ांच्या बुब्बुळावर परिणाम होऊन दृष्टिदोष निर्माण होणे किंवा दृष्टी जाणे असे धोके संभवत असल्याचे डॉ. ऋषिकेश यांनी म्हटले आहे. डोळे आल्याचे लक्षात येताच डोळ्य़ांच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. डोळे आलेल्या व्यक्तीचे टॉवेल इतरांनी वापरू नयेत. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे तो त्रास इतरांनाही होण्याचा मोठा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डोळे लाल होणे, डोळ्य़ांतून चिवट पदार्थ किंवा पू येणे ही त्याची लक्षणे आहेत. त्यासाठी स्वच्छ पाण्याने डोळे धुणे, काळा चष्मा वापरणे, जंतुनाशक औषधे ४ ते ८ वेळा डोळ्य़ांत घालणे आदी उपचार करणे गरजेचे आहे.
डोळे दुखत वा चुरचरत आहेत म्हणून मेडिकलमधून कुठलेही औषध घेऊन वापरू नये. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.