Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

इंग्रजीचे आक्रमण वाढले तरी मराठी भाषा नामशेष होणे अशक्य!
चौल, २७ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

 

मराठी भाषा नामशेष करण्याचे प्रयत्न १३व्या, १६व्या आणि १९व्या शतकात मोठय़ा प्रमाणात होऊनही ती नामशेष झाली नाही़ ती आता इंग्रजीचे आक्रमण वाढले तरी नामशेष होणार नाही, असा दृढ विश्वास मराठी भाषेचे अभ्यासक, ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक प्रा़ माधव नारायण आचार्य यांनी व्यक्त केला आह़े
तब्बल ४८ वर्षे मराठी भाषा संशोधन, अध्यापकी, लेखन आणि समीक्षा अशा चौफेर साहित्य कामगिरीमुळे नामांकित प्रा़ माधव आचार्य यांच्या अलिबाग तालुक्यातील चंपावती नगरी अर्थात चौल येथील निवासस्थानी आजच्या ‘मराठी भाषा दिनी’ त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ अर्पण करून अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष जयंत धुळप, राज्य मानद सदस्य अ‍ॅड़ रत्नाकर पाटील, जिल्हाध्यक्ष आविष्कार देसाई, सचिव सुवर्णा दिवेकर, अलिबाग तालुका अध्यक्ष सुयोग आंग्रे, सदस्य प्रणय पाटील यांनी ऋणमुक्तीचा छोटासा प्रयत्न केला. त्यावेळी प्रा़ आचार्य बोलत होत़े
मी निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली तरी अजून माझी आठवण ठेवणारी माणसे आहेत, याचे मला मोठे समाधान वाटल़े एका प्राध्यापकाची श्रीमंती अखेर त्याचे विद्यार्थीच असतात़ समाज, राष्ट्र आणि मानवता यांना बरोबर घेऊन जाणारी कविता म्हणजे कुसुमाग्रज होते. मानव धर्म या स्थायीभावाकडे घेऊ जाणारी त्यांची कविता आहे. मराठी भाषेला मोठे करण्याचे काम एकनाथांपासून विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि पुढे अनेकांनी केल़े शतकानुशतके चालत आलेल्या त्या साखळीतील आजचे एक शिलेदार आता पत्रकार या नात्याने तुम्ही आहात, त्यासाठी तुम्हा सर्वाना मन:पूर्वक आशीर्वाद, अशी भावना त्यांनी अखेरीस व्यक्त केली़
प्रारंभी कृषीमित्र राजाभाऊ राईलकर यांनी सर्वाचे स्वागत करून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या आवाजातील कुसुमाग्रजांच्या कवितांची ध्वनिमुद्रिका सर्वाना ऐकवून सर्वानाच एक आगळी अनुभूती दिली़ यावेळी कुमुदिनी आचार्य, यशवंत कळके, वसुधा कळके आदी मान्यवर उपस्थित होत़े