Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
राज्य
(सविस्तर वृत्त)

आणखी काय हवे? खूप मिळाले!
नाशिक, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

 

‘तात्यासाहेबांच्या व माझ्या गणगोताच्या साक्षीने जनस्थान पुरस्कार मिळाल्यामुळे मला भरून आले असून माझ्यासारख्या फाटक्या कवीला आणखी काय हवे ? खूप मिळाले..’ असे भावोद्गार निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी जनस्थान पुरस्काराच्या स्वीकारानंतर सत्काराला उत्तर देताना काढले. या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील तोकडे असल्याचे सांगत तात्यासाहेबांना माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, कारण माझ्या ओबडधोबड जीवनाला आकार देण्याचे काम त्यांनीच केले असल्याची भावनाही महानोर यांनी व्यक्त केली. त्याचवेळी सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करताना केवळ कर्जमुक्तीच्या घोषणेने काही होणार नाही, तर ओंजळभर पाणी शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने आडसाली दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्कारासाठी यंदा महानोर यांची निवड करण्यात आली असून आज कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी, येथील महाकवी कालिदास कलामंदिरात त्यांना पॉप्युलर प्रकाशनचे डॉ. रामदास भटकळ यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, कार्यवाह विलास लोणारी, आ. हेमंत टकले, पुरस्कार प्रबंधक समितीचे अध्यक्ष आ. डॉ. वसंत पवार, वत्सला म्हैसकर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना महानोर यांनी तात्यासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तात्यासाहेबांची साहित्य सामाजिक, वैचारिक शहाणपण व बांधिलकीचे असले तरी कोणालाही ते सहज समजावे इतके ते सर्वसामान्यांचे होते. साहित्यातील चांगल्या, बंडखोर, खुणावणाऱ्या प्रलोभनांमध्ये अडकावे अशा कितीतरी गोष्टी होत्या, मात्र बालकवी, बहिणाबाई, माधव काटदरे, ना. घ. देशपांडे यांच्या साहित्याने मला सांभाळले असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, डॉ. भटकळ यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणी सांगत मराठी भाषा शुध्दीचा विचार करण्यापेक्षा आज तिच्या वृध्दीचा विचार करणे गरजेचे आहे असे सांगत महानोर यांचा पहिला ‘रानातल्या कविता’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि मराठी साहित्याला एक निर्सगकवी मिळाला. आजही मराठी वाचेल का, जगेल का, अशी विचारणा होत असताना प्रकाशकाच्या दृष्टीने साहित्य क्षेत्रात पुस्तक, कथा, कांदबरी यांना मागणी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. जब्बार पटेल यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार सोहळ्यापूर्वी महानोर यांच्या काही कवितांचे, चित्रपटातील गाण्याचे सादरीकर नाशिकच्या स्थानिक कलावंतानी केले.