Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

एक पणती जपून ठेवा..
प्रवीणसिंह परदेशी

झोपडपट्टीतील आयुष्य कसे असते, तेथील माणसं कशी जगतात हे अनेकदा मी पाहिले आहे, पण लांबून. माझी फार इच्छा होती की एकदा आपण झोपडीतील जगणं अनुभवायचं.. म्हणूनच कालची रात्र मी येरवडय़ाच्या लक्ष्मीनगर भागात काढायचं ठरवलं आणि रात्री साडेआठच्या सुमारास मी येरवडय़ाला पोहोचलो. येरवडय़ाला लक्ष्मीनगर, कामराजनगर, गांधीनगर अशा अनेक नावांनी असलेल्या झोपडपट्टय़ांचीही स्वत:ची काही वैशिष्टय़ं आहेत. इतर झोपडपट्टय़ांपेक्षा गांधीनगरची परिस्थिती थोडी चांगली आहे कारण या झोपडपट्टीमध्ये काही वर्षांपूर्वीच वाल्मिकी आंबेडकर योजना राबविण्यात आलेली आहे. बऱ्यापैकी सोडलेले रस्ते, एखाद्या सोसायटीत शोभणारी दोन-तीन मजल्यांची पक्की बांधकामे, पाणी-गटारांची व्यवस्था. त्यामुळे गांधीनगरचे झोपडपट्टी हे संबोधन रद्द करावे लागणार आहे. मी पहिल्यांदा गांधीनगरला पोहोचलो. तेथील नगरसेवक बापूराव कर्णे गुरूजी यांचा या कामात मोठा वाटा आहे. ज्यांची घरं लहान आहेत, त्यांच्या घरातील मुलांना अभ्यास करता यावा, याकरिता तेथे अभ्यासिका उभारण्यात आली आहे. त्या अभ्यासिकेतील मुलांना मी भेटलो. त्यात मुलींचे प्रमाण अधिक असल्याचं मला जाणवलं.

झोपडपट्टीवासीयांना घरे, विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, कोथरूडला शिवसृष्टी
महापालिकेचे अंदाजपत्रक तीन हजार कोटींचे
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी
झोपडपट्टीवासियांना सदनिका देणारी जिजामाता घरकुल योजना, कोथरूड येथे शिवसृष्टी, दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, महिला भवनाची उभारणी, कार्टुन म्युझिमय, श्वान वन, उड्डाण पूल, भुयारी मार्ग अशा अनेकविध योजनांचा समावेश असलेले तीन हजार २७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सादर केले.
‘पुणे पॅटर्न’च्या वादात देशपांडे यांचे अधिकार काढून घेण्यापर्यंतचे प्रयत्न झाल्यानंतरही अखेर ‘स्थायी समिती अध्यक्ष’ या नात्याने देशपांडे यांनीच आज अंजादपत्रक सादर केले, शिवाय ‘भगवे बजेट’ सादर करून त्यांनी शिवसेनेचा वरचष्माही दाखवून दिला. अंदाजपत्रकाचा रंग भगवा असून ‘राजमाता जिजाऊ घरकुल योजने’ची माहिती देणारी स्वतंत्र पुस्तिकाही संपूर्ण भगव्या रंगातीलच आहे.

साडेपाचशे पाने, हजारो योजना आणि अडीच लाख आकडे..
विनायक करमरकर, पुणे, २७ फेब्रुवारी

हजारो कामे व योजनांचे तपशील असलेल्या, फुलस्केप आकाराच्या साडेपाचशे पानांची आणि सुमारे अडीच लाख आकडय़ांची छपाई बिनचूक पद्धतीने करण्याची कामगिरी महापालिका मुद्रणालयातील ८० कर्मचाऱ्यांनी यंदाही करून दाखवली आहे. या कर्मचाऱ्यांमधील संघभावना आणि त्यांनी रात्रंदिवस केलेले काम यामुळे महापालिका अंदाजपत्रकाची छपाई यंदा वेळेआधीच पूर्ण झाली. महापालिका अंदाजपत्रक हा दरवर्षी मोठा चर्चेचा विषय ठरतो. मात्र ते तयार होतानाची प्रक्रियाही फार मोठी असते. यंदाचे अंदाजपत्रक प्रथमपासूनच वादग्रस्त ठरले होते. हे वाद संपून सर्वाचे एकमत झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया स्थायी समितीने खऱ्या अर्थाने सुरू केली.

