Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

देवरुखच्या गणेश वेदपाठशाळेला ‘कार्यगौरव’ पुरस्कार
देवरुख, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

वेद वाङ्मय आणि संस्कृतीच्या जतनासाठी आणि मूल्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काही तरुणांनी एकत्र ठेवून देवरुखात उभारलेल्या श्री गणेश वेदपाठशाळेला ‘कार्यगौरव’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २५ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्र या नामांकित संस्थेकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यभरातील नऊ संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोणतेही अर्ज आणि त्यासंबंधीची औपचारिकता न करता हा पुरस्कार संस्थेला मिळाला असल्याने ते सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरले असून, संस्थाचालकांत आणि हितचिंतकांत समाधान व्यक्त होत आहे.
या पुरस्काराने मनशक्ती केंद्राकडून कधीही अर्ज मागविले जात नाहीत. मनशक्ती संस्थेचे साधक वेगवेगळ्या पाहणीतून कामकाज जाणून या पुरस्कारासाठी संस्थेकडे शिफारस करीत असतात. त्यानंतर संस्थेकडून शिफारस झालेल्या संस्थेच्या कार्याची खातरजमा करून घेतली जाते व त्यानंतरच पुरस्काराचा निर्णय घेतला जातो. अशा प्रक्रियेत देवरुख वेदपाठशाळेची निवड झाल्याने शहरातील ‘वेद’प्रेमी तरुणांचा उत्साह वाढला आहे.
‘सकाळ’ समूहाचे संपादक यमाजी मानकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वेदपाठशाळेतर्फे शहरात ११ वर्षांंपासून वैदिक वाङ्मयाचे जतन व संवर्धन केले जात आहे. २५ विद्यार्थ्यांना विनामूल्य वैदिक ज्ञानाचे शिक्षण दिले जात आहे. पाठशाळेतील विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षणाबरोबर इंग्रजी, गणित, योग, सामान्यज्ञान व संगणकशास्त्र याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थी केवळ गुणार्थी न बनता ज्ञानार्थी बनला पाहिजे, हा दृष्टिकोन संस्थेने जोपसला आहे. समाजातील चालू घडामोडी व नवनवीन विषयांवरील चर्चांसाठी पाठशाळेने कात्रे चांदोरकर सभागृहाची सुविधा उपलब्ध केली आहे. पाठशाळेतील द्विभूज गणेश मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यज्ञवेदी, गो-शाळा यासह शेती-भाजीपाला निर्मितीतही श्रमसंस्काराच्या विचाराने वेदपाठशाळेने पुढाकार घेतला आहे.