Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

मराठी भाषावृद्धीसाठी स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता - प्रा़ डॉ़ निळकंठ शेरे
अलिबाग, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

तेराव्या शतकामध्ये प्रारंभ झालेली वाङ्मय संस्कृती एकविसाव्या शतकामध्ये चिंतेचा विषय ठरत आह़े मराठी भाषा लोप पावण्यास साम्राज्यशाही व भांडवलशाहीने निर्माण केलेली परिस्थिती खऱ्या अर्थाने जबाबदार आह़े मराठी भाषा टिकवून ती जनमानसात वृद्धिंगत होण्यासाठी स्वतंत्र मराठी विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळ अलिबाग महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा़ डॉ़ निळकंठ शेरे यांनी केले आहे.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने मयूर रुची सभागृहात आयोजित मराठी भाषा दिन कार्यक्रमात प्रा़ डॉ़ शेरे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत़े
प्रा़ शेरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, वाङ्मय संस्कृतीला प्रारंभ होण्यापूर्वी भाषेची बोलीभाषा निर्माण होत़े आज भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आह़े भाषेची रचना भूप्रदेश व तेथील संस्कृती यावर अवलंबृून असते, असे असतानाही इंग्रजीने संपूर्ण जगावर अधिराज्य गाजविले आह़े १९ व्या शतकापासून इंग्रजी जागतिक व्यवहाराचे साधन बनली आह़े या सर्व बाबींतून मराठी भाषा लोप पावण्याचे संकेत मिळत आहेत़ अशा परिस्थितीत मराठी भाषेची जपणूक करण्यासाठी प्राथमिक शालेय स्तरावरून बालकांना मराठीचे श्रवण व वाचन कौशल्य शिकविले गेले पाहिजे, असे डॉ़ शेरे यांनी अखेरीस सांगितल़े
अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष जयंत धुळप यांनी यावेळी बोलताना, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती दिनाचे औचित्य साधून आजच्या या मराठी दिन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिव्यक्ती समर्थन रायगड शाखेचे अभिनंदन केल़े कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीचा प्रारंभ एक पत्रकार म्हणून झाला असल्याने, पत्रकार संघटनांनी या महान कवीची जयंती अगत्याने साजरी करणे आवश्यक आह़े जिल्'ाातील महाविद्यालयांमध्ये मराठी वाङ्मय मंडळे सक्रीय कार्यान्वित करण्याचा मनोदय व्यक्त करून, मराठी भाषेचे आद्यमुद्रक गणपत कृष्णाजी पाटील यांचे स्मृतिस्मारक त्यांच्या थळ या जन्मगावी उभारण्याच्या अभिव्यक्ती समर्थनच्या मागणीस राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दर्शवून, आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले असल्याचे सांगितल़े रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी या स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे आदेश रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी रामदास खडतरे यांना दिले असल्याचे यावेळी अखेरीस त्यांनी सांगितल़े
कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस डॉ़ शेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आल़े अभिव्यक्ती समर्थनचे रायगड जिल्हा अध्यक्ष आविष्कार देसाई यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना विषद केली, तर राज्य कार्यकारिणीचे मानद सदस्य अ‍ॅड़ रत्नाकर पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला़ जिल्हा सचिव सुवर्णा दिवेकर यांनी सूत्रसंचालन, तर अलिबाग तालुका अध्यक्ष सुयोग आंग्रे यांनी आभार मानल़े यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा़ डॉ़ शेरे यांचा जयंत धुळप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाकडून उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कारासाठी निवड झालेल्या ‘साहित्यआभा’ दिवाळी अंकाच्या संपादिका शारदा धुळप यांचा यावेळी जिल्हाध्यक्ष आविष्कार देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़
कार्यक्रमास अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उदय भिसे, प्रा़ ओंकार पोटे, जिल्हा माहिती कार्यालयाचे राजेंद्र मोहिते, संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष मनोज घोसाळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन वेलकर आदी पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होत़े