‘दहा कलाकारांवर लघुपट काढणार’
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

येत्या वर्षभरात राज्यातील दहा चालत्या बोलत्या कलाकारांच्या रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्दीचा वेध घेणारे लघुपट नाटय़ परिषदेतर्फे तयार केले जातील व प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ. देशपांडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत परिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की नाटय़ परिषद ही अधिक लोकाभिमुख व्हावी ही प्रा. डॉ. देशपांडे यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे येत्या वर्षांअखेर पर्यंत राज्यातील दहा नामवंत कलाकारांच्या संघर्षमय जीवनावर आधारित लघुपट तयार केले जातील. त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल. रंगभूमीवर उत्कृष्ट कलाकार निर्माण करणाऱ्या प्रा. देशपांडे यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

‘डोळ्यांना उन्हाचा त्रास रोखण्यासाठी पाण्याचा पुरेसा वापर हवा’
हडपसर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर
धूळ, धूर, मातीचे बारीक कण आणि वाढत्या उन्हामुळे डोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत, असे पुणे अंधजन मंडळ संचलित एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे डॉ. निखिल ऋषिकेश आणि डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

विविध संस्था, संघटनांकडून सावरकरांना आदरांजली
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ४३ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरात आज विविध संस्था, संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीने स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पुणे महानगरपालिका वाचनालयातर्फे कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल अगावणे, डॉ. मिलिंद भोई, पियूष शहा, प्रा. शशिकांत सोनवणे, संभाजी शिंदे, सागर अडसूळ, रोहिणी अगावणे, ऊर्मिला दुधाळ आदी उपस्थित होते.

राज्याबाहेरही फळमहोत्सवाचे आयोजन - हर्षवर्धन पाटील
पुणे, २७ फेब्रुवारी/ प्रतिनिधी

‘‘कोल्हापूर, सांगली, नांदेड व औरंगाबादसह पुढील काळामध्ये राज्याच्या बाहेरही फळमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली. राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक पी. जे. अडसुळे, पणन मंडळाचे संचालक एस. पी. सांगळे, सरव्यवस्थापक सुनील पवार त्या वेळी उपस्थित होते.

टेम्पो पंचायत संघटनेच्या अध्यक्षपदी बाबा आढाव
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पुणे जिल्हा टेम्पो पंचायत संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. बाबा आढाव व सरचिटणिसपदी संपत सुकाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून उपाध्यक्षपदी शंकर कटके, राजू घोडके, बालाजी जाधव, भरत गेडेवाड, संपत नवले यांची निवड झाली आहे. सहसचिवपदी अविनाश शिवतरे, भाऊसाहेब ससाणे, शहाजी थोरात, गणेश जाधव यांची निवड झाली आहे. तसेच संघटनेच्या विविध अधिकारपदांवर काका पायगुडे, राजेश दातरंगे, दिलीप बांबुरकर, संतोष गायकवाड, चंद्रकांत जाधव, अ‍ॅन्थोनी घोरपडे आदींची निवड झाली आहे ही माहिती पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

रेल्वेतील प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीस शिक्षा
पुणे, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

रेल्वेतील महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण हिसकावून चोरून नेणाऱ्या चौघांना नऊ महिने सक्तमजुरीची कैदेची शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंडही रेल्वे न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. बी. पानथवणे यांनी ठोठावला आहे. हरीष विष्णू पालंडे ऊर्फ बंटी (वय २१, रा. गायरान वस्ती, मुंढवा), संदीप विष्णू पालंडे (वय २३, रा. शिंदे वस्ती, मुंढवा), निलेश प्रदीप उबाळे (वय २३) आणि राजेश गणेशमल ओसवाल (वय ४३, रा. सोलापूर बाजार) अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या टोळीस अटक केली होती. पोलीस निरीक्षक आत्मचरण शिंदे, पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ मारकड, पोलीस हवालदाल लुईस मकासरे, पोलीस शिपाई संतोष चांदणे, पोलीस शिपाई मिलिंद आळंदे आदींनी ही कामगिरी केली होती. या टोळीकडून साखळीचोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले होते. ओसवाल या चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाला पोलिसांनी अटक केली होती.

