Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

राज्य

आणखी काय हवे? खूप मिळाले!
नाशिक, २७ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘तात्यासाहेबांच्या व माझ्या गणगोताच्या साक्षीने जनस्थान पुरस्कार मिळाल्यामुळे मला भरून आले असून माझ्यासारख्या फाटक्या कवीला आणखी काय हवे ? खूप मिळाले..’ असे भावोद्गार निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी जनस्थान पुरस्काराच्या स्वीकारानंतर सत्काराला उत्तर देताना काढले. या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील तोकडे असल्याचे सांगत तात्यासाहेबांना माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे, कारण माझ्या ओबडधोबड जीवनाला आकार देण्याचे काम त्यांनीच केले असल्याची भावनाही महानोर यांनी व्यक्त केली. त्याचवेळी सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करताना केवळ कर्जमुक्तीच्या घोषणेने काही होणार नाही, तर ओंजळभर पाणी शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुंभे जलविद्युत प्रकल्पग्रस्तांची शासनाकडून फसवणूक
महाड, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

रायगड जिल्ह्यातील काळ कुंभे जलविद्युत प्रकल्पामुळे महाड आणि माणगाव तालुक्याचा विकास होणार असल्याचा दावा शासनाकडून सातत्याने जरी करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात माणगाव तालुक्यातील कुंभे प्रकल्पग्रस्तांचे हक्काचे पाणी महाड येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला देण्यात येणार असल्याने, या परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होणार असून, शासनाने प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष गाडय़ा
चिपळूण, २७ फेब्रुवारी/वार्ताहर
आगामी उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर २०८ विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे, त्यामुळे याचा फायदा कोकणातील प्रवाशांना होणार आहे. १०९ डाऊन ही गाडी ५ एप्रिलपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कारवार अशी धावणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रात्री ११.५५ वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वा. कारवारला पोहचेल. तर ‘११० अप’ गाडी कारवारहून दुपारी ३ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ४.२० वा. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पोहचेल.

मिरकरवाडा बंदरातील ६० हजार घनमीटर गाळ आजपासून उपासणार
खास प्रतिनिधी
रत्नागिरी, २७ फेब्रुवारी

केरळमधून आणण्यात आलेल्या ‘सिंधुराज’ ड्रेझरच्या मदतीने येथील मिरकरवाडा बंदरातील सुमारे ६० हजार घनमीटर गाळ उपसण्याची मोहीम उद्यापासून (२८ फेब्रुवारी) सुरू होत आहे. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर आहे, पण गेल्या सुमारे १० ते १५ वर्षांच्या काळात ते सतत गाळाने भरत गेल्यामुळे मोठय़ा मच्छिमार नौकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हा गाळ उपसण्यासाठी गेल्यावर्षी सुमारे साडेसात कोटी रुपयांची तरतूद केंद्र व राज्य शासनाने मिळून केली आणि त्यानुसार गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून गाळ उपसण्याचे काम सुरू झाले.

भारनियमनामुळे वाडय़ातील विद्यार्थी त्रस्त
वाडा, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

दहावी-बारावीच्या परीक्षा काळात भारनियमन केले जाणार नाही, किमानपक्षी परीक्षा केंद्रांवर डिझेल जनरेटर संच सुविधा दिली जाईल, असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. मात्र आज तालुक्यातील वाडा व चिंचघर परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवसभराच्या भारनियमनाचा चांगलाच फटका बसला. आज बारावीच्या परीक्षार्थी इंग्रजी विषयाचा पेपर देताना घामाघूम व्हावे लागले. तालुक्यात वाडा व चिंचघर येथे दोन परीक्षा केंद्र असून या दोन्ही ठिकाणी पत्र्याच्या शेड असलेल्या इमारतीमध्ये बसून भरदुपारी पेपर लिहिताना अनेकांना घाम गाळावा लागला.

देवरुखच्या शिवांगी नृत्यमल्हारचे तिघे कथ्थक नृत्यात केंद्रात प्रथम
देवरुख, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

अखिल भारतीय गांधर्व विद्यापीठाच्या कथ्थक नृत्य परीक्षेत देवरुखच्या शिवांगी नृत्यमल्हार संस्थेच्या नीलेश वाडकर, अपूर्वा खरे व अर्चना जिरगे यांनी रत्नागिरी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवांगी नृत्यमल्हार संस्थेने कथ्थक नृत्यामध्ये शंभर टक्के निकालाची सलग नवव्या वर्षीही परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी पाश्र्वभूमीवर शिवांगी संस्थेची चिपळूण तालुक्यात शाखा सुरू करण्याचा मनोदय संचालक अशोक आखाडे यांनी व्यक्त केला आहे.शिवांगी नृत्यमल्हार संस्थेतर्फे प्रारंभिक प्रवेशिका प्रथम, प्रवेशिका पूर्ण व मध्यमा प्रथम या चार परीक्षा मिळून एकूण ७० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सिद्धी मांगले, सुमेधा खोत यांनी विशेष योग्यता श्रेणी मिळवली आहे. ५३ विद्यार्थ्यांना प्रथम तर १५ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली आहे.कथ्थक नृत्याच्या प्रवेशिका प्रथम या परीक्षेत नीलेश वाडकर याने केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला. प्रवेशिका पूर्ण या गटात अपूर्वा खरेने प्रथम, तर मध्यमा प्रथम परीक्षेत अर्चना जिरगे हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. परीक्षार्थीना संचालक अशोक आखाडेंसह अर्चना कुलकर्णी (कथ्थक), मिताली भिडे (भरतनाटय़म), सारिका नांदिवडेकर, यशवंतराव पटवर्धन अकादमीचे रवींद्र घांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

टायर फुटून क्वालिस दरीत
संगमेश्वर, २७ फेब्रुवारी/वार्ताहर

संगमेश्वर तालुक्यातील परचुरीतर येथील उतारावर क्वालिस गाडीचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा जाऊन गाडी ३० फूट दरीत कोसळली. या अपघातात क्वालिसचालक सुदैवाने बचावला. दीपक शुक्ला हा क्वालिस गाडी घेऊन गोव्याहून ठाण्याकडे चालला होता. गाडी परचुरीतर येथे आली असता गाडीच्या पुढचा टायर फुटून गाडी ३० फूट दरीत कोसळली. गाडीची धडक एवढी जोरात होती की, बाजूची तटबंदी फोडून दगड विखुरले गेले. कोंडय़े गावात तंटामुक्त कार्यक्रमासाठी गेलेले पो. निरीक्षक अर्जुन राणे, जि. प. सदस्या दीपिका जोशी, अवधूत सुर्वे हे संगमेश्वर येथे परतत असताना त्यांना अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शुक्ला याची चौकशी केली.