Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

खोपोलीत उद्या राज्य अपंग कर्मचाऱ्यांचा मेळावा
खोपोली, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने रविवार (१ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता येथील प.पु. गगनगिरी महाराज मठाजवळ, संघटनेच्या कोकण विभागीय सदस्यांसाठी जाहीर मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यामध्ये के.के. आंधळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी- संवर्ग अधिकारी संघटना), गेंदीलाल साळुंखे (राज्य कोषाध्यक्ष), परमेश्वर बाबर (राज्य सचिव), विलासराव पिंपळे (राज्य उपाध्यक्ष), देवराम मुके (उपाध्यक्ष नगरपालिका कर्मचारी संघटना- कोकण विभाग), तसेच महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर घाडगे पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार अपंगांचा तीन टक्के अनुशेष सर्व शासकीय विभागात निश्चित करण्यात यावा व रिक्तपदी अपंगांची तत्परतेने नियुक्ती करण्यात यावी, अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, अपंगांच्या सोयीसाठी त्यांच्या बदल्या, ते राहात असलेल्या निवासस्थानाजवळ करण्यात याव्यात. शासकीय सेवेतील अपंग कर्मचारी व अधिकारी यांना आयकरातून मुक्त करण्यात यावे, अपंग कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल पाठविताना सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवण्यात यावा. केंद्र शासनाप्रमाणे अपंग कर्मचाऱ्यांनाही सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन भत्ते व अन्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदी प्रमुख मागण्यांसंदर्भात या जाहीर मेळाव्यात ऊहापोह करण्यात येणार असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेची पुढील कृती कोणती राहणार आहे, याबाबतची अधिकृत घोषणाही सभाध्यक्ष करणार असल्याची माहिती रायगड विभागाचे संयोजक त्रिंबक देशमुख यांनी दिली. रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग येथील संघटनेच्या अपंग सदस्यांनी या जाहीर मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे व आपल्या समस्या आणि अडचणी असल्यास त्या मेळाव्यात लेखी स्वरूपात सादर करण्यात याव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.