न्या. कापडणीस यांची नागपूरला बदली
पुणे, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी
जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कापडणीस यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रशिक्षण अधिकारी संस्थेच्या सहसंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

वीजबिल भरणा केंद्र आजही सुरु राहणार
पुणे, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण कंपनीची वीजबिल भरणा केंद्रे येत्या शनिवारी (२८ फेब्रुवारी) सुट्टीच्या दिवशीही त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत असे महावितरण कंपनीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मनसेच्या दोन शाखा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजीनगर विभागात चतु:श्रृंगी येथील दोन शाखांचे उद्घाटन दीपक पायगुडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश ढोरे, राजू पवार, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, सुलाम हुसेन खान, किरण साळुंखे, नरेंद्र तांबोळी आदी उपस्थित होते.

स्नेहसंमेलन
एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम आणि लाईटिंग मॅनेजमेंट या संस्थेचे स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. अभय वळसंगकर, व्ही. के. महिंद्रा, कुंदना लाल, आशिष हस्तक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. विश्वनाथ कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

उर्दू पुस्तकाचे दुकान
उर्दू भाषा दिनानिमित्त उर्दू माध्यमाची पुस्तके, शैक्षणिक साहित्य आदींनी उपयुक्त असलेल्या आदिल बुक सेल या दुकानाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे शिक्षण प्रमुख सुधाकर तांबे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रशिद हसन खान, आबेदा इनामदार, मुन्वर पिरभाय, भाईजान काझी, बंडू आंदेकर आदी उपस्थित होते.

महासंघाकडून स्वागत
मराठा आरक्षणाबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्वागत केले आहे. महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद वडगावकर व इतर सर्वानी पवार यांच्या भूमिकेचे स्वागत करून त्यांचे आभार मानले.

रौप्यमहोत्सवाचा समारोप
श्री महालक्ष्मी मंदिर रौप्यमहोत्सवाचा समारोप महाप्रसादाने झाला. १०८ सुवर्णकमळांनी महालक्ष्मीची पूजा करण्यात आली. घनश्याम आचार्य व युवराज स्वामी भुदेवाचार्य यांचा राजकुमार अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अमिता अग्रवाल, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, रमेश पटोडिया आदी उपस्थित होते. नारायण काबरा व श्याम भुतडा यांनी सूत्रसंचालन केले. प्रताप परदेशी यांनी आभार मानले. महाप्रसादासाठी धनराज राठी यांचे सहकार्य मिळाले.

‘रयत’चा मेळावा
रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागातर्फे नुकतेच विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब शिंदे, ज्ञानेश्वर काळोखे, हनुमंतराव वाखळे, अशोक जाधव, नानासाहेब शितोळे, अरुण बोत्रे आदी विभागीय सदस्य या वेळी उपस्थित होते.

सारंग मते दुसरा
सीप इंडिया प्रा.लि यांच्यातर्फे सीप अबॅकस तिसरी प्रादेशिक स्पर्धा बालेवाडी येथे नुकतीच झाली.या स्पर्धेकरिता पुणे, मुंबई, कोल्हापूर या जिल्ह्य़ातील पाच ते १२ या वयोगटातील २१०० विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत वैशाली नगरकर संचलित एषा अ‍ॅकॅडमीचा सारंग मते तिसऱ्या स्तरावरील स्पर्धेत दुसरा आला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे प्रमुख सुधाकर तांबे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकरिता अबॅकस स्पर्धेचा निश्चित उपयोग होईल, असे मत तांबे यांनी व्यक्त केला.