Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

डॉल्फिनचे नृत्य पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ
अभिमन्यू लोंढे
सावंतवाडी, २७ फेब्रुवारी

 

निवती बंदरात डॉल्फिनचे डौलदार नृत्य पाहण्यास पर्यटकांची रीघ लागत आहे. या बंदर डॉल्फिनचे आगमन झाले असून ते पर्यटनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे बनले आहे. डॉल्फिन पर्यटनाकडे उच्चवर्गीय पर्यटक आकर्षित होत असतात. त्याचे दुर्लभ दर्शन सध्या घडत आहे. कुडाळ तालुक्यातील निवती बंदरात या हंगामात डॉल्फिन मोठय़ा संख्येने येत आहेत. नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या निवती बंदरात सुरमई, पापलेटसारखी मासळी सापडते. ही मासळी म्हणजे डॉल्फिनचे आवडते खाद्य होय. हे खाद्य खाण्यासाठी ते येतात. शिवाय हा हंगाम त्यांच्या प्रजननकाळाचा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ कि.मी. लांबीचा सुंदर, आकर्षक रुपेरी वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. या सागरकिनाऱ्यावरील नयनरम्य, सुंदर, स्वच्छ व मनमोहक निवतीचा किनारा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. डॉल्फिनच्या डौलदार नृत्याने देशी-विदेशी पर्यटक खास भेट देत आहेत. गोव्यापेक्षाही सिंधुदुर्गाचे निसर्गसौंदर्य, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक वास्तू, पुरातन मंदिरे, बॅक वॉटर्स, तंबू निवास, थंड हवेच्या ठिकाणाकडे विदेशी पर्यटकांचे पाय थिरकत आहेत. त्यात किनारपट्टी पर्यटकांना आकर्षित करणारे महत्त्वाचे साधन बनत आहे. निवती, भोगवे, कोचरा, म्हापण, तारकर्ली, वेळागर अशा विविध सागराच्या आकर्षक पॉइंटवर पर्यटकांची रीघ लागत आहे. मालवण तालुक्यातील स्कुबा डायव्हिंग आणि निवती समुद्र किनाऱ्यावरील बर्ड आयलँडची भटकंती यामुळे सागरी पर्यटनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉल्फिन पर्यटन हंगाम यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाला आहे. साधारणत: हा हंगाम एप्रिल, मेपर्यंत सुरू असते, अशी माहिती मच्छिमार देतात. सकाळी ८ ते ९ या कोवळ्या सूर्यप्रकाशात नियती किनाऱ्यावर डौलदार नृत्य करताना असंख्य डॉल्फिनचे दर्शन घडते. निवती किनाऱ्यावर डॉल्फिनचे डौलदार दर्शन घेण्यासाठी खास बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉल्फिनचे डौलदार नृत्य पाहण्यासाठी स्थानिकांपेक्षा देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा हा मानबिंदू ठरेल, अशी अपेक्षा आहे.