Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

‘दूरध्वनी ग्राहकांची गैरसोय दूर करणार’
खोपोली, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

 

वारंवार खंडित होणारी दूरध्वनी सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी तज्ज्ञ अधिकारी व तंत्रज्ञ शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. प्रयत्नांना अल्पावधीत निश्चित यश येईल व दूरध्वनी ग्राहकांची होणारी गैरसोय दूर होईल, असे आश्वासन विभागीय अभियंता जाधव यांनी भाजपच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.
गेले १५ दिवस खोपोली दूरसंचार कार्यालयांच्या अखत्यारितील दूरध्वनी, भ्रमणध्वनी सेवा वारंवार खंडित होत आहे. दूरध्वनी ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे खोपोली शहर भाजपचे अध्यक्ष ध्रुव मेहेंदळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राकेश दबके यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने नुकतीच विभागीय अभियंता जाधव, उपअभियंता गजभिये, बंगेरा यांची भेट घेतली. त्याप्रसंगी बोलताना जाधव यांनी वरीलप्रमाणे आश्वासन दिले.
दूरध्वनी संचात एकाच वेळेस दोन-दोन आवाज ऐकू येणे, खरखर, प्रसंगी कर्णकर्कश आवाजामुळे संभाषणात अडथळे येणे, अचानक डायलटोन यंत्रणा ठप्प होणे, अशा तक्रारी ग्राहकांकडून वारंवार येत होत्या. २० वर्षांंपूर्वीच्या जुन्या यंत्रणेतील हे दोष दूर करण्याची व ग्राहकांना नवीन अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत गरज होती. त्या दृष्टिकोनातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले. जुनी यंत्रणा व नवीन अद्ययावत यंत्रणा तीन-चार तासांत मॅच अर्थात एकरूप होईल, अशी आशा होती. दुर्दैवाने जुन्या यंत्रणेने नव्या यंत्रणेचा स्वीकार केला नाही. त्यामध्ये गुंतागुंत वाढत गेली व दूरध्वनी सेवा खंडित होऊ लागली आहे, असा खुलासा जाधव यांनी चर्चेत बोलताना केला.
खोपोली-शीळफाटा येथे उपलब्ध झालेल्या जागेमध्ये मोबाइल टॉवर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच हा मोबाइल टॉवर कार्यान्वित होईल व बीएसएनएल मोबाइलधारकांच्या सर्व समस्या दूर होतील, असा निर्वाळा त्यांनी दिला. अधिकारी वर्ग जाणूनबुजून यंत्रणेकडे दुर्लक्ष करीत आहे. खासगी कंपन्यांचा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा यादृष्टीने अप्रत्यक्षात त्यांना मदत करीत आहे, अशा प्रकारच्या आरोपात तथ्य नाही, हे सर्व आरोप तद्दन खोटे, बिनबुडाचे व निराधार ठरतात, असेही विभागीय अभियंता जाधव यांनी सांगितले.