Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

मिरकरवाडा बंदरातील ६० हजार घनमीटर गाळ आजपासून उपासणार
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, २७ फेब्रुवारी

 

केरळमधून आणण्यात आलेल्या ‘सिंधुराज’ ड्रेझरच्या मदतीने येथील मिरकरवाडा बंदरातील सुमारे ६० हजार घनमीटर गाळ उपसण्याची मोहीम उद्यापासून (२८ फेब्रुवारी) सुरू होत आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर आहे, पण गेल्या सुमारे १० ते १५ वर्षांच्या काळात ते सतत गाळाने भरत गेल्यामुळे मोठय़ा मच्छिमार नौकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हा गाळ उपसण्यासाठी गेल्यावर्षी सुमारे साडेसात कोटी रुपयांची तरतूद केंद्र व राज्य शासनाने मिळून केली आणि त्यानुसार गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून गाळ उपसण्याचे काम सुरू झाले. बंदरातील एकूण सुमारे तीन लाख घनमीटर क्षेत्रावरील गाळापैकी दोन लाख ४० हजार घनमीटर गाळ पहिल्या टप्प्यामध्ये कटर ड्रेझरच्या मदतीने पूर्ण करण्यातोले आहे. त्यासाठी कोकण पॅकेजअंतर्गत चार कोटी ३० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात टीएसडी सिंधुराज या जपानी बनावटीच्या ड्रेझरच्या सहाय्याने उरलेला सुमारे ६० हजार घनमीटर गाळ उपसण्याची मोहीम उद्या सुरू होणार आहे. आज त्याबाबतच्या चाचण्या घेण्यात आल्याचे सांगून ड्रेझरचे कॅप्टन एम. व्ही. सुरेश म्हणाले की, दिवसाला सुमारे १५०० घनमीटर या प्रमाणात सुमारे ४० दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मिळून सुमारे दोन कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर मच्छिमार नौकांच्या वाहतुकीसाठी सध्या उपलब्ध असलेला ४० मीटर रुंदीचा मार्ग दुप्पट होणार आहे. केरळ स्टेट मेरिटाइम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक के. के. राजेंद्रन आणि मरिन इंजिनीअर के. सी. लॉरेन्स यांनी गेले दोन दिवस ‘सिंधुराज’ ड्रेझरच्या चाचण्यांचे निरीक्षण केले. गाळ उपसण्याचे काम नियोजनबरहुकूम पूर्ण झाले तर साधारणत: १५ एप्रिलपर्यंत नौकांच्या वाहतुकीसाठी प्रशस्त मार्ग खुला होईल. त्यानंतर यंदाच्या मच्छिमारी हंगामाचा जेमतेम दीड महिना शिल्लक राहणार आहे. दरवर्षी १० जूनच्या सुमारास पावसाळ्यामुळे मच्छिमारी पूर्णपणे बंद होते आणि नारळी पौर्णिमेनंतर नव्या हंगामाला सुरुवात होते. त्यामुळे पावसाळ्याचा या कामावर किती परिणाम होतो, हे त्याच वेळी समजू शकेल. दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील मच्छिमारांचा पाठिंबा मिळवण्यास या मोहिमेचा फायदा होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मिरकरवाडा बंदरातील गाळ उपसण्याच्या कामाचा राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.